OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Friday, September 22, 2017

माझे ऑम्लेटचे प्रयोग - 3

ऑम्लेट - भाग 3

ऑम्लेट 1: भेंडी, तोंडली, कार्लं, घोसाळं,  दोडके, वांगं, बटाटे, रताळी.


भेंडी घालून ऑम्लेट करायचं मनात होतं. पण बारीक चिरून चिकट झाल्यावर ती कशी लागेल? मुख्य म्हणजे भेंडी घातली आहे हे कळलंही पाहिजे आणि तिची चवही लागली पाहिजे. 

मग भेंडीच्या पातळ चकत्या करून त्या तेलावर परतल्या. परतताना त्यावर मीठ-तिखट टाकलं. ऑम्लेट मिश्रण तव्यावर टाकल्यावर या चकत्या त्यावर पसरल्या. मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर ऑम्लेट उलटलं आणि सुटं झाल्यावर डिशमधे काढलं. भेंडीचे काप आधीच परतल्यानं ते शिजण्याचा प्रश्नच नव्हता. 
वा! हे ऑम्लेट दिसलंही छान आणि लागलंही छान. 


हे जमल्यावर मग वांग्याच्या चकत्या केल्या. (त्या काळ्या न पडण्यासाठी पाण्यात टाकायला विसरू नका.) त्या थोड्या तेलावर (चवीपुरत तिखट-मीठ टाकून) परतल्या. ऑम्लेट मिश्रण तव्यावर टाकल्यावर या चकत्या त्यावर पसरल्या आणि मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर ऑम्लेट उलटलं. 

डाळीच्या सुक्या पिठात घोळवून वांग्याचे काप परततात तसंच वांग्याचे काप फेटलेल्या अंड्यात बुडवूनही पॅनमधे परतता येतात.  





याप्रमाणेच तोंडली, कार्लं, घोसाळं,  दोडके, बटाटे, रतांळी, इत्यादींच्या चकत्याही कच्च्या किंवा परतून वापरता येतील. (त्या सर्व मी वापरून बघितल्या नसतील असं तुम्हाला अजूनही वाटतंय का?) गाजर, टॉमॅटो, काकडी, बीट, नवलकोल, इत्यादींच्या चकत्या मात्र कच्च्याच वापरा. 










टॉमॅटो, कांदा, ढब्बू मिरची (हिरव्या, लाल आणि पिवळ्या रंगाची) यांची कडीही (मराठीत रिंग्ज) फोटोत दाखवल्याप्रमाणं वापरता येतात. या भाज्यांच्या 7 मिलीमीटर रुंदीच्या रिंग्ज कापून घ्या. फ्रायपॅनवर थोडं तेल टाकून त्यावर या रिंग्ज ठेवून त्यात ऑम्लेट मिश्रण टाका. गॅस मंद ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यावर आणि रिंग्ज सुट्या झाल्यावर उलटा. सुट्या झाल्यावर डिशमधे काढून घ्या. या रिंग्ज चवदार स्टार्टर म्हणुन, स्नॅक्स म्हणून आणि विशेष पाहुणे येणार असल्यास सजावटीसाठीही फारच छान! 


ऑम्लेट: ओली/मोडाची कडधान्ये घालून - 
एकदा फ्रीझ उघडल्यावर इतर भाज्या नाहीतपण मोडाचे मूग दिसले. ऑम्लेटमधे ते कसे लागतील हा प्रश्नच नव्हता. ते चांगलेच लागणार. पण ते किती शिजतील? ... पण ते कच्चेही खाता येतात. मग किती शिजले याला काय अर्थ आहे

मग मी ऑम्लेट मिश्रणात ते मूठभर टाकले. मस्त चवदारजास्त पौष्टीक आणि पोटभरू (चांगल्या अर्थानं) ऑम्लेट झालं. 



पुढच्या वेळेला मी मोडाची मिश्र कडधान्ये घातली. एकदा तर मोडाच्या मेथ्याही घातल्या. (कार्ल्याच्या चकत्या चालतात तर मोडाच्या मेथ्या का चालणार नाहीत?) 

