लाल मुळ्याचा हलवा (मराठी)
प्रकार:
|
गोड पदार्थ
|
गार, बर्फ-गार
|
2 व्यक्तींसाठी
|
प्रक्रिया: किसणे, परतणे, उकळणे, मिसळणे
|
आहारमूल्य:
|
’ब’,
’क’ जीवनसत्वे तंतुमय पदार्थ
|
प्रथिने, स्निग्ध पदार्थ,(दुधातील)
|
’अ’ आणि ’ड’ व्हिटॅमिन्स (दुधातील)
|
कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज,
झिंक, पोटॅशिअम, इ.
|
वेळ
|
तयारीचा
|
10 मिनिटे
|
वाढण्याचा
|
1 मिनिट – वाढण्याआधी प्रत्येक बाऊल सजवणे
|
|
पाककृतीचा
|
15 मिनिटे
|
खाण्याचा
|
5 मिनिटे – खाणे आणि अर्धा तास पाककृतीविषयी चर्चा
|
धक्का, झणझणीतपणा, थोडा झटका, मजा, आनंद, समाधान, गोडी,
पौष्टिकता.
नाव:
|
लाल मुळ्याचा
हलवा
|
प्रस्तावना:
|
हा गोड पदार्थ आपण आज प्रायोगिक म्हणून करणार आहोत. खरं तर फक्त आपल्या
एकट्यासाठीच. आपल्या प्रयोगाचा त्रास इतरांना कशाला? पण आयुष्यभर माझा, माझ्या
कामांचा आणि विशेषतः माझ्या प्रयोगांचा त्रास सोसत आलेल्या विशेष व्यक्तीला
हा अजून थोडासा त्रास जास्त नाही (भरल्या गाड्याला सूप जड नाही किंवा मेलं
कोंबडं आगीला भीत नाही या न्यायानं). आणि दुसर्या कुणाचंतरी मत घ्यायचं असेल तर
कुणाला तरी हा त्रास द्यायलाच लागणार. म्हणून दोघांसाठी.
गाजर हलवा वर्षानुवर्षं अनेकांनी आवडून खाल्ल्यावर आणि विशेष पक्वान्न
म्हणून तो सिद्ध आणि मान्यताप्राप्त झाल्यावर त्यासारखाच दुधी हलवाही आपल्याला
आवडतो. लाल भोपळ्याच्या हलव्याचीही आपल्याला कल्पना करता येते आणि तो आपण खाऊ
शकू असं वाटू शकतं. पण मुळ्याचा हलवा? लाल मुळा असला तरी काय झालं. मुळा तो मुळा! हे शक्यच नाही. त्याच्या त्या तिखटसर चवीबरोबर
आणि झणझणीत वासाबरोबर मऊगोड-मलईदार चवीची आपल्याला कल्पनाच करता येत नाही. उद्या
कुणी किसता येणार्या सगळ्याच गोष्टींचा हलवा करता येईल असं म्हणेल (मी म्हणतोच
आहे). पण नवीन प्रयोगांनाही मर्यादा असते आणि असा मूर्खपणा कुणी करू नये असंच
कुणीही म्हणेल.
पण तरीही हा मूर्खपणा आज मी करणारच आहे. कारण तो मूर्खपणा करायला भाग
पाडणारे ताजे, किरकुरीत, सुंदर, स्वच्छ लाल मुळे आज मला मिळाले आहेत. आणि फसू शकणार्या प्रयोगासाठी घालवायला आज (रविवार असल्यानं) माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मोहात
पडल्यावर नाहीतरी आपण केव्हाही मूर्खपणाच करत असतो.
टीप: चावल्यावर मुळ्यातील
ग्लुकोसिनोलेट्स (glucosinolates) आणि एन्झाईम मायरोसिनेज (myrosinase) एकत्र आल्यावर निर्माण होणार्या अलिल्
आयसोथिकोसायनेट्समुळे (allyl isothiocyanates) मुळ्याचा विशिष्ट झणझणीत, मिर्यासारखा
तिखटसर स्वाद निर्माण होतो. हा नाकात झिणझिण्या आणतो. हीच द्रव्ये कमीअधिक
प्रमाणात मोहरी, घोडमुळा (horseradish) वसाबी (Wasabi) यांमधेही असतात.
