OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Diets



1) गर्भारपणातील व बाळंतपणानंतरचा आहार:

गर्भारपणात गर्भाची संपूर्ण व स्त्रीच्या शरीरतही काही वाढ (मुख्यतः गर्भाशय, स्तन व रक्त) होत असते. त्यासाठी सर्व अन्नघटक आईच्या रक्तातून घेऊन वापरले जातात. त्यासाठी आईला ते तिच्या आहारातून मिळवावे लागतात. त्यामुळे या काळात आईच्या आहारातील अनेक अन्नघटकांच्या रोजच्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात.
त्याचप्रमाणे बाळंतपणानंतर सरासरी दीड वर्ष बाळ आईच्या अंगावर पिते. यातील पहिले 6 महिने तर ते वाढीसाठी पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असते. दूध तयार करण्यासाठी लागणारे अन्नघटकही आईच्या रक्तातून घेऊन वापरले जातात.
याशिवाय आईच्या शरीराची गर्भारपणात व बाळंतपणात झालेली झीज बाळंतपणानंतर पहिले दीड-दोन महिने भरून काढली जाते. त्यासाठीही आईच्या आहाराच्या गरजा या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात.
त्यामुळे या दोन्ही कालखंडांत आईला या वाढलेल्या गरजा पूर्ण करू शकणारा विशेष आहार घ्यावा लागतो

गरज वाढलेले अन्नघटक –
1)      प्रथिने: प्रथिनांची गरज दुप्पट (स्वतःच्या 1 किलो वजनासाठी रोज 1 ग्रॅम ऐवजी 2 ग्रॅम) होते.
2)      क्षार: लोह-क्षाराची (स्वतःच्या व गर्भाच्या रक्तवाढीसाठी) व कॅल्शिअमची (आधी गर्भाच्या हाडांच्या वाढीसाठी व नंतर दऊध निर्माण करण्यासाठी) गरज दुप्पट होते. इतर क्षारांची गरज अंदाजे दीडपट होते.
3)      जीवनसत्त्वे: फोलिक असिडब-12 या जीवनसत्त्वांची गरज दुप्पट ते तिप्पट होते. ही जीवनसत्त्वे स्वतःच्या रक्तवाढीसाठी, गर्भाच्या पहिल्या 3 महिन्यातील योग्य वाढ व विकासासाठी व गर्भाच्या रक्तनिर्मिती व रक्तवाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. इतर जीवनसत्त्वांची गरज अंदाजे दीडपट होते.
4)      कर्बोदके, स्निग्ध पदार्थ,पाणी यांची गरज अंदाजे दीडपट होते.
5)      याशिवाय या काळात संडास साफ होणे, संडासला खडा न होणे व संडास करताना कुथायला न लागणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी आहारात चोथा/तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असणे आवश्यक आहे.     

जगात निरनिराळे लोक निरनिराळ्या अनेक प्रकारचे आहार घेतात. त्यामुळे सर्व स्त्रीयांसाठी गर्भारपणातील व बाळंतपणानंतरचा एकच आहार ठरवून देणे अवघड आहे. त्यातही मांसाहार व संपूर्ण शाकाहार हा भेद लक्षात ठेवून आहार ठरवणे महत्त्वाचे आहे.
पुढे उदाहरणार्थ एक प्रकारचा आहार मुख्यत: भारतीय व विशेषतः महाराष्ट्रीय स्त्रीयांसाठी सुचवला आहे. त्यात प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या गरजेप्रमाणे बदल करणे शक्य आहे. पण तो बदल स्वतःच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच करावा.
रोजचा आहार

