OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

आरोग्य-मापक

आरोग्य-मापक
क्षमता, सर्वसाधारण आरोग्य, आरोग्याचा एखाद पैलू किंवा आरोग्याला असलेला धोका स्वतःचा स्वतःला समजण्यासाठी; तसेच विशिष्ट आजार नसला तरीही डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे का हे समजण्यासाठी आरोग्य-मापकांचा उपयोग होतो.
यासाठी काही मोजमापे करावी लागतात. त्यातील काही स्वतःला करता येतात तर काही प्रशिक्षित परिचारकाकडून किंवा डॉक्टरकडून करून घ्यावी लागतात.
यांतील स्वतःचे स्वतःला सहज वापरता येतील असे काही आरोग्य-मापक इथे उपलब्ध करून दिले आहेत.

पोषण:
कुपोषणाइतकाच स्थूलपणाही (शरीरातील चरबीचे अतिरिक्त प्रमाण) आरोग्याला घातक आहे (स्थूलपणाही एक प्रकारचे कुपोषणच आहे) हे समजल्यावर प्राकृत पोषण किती असावे व कुपोषणाचे प्रमाण किती हे समजणे आवश्यक झाले. त्यासाठी अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मापकांचा उपयोग केला जाऊ लागला. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे.

वजन-उंची:
उंची - आई-वडिलांकडून आलेल्या अनुवंशिक गुणधर्मांनुसार व्यक्तीची जास्तीतजास्त उंची (पूर्ण वाढ झाल्यावर) गर्भधारणेच्या वेळीच ठरलेली असते. त्यापेक्षा जास्त ती वाढू शकत नाही व ती बदलणे आपल्या हातात नाही. परंतु तिथपर्यंत ती वाढणे व्यक्तीचे वाढीच्या वयातील पोषण, अंतःस्रावी ग्रंथींचे संतुलित कार्य व आरोग्य यांवर अवलंबून असते. यामुळे (विशिष्ट एकसमान परीस्थितीत व एका वयापर्यंत) उंची व्यक्तीची वाढ व सर्वसाधारण आरोग्य दर्शवते.
परंतु क्ष व्यक्तीची उंची ११० सेंमी आहे, अशा म्हणण्याला काही अर्थ नाही व त्यावरून वाढ व आरोग्यासंबंधी काही निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचे लिंग व वय (व जात, जमात, वंश, भौगोलिक/सामाजिक/सांस्कृतिक परीस्थिती, इ.) माहीत असणे आवश्यक असते. तसेच वाढ व्यवस्थित होते आहे का हे बघण्यासाठी उंची वारंवार मोजावी लागते.
यासाठी योग्य उंचीच्या तक्त्यात लिंग व वयानुसार योग्य उंचीची मर्यादा दिलेली असते. हे तक्ते अभ्यासगटाशी जुळणार्‍या व्यक्तींनाच लागू पडतात. (उदा.- पाश्चिमात्य देशातील अभ्यासावरून केलेले तक्ते पौर्वात्य व्यक्तींना लागू पडत नाहीत.)    

वजन शरीराचे वजन हाडे, स्नायू, चरबी, रक्त व इतर अवयव यांमधे विभागलेले असते. यात जास्त भाग हाडे व स्नायूंच्या (व स्थूलपणात चरबीच्या) वजनाचा असतो.
वजन व्यक्तीचे पोषण दर्शवते व उंचीप्रमाणेच तेही आरोग्याचे एक निदर्शक आहे. ते (विशिष्ट एकसमान परीस्थितीत) व्यक्तीच्या भौगोलिक-आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक परीस्थितीवर, सजगपणावर व सुजाणपणावर अवलंबून असते (म्हणजेच पोषण सुधारणे आपल्या हातात असते).
उंचीप्रमाणेच क्ष व्यक्तीचे वजन ५० किलो आहे अशा विधानावरून पोषणासंबंधी काही निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी आपल्याला व्यक्तीचे लिंग, वय, बांधा व मुख्यतः उंची माहीत असावी लागते. म्हणून योग्य वजनाच्या तक्त्यात लिंग, वय व उंचीनुसार वजनाची मर्यादा दिलेली असते. या मर्यादेपेक्षा कमी वजन कुपोषण दर्शवते व जास्त वजन (ते बहुधा वाढलेल्या चरबीचे असल्याने) स्थूलपणा दर्शवते. वाढ व पोषण व्यवस्थित होते आहे का हे बघण्यासाठी वजनही वारंवार करावे लागते.

