OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Classification

पदार्थांचे वर्गीकरण 

या ब्लॉगवर एखाद्या पाककृतीचे वर्णन करताना आपण शाकाहारी / मांसाहारी,  पाककृती-प्रकार-वर्गीकरण, आहार-वर्गीकरण व वेळ-वर्गीकरण वापरणार आहोत. इतर वर्गीकरणासाठी लेबल्सचा वापर करणे सोयीचे होईल. म्हणून आपण एखाद्या पदार्थासाठी त्यातील मुख्य रंग, मुख्य चवी, देश-प्रदेश (देशाचा वेगळा उल्लेख नसल्यास तो पदार्थ भारतीय असेल) व वाढण्याचे तापमान या लेबल्सचा उपयोग करणार आहोत.
कुठल्याही एका प्रदेशात, एका संस्कृतीतही आपण अनेक प्रकारचे अनेक पदार्थ खात असतो. वाढत्या संपर्काबरोबर, दळणवळणाबरोबर, संवादबरोबर अनेक प्रदेशांतील अनेक संस्कृती एकत्र येताना व एकमेकांत मिसळताना आपल्या खाण्यांतले पदार्थही एकमेकंत मिसळतात व त्यांची संख्याही वाढत जाते. इतर संस्कृतींतील पदार्थ मग हळूहळू आपल्या खाद्यसंस्कृतीचा भाग बनून जातात. हे होताना त्यांच्यात काही बदलही होतात (उदा. आपल्याकडील हातगाड्यांवर किंवा टपर्‍यांत मिळणारा चायनीज्‌ फ्राईड राईस, जैन पाव-भाजी, इ.). शिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणं, प्रसंगाप्रमाणे किंवा नाईलाज म्हणून मूळ पदार्थात काही बदल किंवा प्रयोग करत असतो. त्यातून काही वेळा नवीनच पदार्थ निर्माण होतो.
अशा अनेक पदार्थांचा विचार करताना गोंधळ होऊ नये म्हणून त्यांचं काही वर्गीकरण करणं आवश्यक असतं. परंतु वर्गीकरण सोयीसाठी केलेलं असल्यानं त्यांतील गट एकमेकांपासून पूर्णतः भिन्न असत नाहीत आणि एकाच पदार्थाचा समावेश अनेक गटांत होतो.
काही निकष लावून त्यानुसार वर्गीकरण करताना कोणता निकष लावला आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे. यांपैकी काही प्रकारांनी वर्गीकरण करण्याचा हा प्रयत्न.

A)   शाकाहारी / मांसाहारी: पदार्थ करताना वापरलेला खाद्यपदार्थ वनस्पतीजन्य आहे का प्राणिजन्य आहे याप्रमाणं केलेलं वर्गीकरण.
शाकाहार व मांसाहार याविषयी भारतीयांच्या विशिष्ट कल्पना आहेत. भारतात पूर्णतः वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या पदार्थालाच शाकाहार (ज्यात प्राणीजन्य खाद्यपदर्थ नाही असा आहार) म्हणतात. पदार्थात एकही प्राणीजन्य खाद्यपदर्थ असला तरी त्याला मांसाहार समजलं जातं. इतकंच नव्हे तर प्राणीजन्य पदार्थ शिजवण्यासाठी/वाढण्यासाठी वापरलेल्या भांड्यांचा उपयोगही शाकाहारी पदार्थ शिजवण्यासाठी, ठेवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी केला जात नाही. याला सामाजिक, (खाद्य) सांस्कृतिक आणि धार्मिक संदर्भ असल्यानं शाकाहाराचा हा अर्थ आपल्या मनात खोलवर रुजलेला आहे.  
याउलट पदार्थामधे वनस्पतीजन्य खाद्यपदार्थाचा वापर केल्यास त्याला इतर देशांमधे शाकाहारी पदार्थ (ज्यात वनस्पतीजन्य खाद्यपदर्थ आहे असा पदार्थ) समजलं जातं. यामुळे भारतातील (विशिष्ट वार व महिने मांसाहारासाठी निषिद्ध मानणार्‍या) मांसाहारी लोकांचीसुद्धा परदेशात पंचाईत होते.
इथं अर्थातच हे वर्गीकरण आपल्या भारतीय अर्थानुसार केलं आहे. त्यामुळे (दूध सोडून) अंड्यासकट सर्व प्राणीजन्य खाद्यपदार्थांचा वापर केलेल्या सर्व पदार्थांचा समावेश आपण मांसाहारात केला आहे. 