वेळ


सकाळी 6/7
सकाळचे पेय
1 कप चहा / कॉफी – ½ कप दूध + 1 चमचा साखर/गूळ
सकाळी 8-30
नाष्टा
1 कप दूध – 1 चमचा साखर
पोहे/उपमा/सांजा/दलिया + पाव वाटी मोडाचे कडधान्य/ शेंगदाण्याचे कूट/पनीर / मुगाची खिचडी / साबूदाणा/वर्‍याची खिचडी किंवा 1 पोळी + 1 अंडे
किंवा वरण-भात (1 चमचा तूप)
किंवा 1 थालीपीठ/स्नॅक्स
दुपारी 12
जेवण
1 वाटी भात (1 चमचा तूप), 2 पोळ्या,
1 वाटी मोडाच्या कडधान्याची उसळ/घट्ट वरण/डाळ किंवा मासे/चिकन
1 वाटी हिरवी पालेभाजी/भाजी
½ वाटी कोशिंबीर/सॅलेड
½ वाटी दही
संध्याकाळी 4
संध्यकाळचे पेय
1 कप चहा / कॉफी – अर्धा कप दूध + 1 चमचा साखर/गूळ
संध्याकाळी 6
नाष्टा
1 कप दूध – 1 चमचा साखर
पोहे/उपमा/सांजा/दलिया + पाव वाटी मोडाचे कडधान्य/ शेंगदाण्याचे कूट/पनीर / मुगाची खिचडी / साबूदाणा/वर्‍याच्या तांदळाची खिचडी
किंवा 1 पोळी + 1 अंडे + ½ वाटी कोशिंबीर
किंवा 1 डिंकाचा लाडू + फराळाचे पदार्थ
किंवा 1 थालीपीठ/स्नॅक्स
1 फळ
रात्री 9
जेवण
1 वाटी भात (1 चमचा तूप), 2 पोळ्या/1 भाकरी,
1 वाटी मोडाच्या कडधान्याची उसळ/घट्ट वरण/डाळ किंवा मासे/चिकन
1 वाटी हिरवी पालेभाजी/भाजी
1 वाटी कोशिंबीर/सॅलेड
½ वाटी दही/ताक
रात्री 10
झोपताना
1 कप दूध + 1 चमचा साखर