ओला मटार, हरभरा, चवळी, तूर इत्यादींचे दाणे नुसते किंवा अर्धवट ठेचून, मिक्सरमधून काढून ऑम्लेटमधे घातल्यास छान लागतात. ते ऑम्लेट-मिश्रणातच मिसळा किंवा ऑम्लेट मिश्रण तव्यावर टाकल्यावर ते ओलसर असतानाच वरून हे ओले दाणे टाका. ते जास्त छान दिसतं आणि वेगळं लागतं. निरनिराळ्या भिजवलेल्या डाळीही याप्रमाणे घालता येतात. 

सर्व ऑम्लेट्स छान झाली आणि छान लागली. शिवाय आधीच समृद्ध असलेल्या ऑम्लेटचे आणखी समृद्धीकरण. 


सागवाला ऑम्लेट:  बारीक चिरलेली मेथी, मुळ्याचा पाला व इतर पालेभाज्या.
ऑम्लेटमधे बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना चालतो तर इतर पाले का नाही चालणार? आणि कार्ल्याच्या चकत्या, मोडाच्या मेथ्या चालतात तर मेथीची पानं का नाही चालणार? चालणार म्हणजे कुणाला? मी करणार, मी खाणार, मग चालण्याचा प्रश्न येतोच कुठं. तुम्ही करणार-खाणार असल तर तुम्हाला चालणार का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. हे सगळं तुम्ही करायलाच पाहिजे असा माझा आग्रह, विनंती, सल्ला, काही नाही. 
मग मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मेथी बारीक चिरून ऑम्लेटमधे टाकली. थोडं आलं किसून टाकलं. मस्त पिवळट हिरव्या रंगाचं, भरपूर फुगलेलं, किंचित कडसर पण चवदार ऑम्लेट. 
मुळ्याचा पाला घालूनही ऑम्लेट छान झालं. त्याचा वेगळाच स्वाद लागतो. आंबट चुक्याची पानं इतर ऑम्लेटसमधे चवीपुरती थोडी किंवा भरपूर घालून ’हिरवं आंबट ऑम्लेट’ छान होतं. त्यात थोडा पुदीना घातला की मस्तच. 
लाल माठ, पोकळा यांचं ऑम्लेट (अर्थातच) लाल रंगाचं होतं. त्यात नुसता भरपूर लसूण ठेचून किंवा आलं-लसूण पेस्ट घातली की छान चव आणि स्वाद. कॉंट्रास्ट रंगसंगतीसाठी हिरव्या मिरचीचे आणि ढब्बू मिरचीचे तुकडे टाकावे किंवा लाल तिखट टाकावं.  
प्रत्येक पालेभाजीचा वेगळा स्वाद असतो. तो ऑम्लेटला अनुरूप (खरं तर अनुस्वाद) होईल का नाही आणि आपल्याला आवडेल का नाही ते सांगता येत नाही. पण करून बघायला काय हरकत आहे? फक्त आपले प्रयोग दुसर्‍यांवर केले नाहीत म्हणजे झालं. 
पण हे प्रयोग आपल्या मुलांवर नक्की करून बघा. ती आपल्या हातात आयतीच सापडलेली असतात म्हणून नव्हे, तर ती फसली, त्यांना हे ’ग्रीन ऑम्लेट’-’रेड ऑम्लेट’ आवडलं आणि त्या निमित्तानं त्यांनी पालेभाजी खाल्ली तर ते त्यांच्याच फायद्याचं असतं, म्हणून. 
हे सगळे ऑम्लेटवरचे प्रयोग असले तरी एखाद्या पदार्थाचं निरनिराळ्या प्रकारे समृद्धीकरण करण्याचेही हे प्रयोग आहेत. 