योग्य वजन-उंची वाढीचे वय संपेपर्यंत वयानुसार उंची व वजन वाढत असल्याने वजन-उंचीचा तक्ता (किंवा आलेख) एकत्रच असतो. त्यात विशिष्ट वयात योग्य उंची व वजन किती असावे याची (मुलांसाठी व मुलींसाठी वेगळी-वेगळी) मर्यादा दिलेली असते. व्यक्तीची वजन-उंची या मर्यादेत असेल तर तिचे सर्वसाधारण पोषण व आरोग्य चांगले आहे असे समजायला हरकत नाही.
वाढीचे वय संपल्यानंतर (१८ ते २० वर्षे) विशिष्ट उंचीसाठी योग्य वजनाची (स्त्री व पुरुषांसाठी वेगळी-वेगळी) मर्यादा दिलेले तक्ते (किंवा आलेख) असतात. कारण (त्याप्रमाणे वजन योग्य असेल तर) त्यानंतर (वय वाढले तरी) आयुष्यभर वजन त्याच पातळीत रहावे अशी अपेक्षा असते. त्यात जास्त प्रमाणात बदल झाल्यास ते अनारोग्याचे लक्षण समजले जाते.
योग्य वजन-उंची बघतान हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे
·        वाढीच्या वयात उंची व वजन टप्प्याटप्प्याने वाढते (सलग वाढत नाही), मुलांत व मुलींत हे टप्पे वेगळ्या वेगळ्या वयात येतात व एका वयानंतर उंची वाढत नाही.
·        हे तक्ते विशिष्ट अभ्यासगटातील आरोग्यपूर्ण व्यक्तींच्या वजन-उंचीची सरासरी मर्यादा दर्शवतात. या अभ्यासगटातील व्यक्तींशी परीस्थितीनुसार आपले साम्य असेल तरच ते आपल्याला लागू होतात.
शेजारील तक्ते व आलेख: स्त्रोत
  • इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (I.C.M.R. 1990.)
  • www.medindia.net  
  • भारतीय स्त्री-पुरुषांची उंची व वजन भारतीय आयुर्विमा महामंडळ Standard Height and Weight for Indian Men & Women (Courtesy: LIC of India) आणि
  • http://www.food.gov.uk  

कंबर-नितंब गुणोत्तर (Waist Hip Ratio)
कंबरेचा (बेंबीच्या पातळीत) घेर व नितंबाचा (जास्तीत जास्त) घेर  यांच्या गुणोत्तराला कंबर-नितंब गुणोत्तर म्हणतात. (अधिक अचूक मोजमापासाठी वेगळे शरीरशास्त्रीय निकष लावले जातात.)
कंबर-नितंब गुणोत्तर =   कंबरेचा घेर
                        नितंबाचा घेर  
कंबर-नितंब गुणोत्तर स्त्रियांसाठी 0.7 पुरुषांसाठी 0.9 असणे हे उत्तम आरोग्य व प्रजननक्षमतेचे लक्षण आहे.
कंबरेभोवतीची चरबीची वाढ आरोग्यदृष्ट्या धोकादायक असते. सर्वसाधारण स्थूलतेपेक्षही कंबरेजवळची स्थूलता या दृष्टीने जास्त महत्त्वाची मानली जाते व म्हणून शरीर-वस्तुमानांकापेक्षा (पुढे पहा) कंबर-नितंब गुणोत्तर स्थूलतेसाठीही जास्त चांगला मापक आहे.
वरील मर्यादेपेक्षा जास्त कंबर-नितंब गुणोत्तर अनेक गंभीर आजारांचा (उदा. - उच्च रक्तदाब, हृद्रोग, मधुमेह, स्त्रियांमधे स्त्रीग्रंथीचा व पुरुषांमधे प्रोस्टेट व वृषणाचा कर्करोग, इ.) धोका वाढवते हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. म्हणून या रोगांचा धोका दर्शवण्यासाठीही हे गुणोत्तर उपयुक्त आहे.
स्त्रियांचे कंबर-नितंब गुणोत्तर 0.7 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तिच्या मुलांची आकलनक्षमता जास्त असते असाही संबंध जोडला गेला आहे.
या गुणोत्तराचा व पुरुष व मुख्यतः स्त्रियांच्या सौंदर्याचा संबंध तर सर्वज्ञातच आहे.