मुळ्याचा मुळेपणा या वासातच असतो. नाहीतर गाजरात आणि मुळ्यात केशरी रंगाशिवाय
काय फरक राहिला असता
|
इच्छा:
|
एकदा इच्छा झाल्यावर आता लाल मुळ्याचा हलवा बनवून त्याची चव घेतल्याशिवाय चैनच
पडणार नाही. तेव्हा करूचया!!!
|
पूर्वतयारी:
|
मुळे आपल्याला मिळालेलेच आहेत. तेव्हा मानसिक धैर्य एकवटणे आणि इतर तयारीला
लागणे हीच पूर्वतयारी.
|
तयारी:
|
आपल्याला 2-3 लाल मुळे, 6 चमचे साखर, 2 कप दूध, असल्यास
1-2 पेढे, 2 चमचे शुद्ध घरगुती तूप, 1 लवंग, 1 चिमूट दालचिनी पूड, वेलदोडा-जायफळाची
पूड, 4 काजू आणि 4 बेदाणे लागतील.
|
पाककृती:
|
·
मुळे (अर्थातच) स्वच्छ धुवून जाड किसणीनं किसूया.
·
फ्राईंग पॅनमधे शुद्ध घरगुती तूप घेऊन पॅन गॅसवर ठेवूया. त्यात लवंग टाकून थोडं
हलकं परतूया.
·
आता त्यात किसलेला मुळा आणि साखर टाकून मंद आंचेवर परतूया.
·
साखरेमुळे सुटलेलं पाणी आटेपर्यंत आणि तूप सुटायला लागेपर्यंत परतल्यावर
त्यात हळूहळू हालवत दूध घालूया.
·
त्यात पेढे मिसळून चिमूटभर दालचिनी फूड, वेलदोडा-जायफळ पूड, बेदाणे आणि काजूचे
तुकडे घालून हवा तो घट्टपणा येईपर्यंत परतूया.
· लाल मुळ्याचा हलवा तयार.
·
त्याची चव घेऊन बघूया. (भीत भीत? ... का? आपला आपल्यावर विश्वास नाही?) वाऽऽऽ!
सुंदर. चव पण आणि रंग पण!
·
थंड झाल्यावर फ्रीजमधे ठेवूया.
|
समृद्धीकरण:
|
?
|
कौशल्य:
|
·
मुळा-साखरेचं मिश्रण परतताना त्यातील पाणी आटणं दूध घालण्यापूर्वी आवश्यक आहे.
·
मिश्रण दूध घातल्यावर सतत ढवळणं महत्त्वाचं आहे - दूध फाटणं टाळण्यासाठी आणि हव्या त्या घट्ट
पण मऊ-मलईदार स्पर्षासाठी.
|
सजावट:
|
सजवणं इतरांना आकर्षित करण्यासाठी.
स्वतःसाठी केलेल्या प्रयोगात निष्कर्ष महत्त्वाचा. तरीही इतक्या सुंदर गुलाबी रंगाच्या, मधेमधे गडद लाल, किरमिजी कण, अशा सुंदर दिसणार्या पदार्थला आणखी सजवायचं काय?
|
वाढणे:
|
·
जेवणानंतर दोन बाऊल्स आणि दोन चमचे घेऊन एक बाऊल विशेष व्यक्तीपुढे
आणि एक स्वतःपुढे ठेवू. विशेष व्यक्तीला आत्तापर्यंत आपल्यापुढे काय वाढून ठेवलं
आहे हे माहीत झालं आहेच.
·
आपण आत्ता तटस्थ परीक्षकाच्या
भूमिकेत आहोत. पण लाल मुळ्याचा हलवा तयार झाल्यावर आपण एकदा चाखून बघितलाच आहे आणि
तो आपल्याला(तरी) आवडला आहे. तेव्हा टेन्शनचं कारण नाही. पण तटस्थ विश्लेषण करायला
हवं.
|
आस्वाद:
|
· “हंऽऽऽ! हंऽऽऽऽऽ!!! ... छानच दिसतोय. पण लागतोय कसा हे महत्त्वाचं." विशेष व्यक्ती
तिनं पहिला चमचाभर हलवा चाखून बघितला
आहे. चेहेर्यावर प्रश्नचिन्ह. विशिष्ट व्यक्तिमत्त्व निदर्शक सुक्ष्म आठ्या.
अनिश्चितता. टांगलेल क्षण.
·
“हंऽऽऽऽऽ!!! ... सगळ्यांना आवडेल का नाही माहीत नाही.” विशेष व्यक्ती
· “प्रत्येक गोष्ट सगळ्यांना आवडायलाच पाहिजे
असं नाही. … तुला आवडला का?” ·
मी
·
“अंऽऽ? हं! हंऽऽऽ!”
·
“अगदीच वाईट नाही ना?”
·
“नाही. छान आहे. आवडला! ... मुलांना पण
आवडेल. नेहमीप्रमाणं, बाबा तुझं काहीतरीच हं! असं म्हणतील पण नंतर आवडीनं खातील.”