चीझ्‌ ऑम्लेट: हे 2 प्रकारांनी करता येतं.  
साधं चीझ्‌ ऑम्लेट: ऑम्लेट मिश्रण घ्या. त्यात चीझ्‌ किसून घाला आणि त्याचं ऑम्लेट बनवा. किंवा ऑम्लेट मिश्रण तव्यावर टाका व त्यावर चीझ्‌ स्लाईसचे तुकडे पसरून टाका. ऑम्लेट होत आलं की उलटा आणि थोडं परतून खायला घ्या.  

कुरकुरीत/क्रिस्पी चीझ्‌ ऑम्लेट: 


तव्यावर थोडं लोणी/तूप टाका. ते वितळल्यावर नीट पसरून घ्या. त्यावर चीझ्‌च्या किसाचा थर पसरा. चीझ्‌ वापरताना कद्रूपणा करू नका. गॅस अगदी मंद ठेवा. चीझ्‌ थोडं वितळेल, मग घट्ट व्हायला लागेल आणि त्याचा थर पिवळट-केशरी-ब्राऊन व्हायला लागेल. आता त्यावर ऑम्लेट मिश्रण टाका व मंद गॅसवर ते थिजू द्या. मग पॅनवरून अलगद सुटं करून उलटा व अर्धा मिनिट दुसर्‍या बाजूनं परतून (पॅनवरून सुटे व्हायला लागलं की) डिशमधे काढून घ्या. ऑम्लेटच्या एका बाजूला चीझ्‌चा कुरकुरीत थर असेल. 

(यासाठी पॅन चांगला नॉन-स्टिक असायला हवा. नाही तर चीझ्‌च्या बाजूनं ऑम्लेट नीट सुटं होत नाही आणि त्याचे तुकडे पडतात.) 



पनीर ऑम्लेट: 

ऑम्लेट मिश्रणात पनीर कुस्करून टाका (फोटोत पनीर कुस्करून टाकले आहे) किंवा ऑम्लेट मिश्रण तव्यावर टाकल्यावर त्यावर पनीरचे छोटे-छोटे तुकडे (नुसते किंवा फ्राईड) पसरून टाका. फ्राईड ब्राऊन तुकडे पिवळ्या ऑम्लेटवर छान दिसतात आणि अर्थात छान लागतातच. किंवा वर आणि खाली दिलेल्या कोणत्याही ऑम्लेटमधे तुम्ही पनीर टाकू शकता (कशात पनीर घातलं तर चालतं हे मला विचारू नका.)   



मर्‍हाठी मसाला ऑम्लेट: 

आत्तापर्यंतचे बरेचसे ऑम्लेटचे प्रकार प्रायोगिक असले तरी त्यांना पाश्चिमात्य वळण होते. अगदी रस्त्यावरच्या अंडा भुर्जी गाडीवर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळते तशा मसाला ऑम्लेटलाही अस्सल मर्‍हाठी ठसका नव्हता


म्हणून आता आपण अस्सल मर्‍हाठी मसाला ऑम्लेट करूया. त्यासाठी ऑम्लेट मिश्रण घ्या (फक्त त्यात मिरपूड टाकू नका). त्यात भरपूर झणझणीत लसणाची चटणी (दाणे आणि भाजलेलं खोबरं घालून कुटून केलेली - म्हणजे कशी ते तुमच्या आजी-पणजीला विचारा) घाला आणि घरच्या शेंगांच्या घाण्यातून गाळून आणलेल्या (म्हणजे काय ते तुमच्या आजोबा-पणजोबांना विचारा) शेंगदाणा तेलावर ऑम्लेट करा. 





अर्थातच असं ऑम्लेट करणं तुम्हाला आता शक्यच नाही. तुम्ही फक्त झणझणीत लसणाची चटणी घालून शेंगदाणा तेलावर (रिफाईंड अर्थातच चालेल - पण राईसब्रॅन किंवा ऑलीव्ह ऑईल नको) ऑम्लेट करा. अर्थातच खरपूस परता. 


