OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Saturday, July 16, 2011

जांभळाचा, फणसाचा, स्ट्रॉबेरीचा, रास्बेरीचा, तुत्तूचा व अननसाचा मुरांबा (जॅम)

जांभळाचा, फणसाचा, स्ट्रॉबेरीचा, रास्बेरीचा तुत्तूचा अननसाचा मुरांबा 



प्रकार:
मुरांबा
गार
किती जणांसाठी: ?
प्रक्रिया:  कापणे, मुरवणे, उकळणे,
पौष्टिकता:
ऊर्जा
जीवनसत्त्वे
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स

वेळ:
पूर्वतयारीचा:
½ + 2 तास
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
½ तास
खाण्याचा:
१० मिनिटे ते ½ तास


 


नाव:
जांभळाचा, फणसाचा, स्ट्रॉबेरीचा, रास्बेरीचा तुत्तूचा अननसाचा मुरांबा
प्रस्तावना:
·         हा तीन-चार फळांचा मिश्र मुरांबा नसून वेगवेगळ्या मुरांब्यांची पाककृती (सोयीसाठी व मूळ कृती एकच असल्याने) एकाच ठिकाणी देत आहोत. मिश्र मुरांबे करणेही शक्य असते व ते छानही लागतात. पण या फळांचे मिश्र मुरांबे करण्यात काही अडचणी आहेत. त्या पुढीलप्रमाणे –
·         जांभळे व फणस एकाच वेळी बाजारात असतात. पण स्ट्रॉबेरीचा व अननसाचा सीझन होऊन गेल्याने (पहा – त्या वेळी आपण अननस-चीज सॅलेड केलं होतं) या वेळी अननस सहसा बाजारात दिसत नाही. (लगेच कुठूनतरी एखादा अननस आणून आम्हाला दखवू नका.)
·         स्ट्रॉबेरी व अननसाचा मुरांबा एकत्र करता येईल.
·         चुकून एका वेळी मिळाल्यास अननस-फणस जॅम (पिवळा रंग जुळल्याने) करता येतो.
·         मुख्य अडचण म्हणजे प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण तीव्र स्वाद आहेत. ते एकत्र एखाद्याला आवडतीलही (व तसा प्रयोग करून बघायलाही हरकत नाही – तुम्हीच करणार आणि तुम्हीच खाणार असाल तर). पण त्यात त्या फळाच्या विशेष स्वादावर अन्याय केल्यासारखं होईल.
·         स्वादाप्रमाणेच प्रत्येकाचे वेगळे रंग मिसळल्यावर मुरांब्याला येणार रंग कोणता असेल याकडेही लक्ष ठेवले पाहिजे.
·         रंग व स्वाद जुळणेही आवश्यक आहे. जांभळ्या रंगाच्या मुरांब्याला स्ट्रॉबेरीचा स्वाद आपल्याला कधीही आवडणार नाही.
·         तेव्हा हा स्वाद-रंग-चवीचा गोंधळ करण्याऐवजी आपण एकेका फळाचेच मुरांबे आत्ता करूया.
·         फणसाच्या मुरांब्यात मात्र आंबटपणासाठी कैरी घालणे आवश्यक आहे.
·         सर्व मुरांबे करायला अगदी सोपे आहेत. त्यांतील जांभळाचा मुरांबा करायला आपण आज शिकूया. कारण आत्ता जांभळांचे दिवस असल्यानं बाजारात भरपूर व छान जांभळं आली आहेत आणि स्वस्तही आहेत.
इच्छा:
·         ही अशी जांभळं बघितली की लगेच खावीशी वाटतात. तर लगेच खाऊया. (पण चांगली धुण्याइतका दम धरा. कारण जांभळांच्या/फणसाच्या दिवसातच माश्यांचेही दिवस असतात आणि त्यांनाही जांभळं आवडतात. बाजारातून आणलेल्या जांभळांवर भरपूर माश्या आणि धूळ बसलेली असते.) भरपूर खाऊया. या फळांच्या सर्व गुणवैशिष्ट्यांचे सर्व फायदे मिळण्यासाठी ती (धुण्याशिवाय) कोणतीही प्रक्रिया न करता खाणे आवश्यक आहे. 10-15 दिवस खाल्ल्यावर ती उरायला लागली आणि आता जांभळांचे दिवस संपण्याची वेळ आली की जांभळांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी आपण जांभळांचा मुरांबा करूया.
पूर्वतयारी:
·         जांभळे आणणे व एक-एक स्वच्छ धुणे (स्वच्छतेला पर्याय नाही).
·         मुरांबा ठेवण्याची बरणी गरम पाण्याने धुवून कोरडी करून ठेवणे.
·         फणसाचे गरे आणून एक-एक स्वच्छ धुणे (स्वच्छतेला पर्याय नाही). तुम्हाला भरपूर पेशन्स असेल; भरपूर वेळ असेल; कितीही वेळ गेला तरी हाती घेऊ ते तडीस नेऊच अशी जिद्द असेल, चेंगट कामं करायला व चिकट गोष्टींत हात घालायला आवडत असेल तर तुम्ही सबंध फणस आणून त्याचे गरे काढायचा उद्योग करू शकता. (ते तुम्हाला शिकायचं असेल तर आमचा एक आठवड्याचा फणसाचे गरे काढणे हा कोर्स करा.)