B)    तापमान वर्गीकरण:
वाढताना आणि खाताना एखादा पदार्थ कोणत्या तापमानाला असावा त्यानुसार हे वर्गीकरण केलं जातं. ते पुढीलप्रमाणे -
बर्फाप्रमाणं गार / गार / कोमट / गरम / उकळता.
खाद्या पदार्थाची वव तीच असली तरी तो वेगवेगळ्या तापमानाला खाल्ला असता वेगवेगळा लागतो. याची अनेक कारणे आहेत (त्यात खोलात शिरायला नको). पण म्हणून महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पदार्थ योग्य तापमानाला खाल्ला तरच त्याचा जास्तीत जास्त चांगला आस्वाद घेता येतो. त्यामुळे तो कोणत्या तापमानाला वाढायचा हेही महत्वाचे आहे.
अनेक गोड पेयं (पाण्यातील सरबतं, फळांचे रस, दुधातील पेयं मिल्क शेक, इ.), कोशिंबीरी, सॅलेड्‌स (भाज्यांची व फळांची) इ. पदार्थ बर्फाप्रमाणं गार/गार खाल्ले जातात. गारपणामुळं त्यांचा ताजेपणा, टवटवीतपणा, कच्चेपणा, कुरकुरीतपणा, रंग, ताजेपणाचे स्वाद व जीवनसत्वं राखली जातात (पाण्यात विद्राव्य सर्व जीवनसत्वं उष्ण्तेने नाश पावतात).
ताक/दह्याचा वापर केलेले पदार्थही गार खाल्ले जातात (कढीचा अपवाद वगळून). त्यामुळं त्यांतील उपयुक्त जंतू राखले जातात.
आंबट व तुरट चवी सहजच गारपणाशी जुळतात. त्यामुळं या चवींचे पदार्थ सहसा गार खाल्ले जातत. तिखटपणा गरमपणाशी जुळतो त्यामुळं तिखट पदार्थ सहसा गरम खाल्ले जातात. गोड व खारट या मूळ चवी (पहा चव-वर्गीकरण) कोणत्याही तापमानाला चांगल्या लागतात.  
सार व सूप्स सहसा गरम/उकळती प्याली जातात. त्यामुळं त्यातील भाज्यांचे व मसाल्यांचे सौम्य स्वाद उठून येतात व वाफेबरोबर सगळीकडे दरवळतात. पण काही सारं (सोलकढी, कढण, इ.) गार प्याली जातात.
शिजवून/तळून/भाजून केलेले पदार्थ केल्याकेल्या लगेच गरम असताना खाल्ले जातात (खावेत). अशा पदार्थांचे शिजवलेले, तळलेले, भाजलेले वास व ताजी चव या वेळी प्रामुख्याने जाणवते (ती चव थंड पदार्थाला तर नाहीच पण नंतर पुन्हा गरम केलेल्या पदार्थालाही येत नाही). या पदार्थांतील मसाल्यांचे वास या वेळी जास्तीतजास्त उठून येतात व दरवळतात. शिवाय या वेळी हे पदार्थ पूर्ण जंतुरहित असतात.
दुधाचे पदार्थ सर्व तापमानांना चांगले लागतात (बिघडले नसतील तर).
काही अपवाद वगळता कोमट पदार्थ तितके चांगले लागत नाहीत. पण लहान मुले, वृद्ध व आजारी माणसांना ताजं पण कोमट अन्न द्यावं.