दिवसभरात एकूण:
1)      ½ लिटर (3½ कप) दूध – नुसते, चहा-कॉफीमधील, भातावरील व ताक-दही स्वरूपातील.
2)      2 वाट्या भात+ 4-5 पोळ्या/2-2½ भाकरी (1 वाटी तयार भात = 1 पोळी = ½ भाकरी).
3)      1 वाटी डाळ/घट्ट वरण/उसळी आलटून-पालटून. शक्यतो सर्व डाळी (सालासह) व सर्व कडधान्ये (मोड आणून) वापरावी. सीझनप्रमाणे ओली कडधान्ये (मटार, ओला हरभरा, घेवडा, पावटा, चवळी, तूर इ.) वापरावी. कोशिंबीर किंवा कोणत्याही उसळीत मोडाच्या मेथ्या 2-3 चमचे घालाव्यात किंवा फोडणीत मेथ्या वापराव्यात  
मांसाहार चालत असल्यास आठवड्यातून 2-3 वेळा चिकन/मासे (कधीतरी मटण).
[प्रथिनयुक्त पदार्थ खाल्यावर सर्व आवश्यक अमीनो-आम्लांचा (प्रथिनाचे धटक पदार्थ) योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्राणीज प्रथिने (दूध, अंडे, मांस व मासे यांतील प्रथिने), सर्व आवश्यक अमीनो-आम्लांचा पुरवठा करत असल्याने, उच्च प्रतीची समजली जातात. 
वनस्पतीज प्रथिनांत (धान्ये, कडधान्ये व तेलबियांतील प्रथिने) काही आवश्यक अमीनो-आम्लांचा अभाव असतो. शाकाहारी आहारातील ही तृटी भरून काढण्यासाठी धान्य व कडधन्य या काळात 2:1 या प्रमाणात (नेहमी 3:1 या प्रमाणात) एकत्र खावे [पहा – भाजणी]; सर्व धान्ये-कडधान्ये आलटून पालटून वापरावी; आहारात तेलबियांचा (शेंगदाणे, तीळ, मोहरी, काजू-बदाम-पिस्ते) वापर करावा व कमीतकमी 2 कप दूध घ्यावे. चालत असेल तर अंडे खावे.] 
आवश्यक अमीनो-आम्ले [पहा – भाजणी]
किंमत – शेंगदाणे:काजू:बदाम:पिस्ते :: 1:10:10:14
4)      1 वाटी हिरवी पालेभाजी + 1 वाटी इतर भाजी.
सीझनमधील शक्यतो सर्व पालेभाज्या, फळभाज्या व इतर भाज्या आलटून-पालटून खाव्या.
फ्लॉवर, मुळा, नवलकोल इत्यादींची पानेही चांगली, ताजी व कोवळी असल्यास वापरावी.
पालेभाजी शक्यतो लोखंडी कढईत परतून करावी.
भाज्या योग्य प्रमाणात (जेमतेम पुरेशा) व झाकण ठेवून शिजवाव्या. (जास्त शिजवू नयेत व शिजवताना सोडा घालू नये.)
5)      1 - 1½ वाटी कच्ची कोशिंबीर/सॅलेड/रायते/भरीत – 2-3 वेळा. कच्च्या खाण्यासारख्या सर्व भाज्या/फळभाज्या/कंदे/मुळे (उदा. – काकडी, गाजर, टॉमॅटो, मुळा, कांदा, कोबी, फ्लॉवर, बीट, नवलकोल, भोपळा, वांगे सॅलेड, इ.) शक्यतो कच्याच खाव्या. जरुरीप्रमाणे त्या स्वच्छ धुवून/उकळत्या पाण्यात व लगेच बर्फगार पाण्यात बुडवून / अर्धवट वाफलून घ्याव्या.
6)      6 चमचे साखर. 
7)      1 फळ (कोणतेही).
8)      1-2 अंडी (अर्धे उकडलेले/तळलेले – पूर्ण उकडलेले/तळलेले – ऑम्लेट किंवा 1 वाटी जादा उसळ/डाळ.
9)      2 चमचे तूप + 2 चमचे लोणी + फोडणीतील तेल 4 चमचे. (किंवा 4 चमचे लोणी + 4 चमचे तेल. नुसते तूप खाऊ नये.) तीळ, जवस, अक्रोड, बदाम, इ. इतर तेलबियांचा (चटणी किंवा इतर पदार्थांत) वापर. 
10)   स्नॅक्स – कटलेट/2 बटाटेवडे/सामोसे/पॅटीस/कचोरी – हे पदार्थ घरीच करावेत व त्यात उपलब्धतेनुसार पनीर/चीझ, इतर भाज्या व मोडाची कडधान्ये (अंडी/चिकन) भरपूर घालावी. 

इतर:
1)      1 लिंबू जेवणात आणि सरबतातून.
2)      1 मूठ शेंगदाणे (शक्यतो कच्चे/हलके भाजलेले शेंगदाणे वापरावे) /डाळे-फुटाणे – नुसते किंवा भाज्या कोशिंबीरींतून. पदार्थांत नारळ किंवा सुक्या खोबर्‍याचा वापर. 
3)      ड्राय फ्रूट्‍स – खारीक/खजूर, जर्दाळू, सुके अंजीर, काजू/बदाम/पिस्ते/अक्रोड – नुसते किंवा कोशिंबीरींतून जमतील त्याप्रमाणे किंवा यांचा वापर केलेला डिंकाचा 1 लाडू.
4)      2-3 चमचे गूळ.
5)      2 चमचे मध – नुसता, दुधातून किंवा सरबतातून. 
6)      नेहमीच्या सवयीपेक्षा 2 ते 3 ग्लास पाणी रोज जादा प्यावे.