शरीर-वस्तुमानांक (BMI – Body Mass Index)
व्यक्तीचे वजन व उंची यांच्या सहाय्याने शरीरातील चरबीच्या प्रमाणाचा अंदाज वर्तवण्यासाठी या मापकाचा उपयोग केला जातो. हा अनुभवावर आधारित मापक असून या मापकामुळे शरीरातील चरबीचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जात नाही. पण त्यावरून आपले वजन कमी आहे (कुपोषण), योग्य आहे, जास्त आहे का अती जास्त आहे (स्थूलपणा) हे आपल्याला समजते. त्याचप्रमाणे एखाद्या गटातील (उदा. पौगंडावस्थेतील मुली) व्यक्तींच्या पोषणाची किंवा दोन गटांच्या पोषणाची (उदा. पौगंडावस्थेतील मुली व मुले) तुलना करण्यासाठी हा मापक उपयुक्त आहे. एका अर्थाने उंचीच्या प्रमाणात स्वतःचे वजन योग्य आहे का नाही ते मोजण्यासाठी व त्याचा अर्थ लावण्यासाठी हा मापक उपयुक्त आहे.

शरीर-वस्तुमानांक = वजन (किलो)
                [उंची (मी)] 2

BMI = Mass (in kg)
          [Height (in m)] 2

शरीर-वस्तुमानांक शरीर-वस्तुमानांकाच्या तक्त्यावरूनही काढता येतो.  
यावरून -

क्र.
शरीर-वस्तुमानांक
kg/m2
अर्थ
उपाय योजना
1
18.5 पेक्षा कमी
कमी वजन (कुपोषण)
विशेष कमतरता औषधे व अन्नघटकांच्या सहाय्याने भरून काढणे व पोषक आहार घेणे.
2
18.5 ते 23
योग्य वजन
पोषक आहार घेत रहाणे व पुरेसा व्यायाम करणे.
3
23.1 ते 25
जादा वजन
आहारावर नियंत्रण व भरपूर व्यायाम
4
25 पेक्षा जास्त
अती जादा वजन (स्थूलपणा)
वजन घटवणारा आहार (सल्ल्यानुसार) वजन घटवणारे व्यायाम.

वरील आकडे आशियाई लोकांसाठी आहेत. (पाश्चात्य लोकांसाठी योग्य शरीर-वस्तुमानांकाची वरची मर्यादा 25 kg/m2 आहे )

प्राईम शरीर-वस्तुमानांक (BMI Prime) –
शरीर-वस्तुमानांकात थोडा बदल करून हा मापक तयार केला आहे.
प्राईम शरीर-वस्तुमानांक म्हणजे व्यक्तीचा शरीर-वस्तुमानांक व योग्य शरीर-वस्तुमानांकाची वरची मर्यादा (23 – किंवा पाश्चात्य लोकांसाठी 25) यांचे गुणोत्तर (उदा.- व्यक्तीचा शरीर-वस्तुमानांक 17 असल्यास त्याचा प्राईम शरीर-वस्तुमानांक 17/23 = 0.74 आणि व्यक्तीचा शरीर-वस्तुमानांक 32 असल्यास त्याचा प्राईम शरीर-वस्तुमानांक 32/23=1.39). हे गुणोत्तर असल्याने फक्त अंकाच्या स्वरूपात असते (त्याला मिती व एकक नाही) व व्यक्तीच्या पोषणाचे मान एका दृष्टिक्षेपात कळते. तुलनाही सोपी होते.

क्र.
शरीर-वस्तुमानांक
kg/m2
प्राईम शरीर-वस्तुमानांक (BMI Prime)
अर्थ
1
18.5 पेक्षा कमी
< 0.8
कमी वजन (कुपोषण)
2
18.5 ते 22.9
0.81 ते 0.99
योग्य वजन
3
23.0 ते 24.9
1.0 ते 1.08
जादा वजन
4
25.0 पेक्षा जास्त
> 1.09
अती जादा वजन (स्थूलपणा)