C)   रंग-वर्गीकरण:
पिवळा, केशरी, लाल, तपकिरी, हिरवा, किरमिजी, जांभळा, निळा, पांढरा, बहुरंगी.
पदार्थ करताना वापरलेल्या मुख्य खाद्यपदार्थामुळं पदार्थाला रंग येतो. पदार्थाचे मुख्य रंग एक किंवा दोन (क्वचित तीन) असतात व पदार्थाची आकर्षकता वाढवण्यासाठी त्यात पूरक किंवा विरोधी रंगसंगती साधणारे एक-दोन पदार्थ घातलेले असतात. परंतु असे पदार्थ घालण्याचा मुख्य हेतू पदार्थाची अन्न म्हणून गुणवत्ता वाढवणं व चव-स्वाद वाढवणं हे असतात.
शिवाय पदार्थातील नैसर्गिक रंगद्रव्यं जीवनसत्वं व अ‍ॅंटी-ऑक्सिडंट म्हणूनही काम करतात. म्हणून पदार्थ व आहारात अनेक रंगांचा समावेश असावा (पण नैसर्गिक रंग असलेले खाद्यपदार्थच वापरावे). याच कारणासाठी मूळ रंग बदलेल इतका पदार्थ शिजवू नये (त्यामुळे जीवनसत्वं नाश पावतात).
पदार्थ केवळ रंगीत करण्यासाठी रंग वापरू नयेत व खाद्य असले तरीही कृत्रिम रंग वापरू नयेत. काही रंग दिसायला छान दिसले तरी त्या रंगाचे पदार्थ खावेसे वाटत नाहीत (उदा. गडद निळा, जांभळा पण या रंगांच्या फिकट छटांची पेयं, आईसक्रीम्‌स आईसिंग चालतात). स्वच्छ पांढर्‍या रंगाचे पदार्थ (विशेषतः हृद्रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलपणा असलेल्यांसाठी) आरोग्यासाठी हानिकारक असतात.   

D)   चव-वर्गीकरण:
आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू, गोड.  
या सहा चवी आपण मानत असलो तरी त्यातील फक्त आंबट, खारट, कडू व गोड याच खर्‍या व मुख्य चवी आहेत (त्यांना संवेदनक्षम विशिष्ट ग्राहक जिभेवर असतात). दाह होणं किंवा गरम वाटणं या संवेदनेला आपण तिखट चव म्हणत असलो तरी ती सर्वसाधारण दाह होण्याची संवेदना आहे (तिखट पदार्थामुळे डोळे, त्वचा, तोंड, अन्नमार्ग, मूत्रमार्ग, इ. ठिकाणातील सर्वच आवरणांचा सारख्याच प्रकारे दाह होतो). तसंच आवरण आवळलं/आक्रसलं गेल्याच्या सर्वसाधारण संवेदनेला तुरट चव मानलं जातं.
याशिवाय गरम/गार या चवी नसल्या तरी या तापमानाच्या संदर्भातील संवेदना इतर चवींच्या आकलनावर परिणाम करतात.
पदार्थ सहसा मिश्र चवीचे असतात. म्हणून चव-वर्गीकरण शुद्ध चवींत करता येत नाही. मिश्र चवींच्या गणिती वर्गीकरणात अनेक शक्यता निर्माण होतात. परंतु प्रत्यक्षात त्यांतील काहीच चवींचे पदार्थ खाण्यात येतात.  इतर शक्यता केवळ गणिती शक्यता आहेत. उदा. फक्त आंबट-कडू, तिखट-तुरट, तुरट-कडू-गोड किंवा तिखट-तुरट-कडू असे पदार्थ नसतात.  
चव-वर्गीकरण पुढीलप्रमाणे (फक्त गणिती शक्यता लाल अक्षरांत)
चव नसलेले पदार्थ: जेवणातील मुख्य पदार्थ (भात, भाकरी-रोटी-ब्रेड, वरण इ.). यांच्याबरोबर इतर चवदार पदार्थ तोंडी लावून खाल्ले जातात. यांना कोणतीच चव प्रामुख्याने नसल्यानं यांना बेचव म्हटलं आहे. वस्तुतः कोणताच पदार्थ पूर्णपणे बेचव असत नाही. 
एक चवीचे पदार्थ: वरील पदार्थ करताना त्यांत काही वेळा थोडं मीठ किंवा साखर/गूळ घातल्यास ते एक चवीचे पदार्थ होतात.
दोन चवींचे पदार्थ: (कोशिंबीरी, फ्रुट-सॅलेड्‌स, मुरंबे, गोड पदार्थ, सारं आणि सूप्स)
आंबट-खारट, आंबट-तिखट, आंबट-तुरट, आंबट-कडू, आंबट-गोड, खारट-तिखट, खारट-तुरट, खारट-कडू, खारट-गोड, तिखट-तुरट, तिखट-कडू, तिखट-गोड, तुरट-कडू, तुरट-गोड, कडू-गोड (मेथीचे लाडू), इ.
तीन चवींचे पदार्थ: (सर्वसाधारण अनेक पदार्थ)
आंबट-खारट-तिखट, आंबट-खारट-तुरट, आंबट-खारट-कडू, आंबट-खारट-गोड, आंबट-तिखट-तुरट, आंबट-तिखट-कडू, आंबट-तिखट-गोड, आंबट-तुरट-कडू, आंबट-तुरट-गोड, आंबट-कडू-गोड, खारट-तिखट-तुरट, खारट-तिखट-कडू, खारट-तिखट-गोड, खारट-तुरट-कडू, खारट-तुरट-गोड, खारट-कडू-गोड, तिखट-तुरट-कडू, तिखट-तुरट-गोड, तुरट-कडू-गोड, इ.
चार चवींचे पदार्थ: (निरनिराळ्या भाज्या, काही कोशिंबीरी, लोणची-चटण्या, सारं आणि सूप्स)
आंबट-खारट-तिखट-तुरट, आंबट-खारट-तिखट-कडू, आंबट-खारट-तिखट-गोड, आंबट-खारट-तुरट-कडू, आंबट-खारट-तुरट-गोड, आंबट-खारट-कडू-गोड, आंबट-तिखट-तुरट-कडू, आंबट-तिखट-तुरट-गोड, आंबट-तिखट-कडू-गोड, आंबट-तुरट-कडू-गोड, इ.
पाच व सहा चवींचे पदार्थ: (पंचामृते)
आंबट-खारट-तिखट-तुरट-कडू, आंबट-खारट-तिखट-तुरट-गोड, आंबट-खारट-तिखट-कडू-गोड, आंबट-खारट-तुरट-कडू-गोड, आंबट-तिखट-तुरट-कडू-गोड, खारट-तिखट-तुरट-कडू-गोड व (सर्व सहा चवींचे) आंबट-खारट-तिखट-तुरट-कडू-गोड पंचामृत