मार्गदर्शक तत्त्वे:
1)       रोज 6-7 खाण्याच्या वेळा.
2)       आठवड्याचा संतुलित आहार.
14 जेवणे –
अ)    7 वेळा डाळ/उसळ (त्यातील 2-3 वेळा मांसाहारी पदार्थ).
आ)  7 वेळा भाज्या.
इ)      7 वेळा पालेभाज्या.
ई)      14 वेळा कच्च्या कोशिंबीरी/सॅलेड्‍स/भरीत.
3)       निरनिराळे/उपलब्ध सर्व अन्नपदार्थ वापरणे – सर्व धान्ये (गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, वरई, नाचणी, मका, इ.); सर्व कडधान्ये/डाळी (तूर, मसूर, मूग, उडीद, हरभरा, वाटाणा, मटकी, चवळी, घेवडा, इ.); तूप/लोणी/सर्व तेले; सर्व भाज्या/पालेभाज्या/कंदे/मुळे; कच्च्या कोशिंबीरीचे सर्व पदार्थ; सर्व फळे; इ. आलटून पालटून वापरावी.
4)       पदार्थांचे समृद्धीकरण – पदार्थातून मिळणार्‍या मुख्य अन्नघटकाशिवाय इतर अन्नघटक पुरवणारे इतर अनेक अन्नपदार्थ तो पदार्थ तयार करताना वापरावे. उदा. – कर्बोदके पुरवणार्‍या भातात स्निग्ध पदार्थ पुरवणारे तेल (फोडणी) व प्रथिने पुरवणारी डाळ किंवा अंडी/चिकन/मटण टाकून खिचडी/बिर्याणी बनवणे.
5)       आवडी-निवडी न ठेवणे.
6)       महत्त्वाचे अन्नघटक – प्रथिने (Proteins) कॅल्शिअम, लोह, जीवनसत्त्वे – मुख्यतः फोलिक असिड.  

याशिवाय:  लोह-क्षार + फोलिक असिड + जीवनसत्त्व बी 12 असलेली गोळी; जीवनसत्त्व ची गोळी; मल्टीव्हिटॅमिनची गोळी (जीवनसत्त्व , , बी-कॉंप्लेक्स, धातूंचे क्षार, .); प्रथिनयुक्त पावडरी; . डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घ्यावे.  


- - -   * * *   - - - * * *   - - -   * * *   - - - * * *   - - - 


1 ते 18 महिन्यांपर्यंतच्या बाळाचा आहार - मार्गदर्शक तत्त्वे

मार्गदर्शक तत्त्वे सांगणारे हे वेळापत्र आहे. त्याचा उपयोग आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच किंवा त्यांनी सुचविलेल्या तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावा.
या वेळापत्रकाचा उपयोग मनाने करू नये. तसे करून काही त्रास झाल्यास त्याला डॉक्टर किंवा हे वेळापत्रक करणारे तज्ञ जबाबदार असणार / राहाणार नाहीत.  
पाच महिने  पुरे झाल्यावर खालील वेळापत्रकाला अनुसरून ( डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) वरचा आहार बाळाला सुरू करा. (वरचा आहार म्हणजे तयार फॉर्म्यूला भरलेले विकत मिळणारे डबे नव्हेत.)
एक वर्षापर्यंत आधी सुरू केलेले पदार्थ चालूच ठेवावे आणि दर आठवड्याला एक नवीन पदार्थ वाढवत न्यावा. नवीन पदार्थ सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात द्यावा आणि नंतर आठवडाभर त्याचे प्रमाण वाढवत न्यावे. त्यामुळे बाळाला नवा पदार्थ चालतो आहे का, पचतो आहे का, त्याला त्याचा काही त्रास होतो आहे का, त्याला त्या पदार्थाची अलर्जी आहे का, इत्यादी गोष्टी समजू शकतात. अशा काही गोष्टी आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.    