हे लाल मर्‍हाठी मसाला ऑम्लेट. 
याप्रमाणेच सोलापुरी शेंगाचटणीवर्‍हाडी ठेचाकारळ्याची चटणीजवसाची चटणीहिरवी (आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर) चटणीपुदीन्याची चटणीनिरनिराळी लोणची, सांबार मसाला, मालवणी फिश मसाला, मोहरी पेस्ट, टॉमॅटो सॉस, सोया सॉसशेझवान चटणी आणि इतर निरनिराळे मसाले घालून ऑम्लेट करत येतं. 

उपासाचं ऑम्लेट: 
अंडं उपासाला चालत नाही असं म्हणतात. पूर्वी अंडं शाकाहारातही चालत नसे. कारण त्यात जीव असे. आताच्या अंड्यांत जीव नसल्यामुळं ती शाकाहारी लोकांना चालतात. (जीव तर तसा भाजीतही असतोच की! असो. जीव, प्राणिज पदार्थ, शाकाहार-मांसाहार यांविषयी नंतर कधीतरी.)   
याचप्रमाणे उपासाला चालणार्‍या पदार्थांतही आपण वाढ करू शकतो. म्हणजे कोंबडीला साबूदाणा आणि दाण्याचं कूट खायला घातलं की तिचं अंडं आणि मांस उपासाला चालतं, वगैरे. पण खरं तर याचीही जरूर नाही. उपासाला खरकटं (म्हणजे काय?) चालत नाही. खरकटं म्हणजे पाणी लागलेले पदार्थ. अंड्याच्या पदार्थांत त आपण मुळीच पाणी घालत नाही. म्हणूनही ती नक्कीच उपासाला चालतात. तसे तर मग तंदूर चिकन आणि मटण कबाब पण उपासाला चालतात.   
किंवा एखाद्या पदार्थात उपासाला चालणार्‍या पदार्थांपैकी (उदा. - दाण्याचं कूट, खोवलेला नारळ किंवा सुक्या खोबर्‍याचा कीस, पनीर, चीझ्‌, बटाटा, रताळं, साबूदाणा, इ.) काही घातलं की तो पदार्थ उपासाचा होतो असं मला वाटतं. या न्यायानं मी उपासाचा तांबडा रस्सा, उपासाचं सुकं मटण, फिश फ्राय/फिश करी आणि प्रॉन्झ-फ्राईड राईससुद्धा करू शकतो. 
त्याहीपेक्षा उपासाच्या तोंडानं काहीही खाल्लं तरी तो उपास होतो असंही मला वाटतं. 
तोंड उपासाचं करण्याच्या काही कृती: 
  1. दात घासून खूप वेळा खळखळून चुळा भरणे. म्हणजे रात्री जेवणानंतर दात घासल्यावर आणि सकाळी उठल्यावर दात घासल्यावर आपलं तोंड उपासाचंच असतं. म्हणून तर त्यानंतर केलेल्या नाष्ट्याला ब्रेक-फास्ट (उपासमोड) म्हणतात.  असले तरी ते उपासाचं खाणंच असतं. 
  2. उपासाला चालणारा पदार्थ खाणं. आता उपासाला चालणारे पदार्थ हे एक वेगळंच प्रकरण (म्हणजे चॅप्टर या अर्थानं नव्हे, तर स्कॅंडल / लफडं / बनाव या अर्थानं) आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी. 
  3. उपाशीपोटी असणं - म्हणजे किती तास? 
थोडक्यात उपास, म्हणजे उपवास, म्हणजे रिकाम्या पोटी असणं आणि रिकाम्या पोटी देवाचं चिंतन करणं असं असेल तर काहीही  खाल्लं (यात उपासाला चालणारे पदार्थही आले) तर तो उपास कसा काय होतो? 
किंवा उपास सुरू करताना, आज उपासाला काय काय खायचं आणि (दिवसभर उपाशी (?) असल्यानं) उपास सोडल्यानंतर काय काय हाणायचं याचाच विचार सतत मनात असेल आणि तो कृतीत येत असेल तर तो उपास कसा काय होतो? 
आणि तरीही तो उपास होत असेल तर काहीही आणि कितीही खाल्लं तरी तो उपासच!  