काढण्यास, अर्थ लावण्यास व वापरण्यास सोपा असला तरी ज्या गृहीतकावर तो आधारित आहे (शरीरातील चरबीचे वजन व इतर स्नायू इत्यादीचे वजन यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते) ते दर वेळी खरे नसते व शरीरातील चरबीचे प्रमाण काढण्यासाठी हा अप्रत्यक्ष मापक आहे. (उदा.- खेळाडू, अ‍ॅथलेट्‌स, इ. यांच्यामधे वाढलेल्या वजनाचा जास्त भाग स्नायूंमुळे असतो व चरबीचे वजन कमी असते तेरीही शरीर-वस्तुमानांक जास्त येतो. याउलट कमी शारीरिक श्रम करणार्‍यांमधे शरीर-वस्तुमानांक योग्य मर्यादेत असला तरी त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असते.) ही या मापकाची मर्यादा आहे.   
याशिवाय वरील शरीर-वस्तुमानांकाच्या मर्यादांबद्दल मतभेद आहेत. उदा.- काहींच्या मते शरीर-वस्तुमानांक 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला स्थूलपणा म्हणावे. या अर्थाने शरीर-वस्तुमानांकाच्या या मर्यादा अंदाजपंचे (arbitrarily) ठरवलेल्या आहेत.
म्हणून खरा स्थूलपणा (व त्या आधारे सक्षमता) मोजण्यासाठी शरीरातील चरबीचे प्रमाण मोजले पाहिजे.

शरीरातील चरबीचे प्रमाण:  
शरीरातील चरबीपैकी थोडी (3-5% पुरुषांत व 8-12% स्त्रियांत) चरबी अत्यावश्यक (जीवन व पुनरुत्पादन कार्यासाठी) असते. उरलेल्या साठवणीच्या चरबीपैकी काही छाती व पोटातील अवयवांच्या संरक्षणासाठी आवश्यक असते. यानंतर उरलेल्या चरबीला अतिरिक्त (स्थूलपणाला कारणीभूत) चरबी म्हणता येईल. ही सर्व प्रमाणेही वय, लिंग, जमाती, रहाण्याचा प्रदेश, कामाचे स्वरूप यांनुसार बदलतात. निरनिराळ्या काळांत व प्रदेशांत सामाजिक-सांस्कृतिक संदर्भानुसार अतिरिक्त चरबीच्या योग्य प्रमाणाविषयी वेगवेगळ्या कल्पना आढतात. यांपैकी आरोग्यदृष्ट्या हानीकारक अतिरिक्त चरबी कशाला म्हणायचे याबाबत मतभेद आहेत. नवीन संशोधनानुसार सडसडीतपणा व सक्षमता आणि स्थूलपणा व मधुमेह-हृद्रोग-उच्च रक्तदाब यांची शक्यता यांमधे जवळचा संबंध आढळल्यामुळे चरबीचे प्रमाण समजणे महत्वाचे झाले आहे. 

चरबीचे टक्केवारीत प्रमाण = शरीरातील चरबीचे वजन * 100
                                 शरीराचे वजन
सर्वसाधारणपणे चरबीचे प्रमाण पुरुषांत २५%पेक्षा जास्त व स्त्रियांत ३२% पेक्षा जास्त असेल तर त्याला धोकादायक पातळीचा स्थूलपणा म्हणावे असे समजले जाते.
शरीर-मोजमाप पद्धती (Anthropometric methods): शरीराची काही मोजमापे करून ती काही सूत्रांमधे घालून त्यावरून चरबीचे प्रमाण काढता येते. कंबर-नितंब गुणोत्तर, शरीर-वस्तुमानांक (वर पहा), त्वचेच्या घडीची जाडी ही त्यांपैकी काही मोजमापे आहेत.     
त्वचेच्या घडीची जाडी: अतिरिक्त चरबी मोठ्या प्रमाणात त्वचेखाली साठवली जाते. त्यामुळे त्वचा चिमटीत पकडून तिच्या घडीच्या जाडीवरून स्थूलपणाची कल्पना येते. शरीरात निरनिराळ्या ठिकाणी त्वचेच्या घडीची जाडी निरनिराळी असते. साधारण अंदाजासाठी दंडाखाली १ सेंमी व कंबरेच्या बाजूला २ सेंमीपेक्षा जास्त त्वचेच्या घडीची जाडी असेल तर त्याला स्थूलपणा समजले जाते. जास्त अचूक मोजमापासाठी त्वचेच्या घडीची जाडी ठरलेल्या विशिष्ट (३ ते ७) ठिकाणी कॅलिपरच्या साहाय्याने मोजली जाते व ही मोजमापे सूत्रात घालून त्यावरून चरबीचे प्रमाण काढले जाते. परंतु अंदाजासाठी ठीक असली तरी या पद्धतीतही अनेक तृटी आहेत.