महिने
वेळा
पदार्थ
0 ते 5 महिने

फक्त अंगावरचे दूध
(पहा: अंगावर दूध पाजण्यासंबंधीच्या सूचना)
6वा महिना
2 वेळा
पाणी (गाळून, उकळून, गार करून), ताज्या लिंबाचे सरबत1, भाताची पेज2, वरणाचे पाणी7b, संत्र/मोसंब्याचा रस5 (गाळून) (रसाची फळे)
7वा महिना
2 वेळा
तांदूळ + मुगाच्या डाळीची पेज2-3
टॉमॅटो, गाजर, काकडीचा रस6 / सार7a
8वा महिना
3 वेळा
ज्वारीच्या पिठाची पेज2-3, नाचणीचे सत्व4, तूर/उडीद/मसूर डाळीचे पाणी7b, मोडाच्या कडधान्याचे पाणी7b,
डाळिंब, द्राक्ष, स्ट्रॉबेरीचा, इ. (रसाची फळे) फळांचा रस5
9वा महिना
3 वेळा
घट्ट पेज3, उकडला बटाटा / रताळे / फ्लॉवरचे सूप7a
पेअर / सफरचंदाचा रस5
10वा महिना
3 वेळा
अधिक घट्ट पेज3, मऊ वरण-भात, रव्याची / वरईची खीर8, स्वीट कॉर्न सूप7a
मऊ धिरडे9, इडली, उकडलेला बटाटा / रताळे / फ्लॉवर, शिजवलेली मोडाची कडधान्ये (मिक्सरमधून काढून)7b
पालेभाज्या / फळभाज्यांचे पाणी (पातळ सूप)7a
केळ, चिक्कू, पपई, आंबा (गराची फळे) – घट्ट रस5
11वा महिना
4 वेळा
मऊ वरण-भात, वरण-भाकरी किंवा वरण-पोळी मऊ कुस्करून / मिक्सरमधून काढून9. वरण7b आलटून पालटून निरनिराळ्या डाळींचे करावे.  
भाज्या/पालेभाज्या/उसळी (बीन तिखटाच्या, मिक्सरमधून काढून)7a-b,
कोशिंबीर ज्यूस6, ताक/दही12
चुरमुरे, भाजके पोहे, साळीच्या/ ज्वारीच्या लाह्या
केळ, सफरचंद, चिक्कू, पपई, आंबा, इ फळांचे बारिक तुकडे,
पूर्ण शाकाहारी असल्यास: वरणांचे व उसळींचे प्रमाण वाढवा. डाळी आणि कडधान्ये (मोड आणून) निरनिराळी आलटून पालटून किंवा मिसळून वापरावी. 
शाकाहारी नसल्यास: उकडलेल्या अंड्याचा10 पांढरा बलक, चिकन/मटण सूप7c (गाळून, बीन तेलाचे).
12वा महिना
4 वेळा
जेवताना आपल्याबरोबर घेऊन एखादा घास भरवणे.
मऊ भाकरी पोळी9 + भाजी/उसळ कुस्करून  
चिकन/मटण सूप7c + मऊ चिकन / माशाचे तुकडे11
13 ते 15 महिने
5 वेळा
आपल्याबरोबरचे जेवण वाढवत नेणे.
थालीपीठ9, धिरडे, मेदूवडा, उकडलेल्या अंड्याचा पांढरा आणि पिवळा बलक10
16 ते 18 महिने
6वेळा
आपल्याबरोबरचे जेवण वाढवत नेणे.
वरचे दूध13 चालू करणे आणि त्या प्रमाणात अंगावर पाजणे कमी करणे.
दीड वर्षानंतर
5 वर्षांपर्यंत
6 वेळा
आपल्यासारखे सर्व जेवण (महत्त्वाचे: आपण योग्य आणि चौरस आहार घेत असले पाहिजे)
सर्व वरचे दूध13   
सर्व धान्ये, सर्व कडधान्ये (ओली किंवा शक्यतो मोड आणून), सर्व भाज्या-फळभाज्या, पालेभाज्या, सर्व फळे आलटून पालटून (सीझनप्रमाणे बाजारात स्वस्त असतील ती)
त्यासाठी पहा: दीड ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार
त्यानंतर पहा: शाळेत जाणार्‍या मुलांचा आहार