·
“त्याचीही त्यांना आता लहानपणापासून सवयच आहे.”
· आता चवीचं तटस्थ विश्लेषण: फक्त 1 चमचा सावकाश जिभेवर घोळवून डोळे
मिटून आस्वाद.
·
जिभेवर किंचित तिखटपणा आणि नाकात थोड्या झिणझिण्या (हल्लीच्या मुळ्यांना
तिखटपणा कमीच). थोडा रुसवा. मग मायेनं समजूत घातल्यासारखी पसरणारी खवा-साखरेची
मुलायम चव. आपण कुणीतरी स्पेशल कौतुकाची व्यक्ती असल्याची सुखद जाणीव करून देणारा
दाताखाली आलेला काजूचा तुकडा.
·
सुंदर चव आणि स्वाद! मुळ्याचा विशिष्ट झणझणीत स्वाद गोड चवीबरोबर आणि
खव्याच्या स्वादाबरोबर छानच जुळवून घेतोय. रोज भांडणार्या पण वर्षानुवर्षं
सटवाई-म्हसोबा न्यायानं छान संसार करणार्या जोडप्यासारखा.
·
“ठीक आहे. सर्वांबरोबर शेअर करायला हरकत नाही. जे आधीच बिचकणार नाहीत ते
करून बघतील. आवडला तर इतरांना सांगतील.”
· तुम्हीसुद्धा आधी थोडाच करून बघा. आवडला तर इतरांना खायला घाला.
|
चिंतन आणि नंतर सुचलेले विचार:
|
·
वाऽऽऽ! प्रयोग यशस्वी. ज्यांना मुळातच मुळ्याचा स्वाद आणि झटका आवडत नाही
असे काही कमनशिबी लोक सोडले तर इतरांना हा आवडायला हरकत नाही. माझ्या प्रयोगांचा त्रास सोसत आलेल्या विशेष व्यक्तीला हा अजून थोडासा त्रास
नक्कीच आवडला आहे.
·
खरं तर मिळमिळीत निर्गुण दुधी हलव्यापेक्षा याला स्वतःचं झकास-झटकेदार
व्यक्तिमत्त्व आहे.
·
एक आहे की, याचं सुंदर, गोबर्या गालांच्या, लाजलेल्या छोट्या मुलीसारखं गोंडस, लाल-गुलाबी रूप बघून याच्या नाकात झिणझिण्या आणण्याच्या गुणांची
कल्पना येत नाही.
·
ज्याना गोड आवडतं आणि ज्यांना नाविन्याची आवड असते त्यांना हा नक्कीच आवडेल.
तर तुम्हालाही हा नक्कीच आवडेल.
·
निरोगी मुलं तो हवा तितका, भरपूर, खाऊ शकतात.
·
नंतर मोठेपणीमात्र आपण काळजी घ्यायला हवी. असे सूक्ष्म स्वादाचे, नाकाभोवती
रुंजी घालणार्या सौम्य वासाचे आणि रेंगाळणार्या चवींचे पदार्थ अगदी थोडे, अगदी
सावकाश आणि पूर्ण आस्वाद घेत समाधानानं खायला हवेत. किती खाल्लं त्यापेक्षा
खाण्यामुळं किती समाधान मिळालं हे महत्त्वाचं. जास्त खाल्ल्यामुळं जास्त समाधान
मिळतं अस नव्हे.
(हे वाक्य महत्त्वाचं असल्यानं ते ’गाजर
हलवा’ यातून जसंच्या तसं कॉपी केलं आहे.)
·
मधुमेह, वाढलेला रक्तदाब, हृद्रोग यांनी ग्रस्त असलेल्यांनी असे पदार्थ खाणं
अतीशय धोकादायक आहे.
·
याच पद्धतीनं पांढर्या मुळ्याचा हलवा करणंही शक्य आहे.
· तोही आम्ही केला आहेच. लाल मुळ्याच्या
हलव्यापेक्षा तो जास्त झणझणीत लागतो. पण मजा येते.
· पांढर्या व लाल मुळ्याचा हे दोन्ही हलवे दूध-खवा न घालताही (साखर घातल्यावर
सुटलेलं पाणी आटल्यावर तिथेच थांबायचं) छान लागतात. हा त्याचा फोटो. त्यावर दिसणारे पिवळे कण आल्याच्या किसाचे आहेत. साखर कमी व
चिमूटभर मीठ घालूनही करून बघा.
·
समाधानासाठी गोडच का खावंसं वाटतं? ... हा प्रश्न अजून आहेच.
|
No comments:
Post a Comment