·         अननस धूवून कापा (आमचा अननस कापणे हा कोर्स करा). (अननस कापण्याचं कौशल्य आत्मसात करण्याचे फायदे: पहा – अननस-चीज्‌ सॅलेड”)
·         स्ट्रॉबेरीज्‍, रास्बेरीज्‍, तुत्तू धुवून (स्वच्छतेला पर्याय नाही) त्यांचे देठ व पाने काढा.
तयारी:
·         जांभळे कापून त्यातल्या बिया काढा. त्यात गर बुडेल एवढी (साधारण 1 किलो गरासाठी पाऊण किलो) साखर घाला. 2 तास मुरत ठेवा.
·         फणसाच्या गर्‍यांतील बिया (आठळ्या) काढून गर्‍यांचे काप करा व ...
·         अननसाचे / स्ट्रॉबेरीचे कापून तुकडे करा व ...
·         रास्बेरीज् तुत्तू मुळातच लहान असल्याने त्यांचे तुकडे करण्याची जरूर नाही.
पाककृती:
·         साखरेत मुरलेला गर (आतापर्यंत बरीच साखर विरघळून फळाच्या रंगाचा रस सुटलेला असेल) गॅसवर ठेवून पक्का पाक होईपर्यंत शिजवा.
·         त्यात थोडी वेलदोड्याची पूड टाका.
·         तो पूर्ण गार होईपर्यंत धीर धरा.
·         संपूर्ण स्वच्छतेची काळजी घेऊन, स्पर्ष न करता (Non-Touch Technique) बरणीत भरून झाकण घट्ट बंद करा. आता हे पुढे वर्षभर खायचं नाही (हे शक्य आहे का? उगीच काहीतरी ...)
·         पातेल्याला चिकटलेला मुरांबा चाटून चव बघा. (शक्यतो पातेल्यात तोंड घालून जिभेनं चाटा. पण पातेल्यात डोकं अडकणार नाही याची काळजी घ्या. हे करताना केसांना, गालांना, कानांना पाक चिकटेल. मांजर डोळे मिटून, पंज्यानं डोकं पुसून पंजा चाटतं त्याप्रमाणे हा पाक चाटा. त्यासाठी मांजरचं बारकाईनं निरीक्षण करावं लागेल. ... किंवा ... )
समृद्धीकरण
·         रंग-रूप, चव-स्वाद व स्पर्षानं हे मुरांबे इतके समृद्ध आहेत की वेगळ्या समृद्धीकरणाची जरूर नाही.
·         आहाराच्या दृष्टीनं समृद्धीकरणासाठी त्यात फार तर सुका-मेवा टाकावा व खाताना त्यात थोडं लोणी किंवा (साजुक) तूप घ्यावं.
·         चव-स्वाद-रंग जुळणी (Compatibility) व संतुलनाचा पूर्ण विचार केल्याशिवाय मिश्र मुरांबे करू नयेत.
·         मिश्र मुरांब्यांच्या प्रयोगासाठी निरनिराळ्या फळांचे तयार मुरांबे खाताना आयत्या वेळी मिसळून बघावे.     
कौशल्य:
·         पक्का पाक होईपर्यंत शिजवा हे म्हणणं सोपं आहे. पण म्हणजे काय?
·         एक-तारेचा, दोन-तारेचा, तीन-तारेचा, कच्चा, पक्का, संपृक्त इ. पाकासंदर्भातल्या पारिभाषिक शब्दांचा नेमका अर्थ काय; हे पाक कसे करावे; ते बरोबर झाले आहेत का याच्या कसोट्या काय; इ. गोष्टी समजण्यासाठी कमीतकमी 10 वर्षं पाककलेत घालवावी लागतात.
·         पाकाच्या या गुणधर्माचा संबंध त्याच्या टिकाऊपणाशी (व पोताशी - Texture) असतो. आपल्याला पाकाची खात्री नसल्यास तो थोडाच बनवावा व दोन-चार दिवसांत संपवावा.  
·         हे मुरांबे करताना त्यात आपण कोणत्याही इतर गोष्टी (टिकवण्याची रसायने, कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद व कृत्रिम चव –आंबटपणासाठी सायट्रीक असीड – इ.) घातलेल्या नाहीत. त्यामुळे हे मुरांबे खाण्यात कोणताही धोका नाही (मधुमेहाचे रुग्ण सोडून). पण त्यामुळे स्वच्छता, पाकाचा पक्केपणा, बरणीत भरण्याची पद्धत व बरणीतून पुन्हा (खाण्यासाठी) काढताना घ्यायची काळजी (झाकण पुन्हा घट्ट लावणे, ओले हात, ओला चमचा इत्यदीचा स्पर्ष होऊ न देणे, इ.) यांवरच त्यांचा टिकाऊपणा अवलंबून आहे.
·         ही पाककृती करताना चव बघण्याची जरूर नाही (ती अप्रतीमच असणार). पण फणसाचा व काही वेळा अननसाचा मुरांबा करताना आंबटपणासाठी त्यात कैरी घालावी लागते व पुरेसा आंबटपणा आला का नाही ते बघण्यासाठी करताना चव बघावी लागते. आंबटपणाअभावी मुरांबा एकसुरी, धप्प गोरा, मिळमिळीत व अपूर्ण वाटतो.    
सजावट:

कशाला? काही जरूर आहे का? 
 
वाढप:
मुरांबे वाढण्याचं काम घरातील एकाच जेष्ठ व जबाबदार व्यक्तीकडे असावं. प्रत्येकाच्या आवडी-निवडीकडे लक्ष न देता तिनं विशिष्ट दिवशी, योग्य प्रमाणात, स्वच्छतेची काळजी घेऊन प्रत्येकाला मुरांबा वाढावा.
मुरांबा तळहातावर थोडासा चाटण्यासाठी घेता येतो किंवा चमच्याने घेऊन चमचा डायरेक्ट तोंडात घालता येतो. तो थोडा पानात (जेवताना), छोट्या खास बाऊलमधे किंवा बशीतही घेता येतो. तो फ्रूट्सॅलेडवर किंवा आईस्क्रीमवर सजावट व जादा चवीसाठी घालता येतो.   
आस्वाद:
·         दृष्टीसुख, स्वादसुख, हंऽऽ ... य्‌म्‌ ... टक्‌, चक्‌ ... हंऽऽऽ चक्‌ चुक्‌ ... याम्‌ याम्‌ ... याम्‌ ...
·         प्रेम, माया, मजा, आनंद, खुशी, समाधान, गोडी,
·         अशा मुरांब्यांचा भरपूर आनंद घेण्यासाठी ते किती खाल्ले याला महत्त्व नसून त्यांचा कसा आस्वाद घेतला ते कुणाबरोबर-कधी खाल्ले याला महत्त्व आहे.


चिंतन:
·         सर्व फळे आधी भरपूर खा. नुसती खाण्यामुळे त्यांच्या सर्व गुणांचा भरपूर फयदा मिळेल.
·         फळे नुसती खाण्याचा कंटाळा आला की मग मुरांब्यासारखे साठवणीचे पदार्थ करा.
·         सर्व प्रकारच्या काळज्या घेऊनही हे मुरांबे टिकत नाहीतच. खराब होण्याआधीच ते संपूनच जातात. आणि टिकवायचे कशाला? (पण प्रमाणात खाऊन संपवा.)
·         याच कृतीनं आंब्याचा (कैरीचा) केला तर तो मुर्‌-आंबा, आवळ्याचा केला तर मोर्‍(मुर्‍)-आवळा; मग यांना मुर्जांभुळ, मोरफणस, मोर्‌स्ट्रॉबेरी, मोर्रास्बेरी किंवा मोराननस का म्हणू नये?
·         डायबेटीस झलेल्यांनी 5 मिनिटं फक्त दृष्टीसुख व स्वादसुख घ्यावं आणि एकदाच छोटंसं यम्‌ करावं.
·         लहानपणापासून निरनिराळ्या वयातल्या आपल्या जांभळांच्या आणि जांभळांच्या दिवसांच्या खूप आठवणी असतात ... काही सगळ्यांना सांगण्यासारख्या, काही न सांगण्यासारख्या (तशा सर्वच फळांच्या संबंधात आपल्या आठवणी असतातच). हा मुरांबा खाताना त्या ताज्या होतात. त्यात या सीझनमधल्या आठवणी जमा होतात. आणि वेगवेगळ्या मुरांब्यांच्याही वेगळ्या आठवणी असतातच. लहानपणी सुट्टीला आजोळी (पांचगणीला) गेलं की आजीच्या कपाटात वरच्या कप्प्यात फडक्यांनी तोंडं बांधलेल्या बरण्यांत असे वेगवेगळ्या (आंब्याशिवाय) निराळ्याच फळांचे मुरांबे (व लोणचीही) असायचे. पाचगणीच्या लेंडी जांभळांना गर कमी पण रंग गडद आणि चव अवर्णनीय. (ती न खाल्लेल्यांना सांगून समजणार नाही.) त्यांचा आजीनं केलेला मुरांबा आठवला की सगळ्याच आठवणींनी डोळ्यांत पाणीच येतं.