वरील वर्गीकरण व उदाहरणांवरून लक्षात येईल की पदार्थांचे खारट व गोड असे चवीनुसार मुख्य दोन गट करता येतील. फक्त खारट किंवा गोड चवीचा पदार्थ खाता येतो. पण फक्त आंबट, तुरट, कडू किंवा तिखट चवीचा पदार्थ खाता येत नाही. पदार्थ खाण्यासारखा होण्यासाठी त्यात जोडीला खारट किंवा गोड चव लागतेच. (नुसत्या एका चवीचा खाद्यपदार्थ फक्त चाखून बघता येतो उदा. लिंबू, मिरची, तुरटी किंवा कार्लं.) 
सहसा प्रत्येक पदार्थ म्हणजे तीन-चार चवी आणि स्वादांचे पूरक व अनुरूप साहचर्य असते. सोयीसाठी आपण पदार्थाला (त्यातील मुख्य चवीनुसार) तिखट, गोड आंबट वगैरे म्हणत असतो.

E)    गंध-स्वाद-वर्गीकरण:
गंध-स्वाद असंख्य प्रकारचे असल्याने हे वर्गीकरण करणे अशक्य आहे. त्याचा वापर आपण करणार नाही.

F)    खाद्यपदार्थ-वर्गीकरण:
वापरलेल्या मुख्य खाद्यपदार्थाप्रमाणं हे वर्गीकरण केले जाते.
उदा. वांग्याचे पदार्थ, बटाट्याचे पदार्थ, चिकनचे पदार्थ, हरभरा-डाळीचे पदार्थ, तांदळाचे पदार्थ (यांत भाताच्या प्रकारांबरोबर तांदळाची धिरडी, तांदळाची खीर, इडली अशा पदार्थांचा समावेश होतो), इ.