अंगावर दूध पाजण्यासंबंधीच्या सूचना:
·          शक्यतो बसून अंगावर पाजावे.
·          टेकून ताठ बसून व मांडीखाली किंवा मांडीवर उशी घेऊन बाळाला वर उचलावे, स्वतः वाकू नये. वाकून पाजल्यामुळे स्तन बाळाच्या नाक व तोंडावर दाबला जाऊन त्याला श्वास घेता येत नाही व नीट पिताही येत नाही.
·          बाळाला नीट गुंडाळून एका हातावर धरावे म्हणजे नाळाचे नाक स्तनामुळे दाबले जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी दुसरा हात मोकळा राहातो
·          स्वतः शांतपणे व आनंदी राहून बाळाला पाजावे 
·          दिवसातून साधारण 6 ते 8 वेळा अंगावर पाजावे.
·          बाळ भुकेमुळे रडत असल्यासच पाजावे, इतर कारणांनी रडत असल्यास विनाकारण पाजू नये.
·          5-6 महिन्यांपर्यंत फक्त अंगावरच्या दुधाशिवाय कहीही देऊ नये. त्यानंतर अंगावर पाजणे चालू ठेवून वरचे अन्न वरील सूचनांप्रमाणे व डॉक्टरांच्या सूचनांप्रमाणे द्यावे. 