तर "उपासाला चालणारे पदार्थ " घालून केलेलं हे  उपासाचे ऑम्लेट. 

2 अंडी फोडून (उपासानं कलमलायला लागल्यावर कमीतकमी 2 अंड्यांचं ऑम्लेट तर लागणारच) त्यात कांद्याऐवजी (कारण कांदा उपासाला चालत नाही) 2 चमचे किसलेलं (सुकं किंवा ओलं) खोबरं, 2 चमचे दाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली मिरची-कोथिंबीर (किंवा लाल तिखट - जिरे पूड) घाला (हे सर्व उपासाला चालतंच). चवीपुरतं मीठ घालून ते चांगलं फेटा आणि ऑम्लेट बनवा. नुसतं किंवा उपासाच्या भाजणीच्या थालीपीठाबरोबर खा. हे अप्रतीम लागतं. 


या ऑम्लेटमधे तुम्ही किसलेलं चीझ्‌, किंवा कुस्करलेलं पनीरही घालू शकता. त्यामुळे उपासाचं ऑम्लेट एकदम शाही होतं. 


या ऑम्लेटमधे तुम्ही किसलेला बटाटा, रताळं, लाल भोपळा किंवा भिजलेला साबूदाणाही घालू शकता. त्याहीपेक्षा सोपं म्हणजे अंड्यात साबूदाण्याची उरलेली खिचडी घातली की झालं. तिखट-मिठाऐवजी साखर घातली आणि अंड्याचा फक्त पांढरा बलक वापरला तर हे ऑम्लेट पांढर्‍या बुधवारालाही चालतं. (हे मी करून बघितलेलं नाही. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करा आणि खा.) 

गोऽऽड ऑम्लेट: काजू-बदाम-अक्रोड पिस्ते, बेदाणे मनुका, वेलदोडा (जायफळ, दालचिनी, लवंग) पूड, साखर-मीठ. 

वरचं मर्‍हाठी ठसक्याचं मसाला ऑम्लेट केल्यावर तुम्ही म्हणाल, आता हे  काय? तर आपल्याला लावणीचा ठसका आवडतो तशीच सोज्वळ भजनाची भक्ती आणि शास्त्रीय संगीताची शुद्धताही आवडतेच की! सर्वत्र आणि सर्व प्रकारचं, संगीत चांगलंच असतं. तसंच! शिवाय हे उपासालाही चालतं. 

तर या ऑम्लेटसाठी आपण अंड्यामधे ओल्या नारळाचा कीस, काजू-बदाम-अक्रोड-पिस्त्यांचे तुकडे किंवा भरड पावडर, वेलदोड्याची पूड, थोडी (अर्धा ते एक चमचा) साखर आणि चवीपुरतं थोडं मीठ घालूया आणि फेटूया. (केशराची गरज नाही कारण अंड्याचा पिवळा रंग आहेच.) हे मिश्रण तव्यावर टाकल्यावर आणि ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर बेदाणे आणि मनुका नीट लावून घेऊया. पूर्ण घट्ट झाल्यावर उलटून सुटं झाल्यावर वाढूया. 


सुंदर, सोज्वळ, ’गोऽऽड शाही ऑम्लेट’ अप्रतीम!!! 
ज्यांना गोड आवडतं त्यांना (आणि आवडत नाही त्यांनासुद्धा) हे नक्की आवडेल. हे मुलांना तर नक्कीच आवडेल. शिवाय हे पांढर्‍या बुधवारालाही चालतं. (?)
याच्याच दुसर्‍या प्रकारात वरच्याप्रमाणेच सर्व घालून शिवाय बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घाला, लिंबू पिळा (कचोरी सारण) आणि ऑम्लेट करा. मस्त ’आंबट-गोड-तिखट ऑम्लेट’ 


थोडक्यात, त्या वेळचा मूड आणि समोर दिसणार्‍या गोष्टी यांनुसार कोणत्याही प्रकारे ऑम्लेट करता येतं. 

ऑम्लेट करण्याची सर्वांत चांगली पद्धत कोणती? - तर तुमची!