 

शरीरातील चरबीच्या वजनाचे अचूक मोजमाप अशक्य आहे. परंतु, शरीराची सरासरी घनता (Body average density), जैव-विद्युत प्रतिरोध (Bioelectrical impedance), परावर्तित अवरक्त किरण (Near-infrared interactance), दोन वेगळ्या ऊर्जेच्या क्ष-किरणांचे शोषण (Dual energy X-ray absorptiometry), इत्यादींची मोजमापे काही सूत्रांत घालून किंवा संगणकाच्या सहाय्याने चरबीचे प्रमाण काढणे या काही बरेच अचूक मोजमाप करणार्‍या पद्धती आहेत.

परंतु या बहुतेक पद्धती गुंतागुंतीच्या, वेळखाऊ व खर्चिक आहेत. शिवाय आपला खरा हेतू आरोग्य व सक्षमता मोजणे हा आहे व चरबी मोजणे हा त्याचा (अनेक निकषांपैकी) एक निकष आहे. त्यासाठी शरीर-वस्तुमानांक व त्वचेच्या घडीची जाडी हे निकष पुरेसे आहेत.

इतर आरोग्यमापक:

इतर अनेक आरोग्यमापक उपलब्ध आहेत. इंटरनेटवर तर असे आरोग्यमापक उपलब्ध करुन देणारी व त्यावरून आपल्या आरोग्याविषयी काही निष्कर्ष काढून देणारी अनेक संकेतस्थळे (Sites) उपलब्ध आहेत. त्यांपैकी दोन संकेतस्थळांचे दुवे (Links) आपल्या उपयोगासाठी इथे दिले आहेत. परंतु त्याचा अर्थ या संकेतस्थळांवर मिळणार्‍या सर्व माहिती व निष्कर्षांसंबंधी आम्ही खात्री देतो आहोत असा होत नाही.

 

शेजारील आरोग्यमापक: स्त्रोत

 

प्रभुणेचा आरोग्य-मापक:

आपण स्वतःला निरोगी समजत असताना प्रत्यक्षात स्वतःच्या सर्वसाधारण क्षमतेचे व आरोग्याचे आत्ताचे प्रमाण स्वतःला समजण्यासाठी हा आरोग्य-मापक सर्व प्रौढ (18+) स्त्री-पुरुषांसाठी उपयुक्त आहे. शारीरिक (व सर्व शारीर संस्थांचे, उदा.- पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था, हृदय-रक्ताभिसरण संस्था, इ.), मानसिक व काही प्रमाणात सामाजिक आरोग्य तपासणार्‍या आरोग्यविषयक (जास्तीतजास्त सर्वसमावेशक) निकषांवर हा आरोग्य-मापक आधारित आहे. परंतु हा स्वतःचा स्वतःला वापरता येणारा; कोणत्याही अवघड व तांत्रिक उपकरणांच्या वापराची जरूर नसणारा व बीनखर्चाचा आहे. तो वापरण्यासाठी, निरीक्षणे नोंदवण्यासाठी, त्यांचा अर्थ लावण्यासाठी  आणि या चाचणीच्या मूल्यमापनासाठी कोणत्याही तज्ञ व्यक्तीची किंवा डॉक्टरची जरूर नाही.
परंतु आजारी असल्यास किंवा काही त्रास होत असल्यास डॉक्टरला दाखवण्याऐवजी करण्याची ही चाचणी नाही. अशा वेळी डॉक्टरलाच दाखवा.
हा आरोग्य-मापक वापरणे अगदी सोपे आहे. यामधे सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष करून पहा. त्यावर विचारलेल्या सोप्या प्रश्नांच्या उत्तरांचे तुमचे पर्याय क्रमांक योग्य रकान्यात काळजीपूर्वक भरा. त्यानुसार तुमचे मिळालेले गुण व त्यांची बेरीज तुम्हाला लगेच मिळेल. त्यावरून तुमच्या क्षमतेचे व आरोग्याचे मान व त्यावर करायची उपाययोजना तुम्हाला समजेल.

प्रभुणेचा आरोग्य-मापक वापरताना घ्यायची काळजी   
ü      सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.
ü      उत्तरे प्रामाणिकपणे द्या. कारण हे आरोग्यमापन इतरांना किंवा स्वतःला फसवण्यासाठी नाही. तसेच रिकामा वेळ घालवण्यासाठी किंवा करमणुकीसाठी करण्याची ही गंमतही नाही.
ü      ठराविक कालावधीनंतर (उदा.- स्वतःच्या वाढदिवशी) पुनःपुन्हा आरोग्यमापन करा म्हणजे क्षमता व आरोग्यातील बदल आपल्याला समजेल.
ü      निर्णयाकडे दुर्लक्ष करू नका.
ü      सुचवलेली उपाययोजना केल्यावर पुन्हा आरोग्यमापन करा म्हणजे क्षमता व आरोग्यातील सुधारणा किंवा बिघाड आपल्याला समजेल.
ü      वैय्यक्तिक अडचणी, शंका आणि सल्ल्यासाठी rajendraprabhune@yahoo.co.in या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधा.
ü      जराही शंका वाटल्यास लगेच आपल्या डॉक्टरला दाखवा किंवा rajendraprabhune@yahoo.co.in या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधा.



हा आरोग्य-मापक वापरण्यासाठी ‘Scribd’ या संकेत-स्थळावर जा. Scribd चे मेंबर व्हा (ही मेंबरशिप मोफत आहे). या ब्लॉगवरील प्रभुणेचा आरोग्य-मापक या लिंकवरून Scribd वरील  प्रभुणेचा आरोग्य-मापक याच नावाच्या फाईलपर्यंत पोचा. तुमच्या नावाने ‘log in’ व्हा म्हणजे तुम्हाला ही फाईल मोफत डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड केलेली फाईल तुम्हाला वापरता येईल. 

 

नाडीचे ठोके:

नाडीचे दर मिनिटाला पडणारे ठोके आपल्याला सहज मोजता येतात. पण रोगांत व नैसर्गिक परीस्थितीतही त्यात इतके बदल होतात की त्यावरून काही निष्कर्ष काढणे आपल्याला सहज जमणारे नाही (ते डॉक्टरांचे काम आहे). पण पाच मिनिटे स्वस्थ बसल्यावर ते 60 ते 80 (सरसरी 70) या प्राकृत मर्यादेबाहेर असतील तर ते अनारोग्याचे लक्षण समजून डॉक्टरला दाखवणे आवश्यक आहे.   

रक्तदाब व साखरेचे प्रमाण (लघवीतील व रक्तातील):

या तपासण्या पूर्वी फक्त डॉक्टर (व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रयोगशाळा) करत असत. पण आता इलेक्ट्रॉनिक उपकरणे आल्यामुळे त्या आपल्याला स्वतःला घरच्याघरी करता येतात. उच्च-रक्तदाब व मधुमेह या दोन गंभीर रोगांच्या निदानासाठी व उपचारांदरम्यान रोग आटोक्यात आहे का हे वारंवार पाहाण्यासाठी या तपासण्यांचा उपयोग होतो. दुर्दैवाने (किंवा आपल्याच चुकीच्या जीवनपद्धतीमुळे) या रोगांचे प्रमाण आत्ताच्या काळात वाढले (व वाढत) असल्याने या तपासण्या स्वतःला करता येणे आवश्यकही झाले आहे. म्हणून त्यांचा समावेश इथे इतर आरोग्यमापकांबरोबर केला आहे.

प्राकृत रक्तदाब 120 (वरचे 110 ते 130) :  80 (खालचे 70 ते 80) या मर्यादेत असतो. 10 मिनिटे विश्रांतीनंतर रक्तदाब तपासा. तो इलेक्ट्रॉनिक उपकरणाने तपासत असल्यास शांतपणे ३ वेळा तपासा. वरचा रक्तदाब 140 च्या वर आणि/किंवा खालचा रक्तदाब 90 च्या वर असल्यास त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. असे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वयाबरोबर रक्तदाब वाढतोच व त्याकडे लक्ष देण्याची जरूर नाही हा गैरसमज आहे हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.   

रक्तातील साखरेचे प्राकृत प्रमाण उपाशीपोटी 80 ते 120 असते व साधारण याच पातळीत राखले जाते. जेवणानंतर काही वेळ ते 150 पर्यंत असू शकते. ते 70 पेक्षा कमी किंवा 180 पेक्षा जास्त असल्यास किंवा लघवीमधे साखरेचा अंश दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

वैद्यकीय व प्रयोगशाळेतील तपासण्या:

याही आरोग्यमापनासाठीच असल्या तरी त्या स्वतःला करता येत नाहीत. त्या करण्यासाठी, निष्कर्ष काढण्यासाठी व त्यांचा अर्थ लावण्यासाठी तज्ञ तंत्रज्ञ, परिचारिका किंवा डॉक्टरची जरूर असते.