1)   लिंबाचे सरबत: एक कप पाण्यात 1 चमचा साखर आणि एक चिमूट मीठ टाका. नंतर पाणी उकळून गार करून घ्या. लिंबू धुवून कोरडे करून घ्या आणि अर्धे कापा. (कापण्याआधी सुरी धुवून, उकळत्या पाण्यात बुडवून मग वापरा.) अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस उकळून गार केलेल्या पाण्यात टाका. (चमचा धुवून, उकळत्या पाण्यात बुडवून मग वापरा. लिंबू पिळताना रसाला स्पर्ष होणार नाही याची काळजी घ्या. याप्रमाणे स्वच्छतेच्या काळज्या यापुढे बाळाचे सर्व पदार्थ बनवताना, भांडी-चमचे वापरताना आणि बाळाला भरवताना घ्या.) आधी स्वतः चव बघून मगच बाळाला पाजा.  
2)   भाताची पातळ पेज: जास्त पाणी घालून भात शिजवा आणि त्याचे फक्त पाणी काढून घ्या. जास्त घट्ट पेज हवी असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करत न्या.
मुग डाळ + तांदळाची पेज: 3 लहान वाट्या तांदूळ आणि 1 भाग मुगाची डाळ भाजून त्याचे भरड पीठ करा. 1 कप पाण्यात 2 चमचे पीठ, चवीपुरते मीठ आणि साखर घालून ते चांगले उकळा. याप्रमाणे ज्वारी-बाजरीच्या पिठाची किंवा नंतर भाजणीचीही पेज करता येईल.
3)   भाताची घट्ट पेज: घट्ट पेज करण्यासाठी तयार भातात थोडे पाणी घालून मिक्सरमधून एकजीव करून घ्या. त्यात कोणतीही डाळ, कडधान्य किंवा भाजी शिजवून, मिक्सरमधून काढून मिसळा. आता जरुरीप्रमाणे पाणी घालून, चवीपुरते मीठ घालून उकळून घ्या. घट्ट पेज घालण्याच्या वयात पेज करताना शक्यतो मिश्र पिठे (किंवा भाजणी) वापरावीत आणि त्यात 3:1 प्रमाणात डाळ किंवा मोडाचे कडधान्य आणि कोणतीतरी भाजी घालावी.
4)   नाचणीचे सत्व: नाचणीला मोड आणून आणि सावलीत वाळवून केलेल्या नाचणीच्या पिठाला नाचणीचे सत्व म्हणतात. त्यातील 3-4 चमचे पीठ 1 कप पाण्यात धालून, शिजवून त्याची पेज करता येते. किंवा कोणतीही पेज करताना त्यात ते मिसळता येते.  
5)  फळांचे रस:
पातळ (गाळून): सुरुवातीला रसाच्या फळांचे (संत्रे, मोसंबे, द्राक्षे, अननस, डाळिंब, स्टॉबेरी, इ.) रस गाळून घाला.   
घट्ट (पल्प): आठ महिने पुरे झाल्यावर गराच्या फळांचा (लेळे, चिक्कू, पपई, सिताफळ, आंबा, इ.) रस किंवा रसाच्या फळांचा रस न गाळता मिक्सरमधून एकजीव करून द्या.      
6)   फळभाज्यांचे रस: सुरुवातील  टॉमॅटो, काकडी, दुधी, इत्यादींचे तुकडे किंवा गाजर, बीट, इत्यादींचा कीस करून त्यात थोडे मीठ आणि साखर घाला. थोड्या वेळाने त्याला पाणी सुटायला लागल्यावर ते पाणी गाळून घेऊन बाळाला द्या. 8 महिन्यांनंतर वरील फळभाज्यांचा थोडा भाग मिक्सरमधून काढून ज्यूसमधे मिसळावा.    
7)   सूप:
a)  भाज्यांचे सूप:
पातळ (गाळून): फळभाजी किंवा पालेभाजी बारीक चिरून 1 मिनिट उकळा. त्यात चवीपुरती साखर आणि मीठ घालून गाळून पाणी बाळाला पाजा किंवा त्याच्या पातळ पेजेत मिसळा. नंतर आपल्यासाठी केलेली कोणतीही पातळ भाजी (त्यात तिखट-मसाला घालण्याआधी) गाळून त्यातील हवे तेवढे पाणी आपण बाळाला पाजू शकतो.     
घट्ट (न गाळता): आपल्यासाठी केलेली कोणतीही पातळ भाजी (त्यात तिखट-मसाला घालण्याआधी) हवी तेवढी काढून, मिक्सरमधून मऊ करून बाळाला पाजा किंवा त्याच्या वरणभातात मिसळा.     
b)  डाळी-कडधान्यांचे सूप: भाज्यांच्या सूपप्रमाणेच कोणत्याही डाळीचे/मोडाच्या कडधान्याचे पातळ (कडधान्याचे पाणी) किंवा घट्ट (वरण) सूप करता येते. नंतर कोणत्याही डाळीची आमटी किंवा मोडाच्या कडधान्याची उसळ (त्यात तिखट-मसाला घालण्याआधी) हवी तेवढी काढून, मिक्सरमधून मऊ करून बाळाला पाजा किंवा त्याच्या भातात-पोळीत मिसळा.  
c)  चिकन/मटणचे सूप (गाळून): चिकन किंवा मटण शिजल्यावर त्याचे पाणी गाळून घ्या. त्यात चवीपुरते मीठ-साखर घालून थंड करा (नंतर फ्रीजमधे ठेवा). वरचे तेल-चरबी घट्ट झाल्यावर खालचे पाणी काढून हवे तेवढे गरम करून बाळाला पाजा किंवा त्याच्या वरणभातात मिसळा.   