G)  प्रदेश-वर्गीकरण:
एखादा पदार्थ कोणत्या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे (तो कोणत्या प्रदेशात-देशात निर्माण झाला, विकसित झाला व जास्त प्रमाणात केला-खाल्ल जातो) त्यानुसार हे वर्गीकरण केले जाते. आता देश-प्रदेशातील संपर्कात वाढ झाल्यामुळे पदार्थ जास्त प्रमाणात कुठे केला-खाल्ल जातो याचे महत्त्व कमी झाले आहे. त्याचप्रमाणे बर्‍याच पदार्थांच्या चवीही बदलल्या/मिसळल्या आहेत.
जातींप्रमाणेही ठळक वैशिष्ट्ये असलेल्या पाककृती आहेत. पण आता त्यांचा ठळकपणा कमी झाला आहे आणि त्या इतर जातींतही आवडीने खाल्ल्या जातात. उदा. मराठी (मराठा जातीत केले जाणारे पदार्थ), कोकणस्थ ब्राह्मणी, देशस्थ ब्राह्मणी, सारस्वत, सी.के.पी., इ.    
प्रदेश-वर्गीकरण पुढीलप्रमाणे -
महाराष्ट्रीय: पश्चिम-मध्य महाराष्ट्रीय, वर्‍हाडी, खानदेशी, कोकणी, कोल्हापुरी.

H)  भारतीय पदार्थांचे वर्गीकरण:
भारतात प्रत्येक राज्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आढळतात. त्यातील काही प्रमुख व प्रसिद्ध प्रकार पुढीलप्रमाणे -
महाराष्ट्रीय, दक्षिण भारतीय, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मारवाडी (राजस्थानी), काश्मिरी, मोगलाई.

I)      देश-वर्गीकरण:
भारतात ज्याप्रमाणे असंख्य प्रकारच्या पाककृती आढळत असल्या तरी सर्वांचे मिळून एक भारतीय वैशिष्ट्य आढळते त्याप्रमाणेच निरनिराळ्या देशांतील पाककृतींत देशवैशिष्ट्य आढळते. जागतिक पातळीवर पुढील देशविशिष्ट पाककृती प्रसिद्ध आहेत. 
भारतीय, इटालियन, मेक्सिकन, चायनीज्‌, थायी, जपानी, फ्रेन्‍च, ब्रिटिश, कॉन्‍टिनेंटल.

J)     पाककृती-प्रकार-वर्गीकरण:
सर्वसाधारणतः पाककृती कशा प्रकारची आहे किंवा एखादी पाककृती कुठे शोधायची याच्या मार्गदर्शनासाठी हे वर्गीकरण उपयुक्त असल्याने सहसा प्राथमिक वर्गीकरण म्हणून वापरले जाते. ते पुढीलप्रमाणे - 
इतर वेळच्या खाण्याचे पदार्थ पेय, सार-सूप, आरंभक (Starters), फरसाण, चटपटा पदार्थ, नाष्ट्याचा पदार्थ, फराळाचा पदार्थ, स्नॅक्स, इ.
जेवणातले मुख्य पदार्थ - भाताचा प्रकार, रोटीचा प्रकार, पालेभाजी, फळभाजी, उसळ, आमटी, कोशिंबीर, गोड पदार्थ (पक्वान्न) इ.
जेवणातले इतर पदार्थ चटणी, लोणचे, सॉस, पापड, तळण, आणि इतर
K)   आहार-वर्गीकरण:
एका वेळच्या आहारात/जेवणात किती पदार्थांचा समावेश केला जातो त्यानुसार हे वर्गीकरण केले आहे. सध्याच्या धावपळीच्या व बदलत्या सामाजिक परीस्थितीच्या युगात झटपट करता येणार्‍या व कमी पदार्थांचा समावेश असलेल्या आहारांना (फस्ट फूड्‌स) विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु असे आहार संतुलित कसे होतील हे पाहाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी या पदार्थांच्या पारंपारिक पाककृतींत बदल करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांमुळे कुपोषण होण्याची भिती असते.
आहार-वर्गीकरण पुढीलप्रमाणे -
एक-पदार्थ आहार, दोन-पदार्थ आहार, तीन-पदार्थ आहार, चार-पदार्थ आहार (पूर्ण जेवण), पाच-ते-आठ-पदार्थ आहार (पूर्ण जेवण).

