OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Saturday, May 28, 2011

अननस-चीज्‌ सॅलेड

अननस (स्ट्रॉबेरी) - चीज्‌ सॅलेड
 

प्रकार:
शाकाहारी   फळांचे सॅलेड
बर्फ-गार, थंड,

किती जणांसाठी: 8
प्रक्रिया:  कापणे, तुकडे करणे, मुरवणे, मिसळणे
पौष्टिकता:
क्षार, जीवनसत्त्वे
तंतुमय पदार्थ
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्‌स
स्निग्ध पदार्थ व थोडी कर्बोदके व प्रथिने
वेळ:
पूर्वतयारीचा:
45 मि.
वाढण्याचा:
1 मि.

पाककृतीचा:
5 मि.
खाण्याचा:
जेवण होईपर्यंत 20 मि किंवा जेवणानंतर 10 मिनिटं




नाव:
अननस (स्ट्रॉबेरी) - चीज्‌ सॅलेड
प्रस्तावना:
·         हे नाविन्यपूर्ण, अप्रतीम दिसणारं, स्वादिष्ट, झटपट होणारं, तृप्त करणारं व करायला (म्हटलं तर) सोपं सॅलेड आहे.
·         नेहमी, विशेष (शनिवार/रविवार किंवा पाहुणे आले असताना) जेवणाच्यावेळी किंवा कुणाला अगदी (थोडक्यात) खुष करायला हा छान पदार्थ आहे.
·         हे जेवताना डावीकडे कोशिंबीर म्हणून, गोड पदार्थ म्हणून खाता येतं. पण शक्यतो जेवणानंतर स्वीट-डिश म्हणून खावं.  
·         बायकोला मदत म्हणून नवरा हे करू शकतो. किंवा स्वयंपाकात काही न येणार्‍या नवर्‍याला बायको हे करायला (अर्थात देखरेखीखाली) सांगू शकते.
·         अननस कापण्याचं काम मात्र नवर्‍यालाच करावं लागतं. आणि नवर्‍यानं ते कौशल्य नक्कीच आत्मसात करावं. लग्नानंतर पगार घरात देण्याव्यतिरिक्त आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचा हा एक मार्ग आहे.
·         पण हे सॅलेड अननस मिळणार्‍या दिवसांतच करावं लागतं.
इच्छा:
काल अननस मिळाल्यामुळे (आणि स्ट्रॉबेरी-जॅम घरात असल्यामुळे) आपण आज अननस (स्ट्रॉबेरी) - चीज्‌ सॅलेड करूया.  
पूर्वतयारी:
·            आपण कालच अननस कापून, त्याचे तुकडे करून, त्यावर साखर भुरभुरली आहे (त्यासाठी 40 मिनिटं लागतात) व तो फ्रीजमधे मुरत ठेवला आहे.
·            अननस कापणं ही एक कला आणि शास्त्र आहे. 1000 अननस कापल्यावर काहींना ती साध्य व्हायला सुरुवात होते. (पण ती साध्य झाल्यावर जगात फक्त आपल्यालाच अननस इतका छान कापता येतो हे लक्षात ठेवावे)
·            कापताना आणि येता-जाता फ्रीज्‍ उघडून घरातले सगळे त्याचा फडशा पाडत असतील तर आधीच दोन अननस आणून कापून ठेवावे.     
·            पण अननस स्वतः कापण्याचा (बोट कापून न घेता) इतका अट्टाहास का करायचा? त्यापेक्षा ...
·            काहीजण डबाबंद अननस नावाचा पांचट, बेचव, स्वाद-दारिद्‌र्‍यात खितपत पडलेला व अन्नमूल्यशून्य पदार्थ वापरतात. (हॉटेलमधे ते तसलं तुम्ही खाल्लंच असेल!) अगदी आयत्या वेळी किंवा अननसाचे दिवस नसताना हे सॅलेड करायचं असल्यास हे ठीक आहे. पण अगदी आयत्या वेळी किंवा अननसाचे दिवस नसताना हे सॅलेड करूच नये.
·            वरील पद्धतीनं एक दिवस मुरवलेला ताजा अननस व डबाबंद अननस यांची तुलनाच होऊ शकत नाही. (तेव्हा अननस आणून स्वतः कापण्याला पर्याय नाही)
तयारी:
आपण एका अननसाचे (वरीलप्रमाणे मुरवलेले) तुकडे, एक वाटी घट्ट दही, दोन वाट्या फ्रेश क्रीम (दही व फ्रेश क्रीमऐवजी 3 वाट्या सायीचे दही घुसळून घेतले तरी चालेल), 4 ते 6 चीज्‌ क्यूब्‌जचे तुकडे, थोडी साखर, मीठ व मिरपूड घेऊ. सजावट व समृद्धीसाठी (घरी केलेला) स्ट्रॉबेरी जॅम किंवा फ्रेश स्ट्रॉबेरीज्‌, थोडे कजू, बदाम, काळ्या मनुका इ. घेऊ.
पाककृती:
·         अननस, दही, फ्रेश क्रीम व चीज्‌चे तुकडे एकत्र मिसळून घेऊन चव बघूया.
·         (अननस मुरवताना आपण त्यात साखर घातली होती) आता सॅलेड अजून गोड हवे असल्यास थोडी साखर, चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालूया.
·         मग त्यात थोडी शांती, थोडं समाधान व थोडी तृप्ती घालीन पुन्हा नीट मिसळून चव बघूया. वाऽऽऽऽऽऽऽऽऽ!
·         इतकं साघं आणि सोपं!
समृद्धीकरण
हे सॅलेड आधीच भरपूर समृद्ध आहे. पण यात आपण नारळाचा कीस, काजू, बदाम, काळ्या मनुका किंवा जर्दाळू घालू शकतो.
कौशल्य:
हे करण्यासाठी (अननस कापण्याशिवाय) कोणत्याही विशेष कौशल्याची जरूर नाही.
सजावट:
·         क्रीमी पांढर्‍या-पिवळ्या सॅलेडमधे सालासकट बदामाचे काप व काळ्या मनुका छान दिसतात.
·         खायला देताना आपण त्यावर स्वादसमृद्धीसाठी स्ट्रॉबेरी जॅममधल्या 2-3 स्ट्रॉबेरीज व थोडा (केशरी) पाक टाकूया (फ्रेश स्ट्रॉबेरीज्‌ही चालतील).
वाढप:
हे खोलीतल्या तापमानाला किंवा तासभर फ्रीजमधे ठेवून थंड वाढता येते.
आस्वाद:
·         खाण्यापूर्वी दोन मिनिटं नुसतं डोळे भरून पहात राहावं.
·         मग डोळे मिटून चमच्याने क्रीमने लपेटलेला एक-एक तुकडा सावकाश तोंडात टाकून चघळावा. डोळे मिटल्यामुळे कधी अननस, कधी चीज्‌, कधी स्ट्रॉबेरीचा तुकडा नकळत तोंडात येतो व सुखदाश्चर्याचे तरंग जिभेवर व मनावर पसरतात.
·         मग हळूहळू शांती व तृप्ती मनावर पसरते.
·         हे खाताखाताच झोप लागणार नाही याकडे लक्ष ठेवावे.
चिंतन:
·         हा सोपा पण दृष्टीसुख, आस्वादसुख व मानसिक समाधान देणारा सर्वांगाने समृद्ध पदार्थ आहे पण मोठ्यांनी माफक प्रमाणातच खाल्ला पाहिजे.
·         पण पदार्थ किती खाल्ला यावर सुख थोडंच अवलंबून आहे? कोणता पदार्थ आणि कसा खाल्ला हे महत्त्वाचं.
·         हे खाल्ल्यावर बायको एकदम खुष होऊन जाते, पण लगेच पेंगते.
·         मधुमेह, रक्तदाब किंवा हृद्रोग असलेल्यांसाठी व वजन घटवणार्‍यांसाठी हा चांगला पदार्थ नाही. त्यांनी साघ्या दह्यातील सॅलेड खावं (त्यात साखर घालू नये व खाताना चीज्‌चा फक्त वास घ्यावा.
·         स्ट्रॉबेरी जॅमऐवजी आपण डाळिंबाचे दाणे, काळी द्राक्षं किंवा हापूस आंब्याचे तुकडे घालू शकतो. (पण एकदम सगळ्या गोष्टी भरपूर टाकू नयेत. नाहीतर ते फ्रूट सॅलेड होईल.)
·         सावकाश खा, कच्चं खा व (नैसर्गिक) रंगीत खा हे आरोग्यपूर्ण आहाराचं तत्व हे सॅलेड खल्ल्यानं सहजच पाळलं जातं.
·         अननसाच्या मधल्या दांड्याचे तुकडे कोणत्याही भाजीत टाकता येतात. भाजी शिजत आली की ते टाकावे. भाजीला छान गोडसर-आंबट चव व छान स्वाद येतो (व दांडा वाया जात नाही).
·         तुम्हाला अननस कापता येत नसल्यास आमच्याकडे शिका. आम्ही अननस कापण्याचेही क्लास घेतो.