8)   खीर: रवा थोड्या पाण्यात शिजवून त्यात शक्यतो गूळ किंवा मध आणि जरुरीप्रमाणे पाणी घालून उकळी आणून पाण्यातील खीर तयार करा. रव्याऐवजी वरई, नाचणीचे सत्व, तांदूळ किंवा तांदूळ + मूगडाळीचे भरड पीठ यांपैकी कशाचीही खीर करता येईल. एक वर्षानंतर साबूदाणा, गव्हले किंवा शेवयांची खीरही देता येईल व खिरीत दूधही घालता येईल.
9)   धिरडे, मऊ भाकरी, पोळी किंवा थालीपीठ मऊ कुस्करून त्यात वरण, पातळ भाजी किंवा दूध घालून 8 महिन्यांनंतर द्या व लहान तुकडे न कुस्करता 10व्या महिन्यापासून (मुलाचे दात शिवशिवायला लागल्यावर व हिरड्या घट्ट झाल्यावर) द्या.  
10) अंडे: 10 महिने पूर्ण झाल्यावर 3 मिनिटे उकडलेल्या अंड्याचा फक्त पांढरा बलक आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 मिनिटे उकडलेले अंडे (पिवळ्या बलकासह) आपण बाळाला देऊ शकतो.
अंडे पूर्ण बुडेल इतके पाणी घालून उकडत ठेवा. पाण्याला उकळी फुटताच गॅस बारीक करा व बरोबर 3 मिनिटांनी बंद करा. पाणी ओतून द्या. अंडे गार झाल्यावर ते सोलून त्यातला फक्त पांढरा बलक बाळाला द्या. तो शहाळ्यातील मलईसारखा मऊ व पचायला सोपा असतो.
पहिल्या दिवशी त्यातील अगदी छोटा तुकडा बाळाला द्या. काही त्रास न झाल्यास प्रमाण रोज थोडे थोडे वाढवत न्या. 15 दिवसांनंतर बाळाला एका अंड्यातील पांढरा बलक आपण रोज देऊ शकतो.
1 वर्षानंतर 5 मिनिटे उकडलेले एक अंडे आठवड्यातून 5 वेळा द्या. 15 महिन्यांनंतर आपण ऑम्लेटही देऊ शकतो. 
11) चिकन/मटण/मासे: बोटांनी कुस्करता येण्याइतक्या अगदी मऊ शिजलेल्या मांसाचा अगदी लहान तुकडा प्रथम देऊन त्रास होत नसल्यास नंतर प्रमाण थोडे-थोडे वाढवा.
प्रथम चिकन किंवा मासे द्या. 15 महिन्यांनंतर मटण द्या. नंतर घरी मांसाहारी पदार्थ केला जाईल त्या दिवशी त्याचे अळणी पाणी व त्यातील मऊ भाग (तेल व मसाला-तिखट वगळून) बाळाला द्या.    
12) ताक/दही: हे बाळाला 9व्या महिन्यापासून देता येते.  दोनदा साय काढलेल्या दुधाला रात्री विरजण लावा. सकाळी ते फ्रीजमधे ठेवा. नंतर 1 दिवस त्यातील थोडे थोडे (जरुरीप्रमाणे) खोलीच्या तापमानाला आणून वापरा. किंवा आंबट नसलेले ताक – चवीपुरते मीठ-साखर घालून पाजावे/भातात घालून द्या.
13) वरचे दूध: खिरीच्या स्वरूपात थोडे वरचे दूध दिवसातून एक-दोन वेळा एक वर्षानंतर चालू करता येईल. पण अंगावर भरपूर दूध येत असल्यास अंगावरच्या दुधाऐवजी वरचे दूध दीड वर्षापर्यंत सुरू करू नये. गरज असल्यास आधीपासून वरचे दूध द्यायचे असल्यास व त्यासाठी बाटली वापरायची असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्यतो कधीही बाटली वापरू नका.
सुरुवातील अर्धा कप दूध (दोनदा साय काढलेले किंवा लो-फॅट), अर्धा कप पाणी आणि 1 चमचा साखर मिसळून, उकळून, कोमट करून व गाळून त्यातील थोडे दूध पाजा. त्रास (मुख्यतः संडासचा) होत नसल्यास हळूहळू पाण्याचे प्रमाण कमी करत न्या.
दीड वर्षानंतर अंगावरच्या दुधाऐवजी 1 वेळ वरचे दूध पाजा. एक आठवड्यानंतर 2 वेळा 12 तासांच्या अंतराने पाजा. याप्रमाणे दर आठवड्याला अंगावरच्या दुधाऐवजी वरच्या दुधाची एक एक वेळ वाढवत न्या.
नंतर रोज एकूण 3 कप किंवा अर्धा लीटरपेक्षा जास्त दूध देऊ नये.
2 वर्षांपर्यंत रोज 1-2-3 वेळा (गरजेप्रमाणे – मुख्यतः रात्रीचे) अंगावर पाजणे चालू ठेवले तरी चालेल.
खालील पदार्थ शक्यतो देऊ नयेत:
            बाहेरचे / विकतचे तयार अन्नपदार्थ, हॉटेलमधले पदार्थ, तयार पेये/ज्यूस, मैद्याचे पदार्थ (ब्रेड, बिस्किटे, खारी, टोस्ट, पिझ्झा, इ.)
खालील पदार्थ कधीच देऊ नयेत:

शिळे पदार्थ, तिखट-मसालेदार पदार्थ

1 comment:

  1. खुप छान .one more thing needed
    1.addition of at least 10 fenugreek seeds daily
    2. Sesame seeds तिळाची चटणी
    ३ जवस चटणी वा सुक्या खोबर्यासोबत गुळ घालून लाडू ।

    ReplyDelete