L)    वेळ-वर्गीकरण:
कोणताही पदार्थ कधीही खाता येत असला तरी सर्वसाधारणपणे प्रत्येक पदार्थ खाण्याची एक वेळ ठरलेली असते. ती पदार्थाचे आहार-मूल्य, त्यात वापरलेले खाद्यपदार्थ, चव-स्वाद, खाण्याचे तापमान व शरीराची गरज यांनुसार ठरते. (याप्रमाणे बरेच पदार्थ खाण्याचे ऋतूही ठरलेले असतात. पण त्याचा विचार इथे केलेला नाही)
पदार्थ खाण्याच्या वेळेनुसार केलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे
सकाळचा चहा/कॉफी, नाष्टा, सकाळचे जेवण, दुपारचे जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे खाणे, रात्रीचे जेवण, डिनर.

M) विशेष आहार:
वय, लिंग, विशेष गरजा व आरोग्य-पातळी यांनुसार आहारात बदल करावे लागतात किंवा विशेष आहार घ्यावे लागतात.
त्यांपैकी मध्यम शारीरिक काम करणार्‍या निरोगी व सक्षम प्रौढाने (स्त्री किंवा पुरुष) आरोग्य व क्षमता राखण्यासाठी ध्यायला हवा अशा सर्वसाधारण आहाराला चौरस (संतुलित) आहार म्हणता येईल (तोही वाढत्या वयाबरोबर, कमीजास्त कामाबरोबर, ऋतूप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत असतो). त्याची माहिती, इतर विशेष आहारांची माहिती व अशा आहारांसाठी उपयुक्त पदार्थांच्या पाककृती (किंवा नेहमीच्या पाककृतींत करायचे बदल) या सदरात दिल्या आहेत.
सर्वसाधारण पदार्थांच्या पाककृती व ते पदार्थ (वेगळा किंवा धोक्याचा उल्लेख केला नसल्यास) संतुलित आहारात समावेश करण्याजोगे आहेत व निरोगी व्यक्तीने खाल्ल्यास हरकत नाही असे समजावे.

असे विशेष आहार पुढीलप्रमाणे -
·         चौरस (संतुलित) आहार
·         मुलांचा आहार: १/२ ते २, २-५, ५-१२ या वयोगटातील मुलांचा आहार
·         पौगंडावस्थेतील मुले-मुली यांचा आहार
·         गर्भारपणातील आहार
·         स्तनपान देतानाच्या काळातील आहार
·         वृद्धापकाळातील आहार
आजार आणि विकार यांनुसार आहारात बदल करावे लागतात किंवा विशेष आहार घ्यावे लागतात ते पुढीलप्रमाणे.
·         पोषक आहार: वजन वाढवणे, तब्बेत सुधारणे, शरीर कमावणे, आजारातून उठताना, इत्यादीसाठी आहार
·         विशेष आजारांसाठी आहार
·         विशेष विकारांसाठी आहार
·         स्थूलपणा: वजन कमी करण्यासाठी आहार
·         मधुमेहासाठी आहार
·         उच्च-रक्तदाबासाठी आहार
·         हृद्‌रोगासाठी आहार
·         मूत्रपिंड-विकार, गाऊट इत्यादीसाठी आहार

या ब्लॉगवर एखाद्या पाककृतीचे वर्णन करताना आपण शाकाहारी / मांसाहारी,  पाककृती-प्रकार-वर्गीकरण, आहार-वर्गीकरण व वेळ-वर्गीकरण वापरूया. इतर वर्गीकरणासाठी लेबल्सचा वापर करणे सोयीचे होईल. म्हणून आपण एखाद्या पदार्थासाठी त्यातील मुख्य रंग, मुख्य चवी, देश-प्रदेश (देशाचा वेगळा उल्लेख नसल्यास तो पदार्थ भारतीय असेल) व वाढण्याचे तापमान या लेबल्सचा उपयोग करूया.   

--- --- --- --- *** --- --- --- *** *** *** --- --- --- *** --- --- --- 
व्यायामांचे प्रकार 
1) दमश्वास वाढवणारे व्यायाम 
2) ताकद वावणारे व्यायाम
3) चपळता वाढवणारे व्यायाम 
4) वजन कमी करणारे व्यायाम
5) लवचिकता व संतुलनासाठी व्यायाम 
6) मनाचे व्यायाम 
7) योग: