OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Thursday, July 14, 2016

भरला दोडका

नाव भरला दोडका


प्रकार:
सुकी भाजी,
गरम
किती जणांसाठी: 4
प्रक्रिया:  कोरणे,  चिरणे, कुस्करणे, परतणे, मिसळणे, भरणे, वाफवणे, हलके तळणे.
पौष्टिकता:
प्रथिने, क्षार
जीवनसत्त्वे,
चोथा
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स
वेळ:
पूर्वतयारीचा:
15-20 मि
वाढण्याचा:
2 मि

पाककृतीचा:
10-15 मि
खाण्याचा:
15 मि


नाव:
भरला दोडका
प्रस्तावना:
·        हा एक सुक्या भाजीचा राजेशाही प्रकार आहे.
·        दोडक्याच्या सुक्या भाजीचा आणि राजेशाही? ... प्रश्न बरोबर आहे. काही गोष्टींबद्दल आपल्या मनातल्या पूर्वकल्पना इतक्या घट्ट असतात की आपण वेगळ्या प्रकारे विचारसुद्धा करू शकत नाही. उदाहरणार्थ ’शाही टुकडा’ म्हटलं आणि दोन बेदाणे आणि चार काजूचे तुकडे टाकले तरी तो दुधात बुडवलेला ब्रेडच.
·        पण हा पदार्थ तसा नाही हे तो तुम्ही करून बघितला की लगेच तुमच्या लक्षात येईल. लाडका-दोडका या शब्दातील दोडक्याशी (लाडका नसलेला) विनाकारण संबंध जोडल्याने दोडक्याबद्दलचा हा समज झाला असावा. किंवा अतिपरिचयात्‌ अवज्ञेतूनही तो नावडता झाला असावा. कारण तो बाजारात जेव्हा येतो तेव्हा इतका येतो आणि त्यावेळी इतर भाज्या बाजारात फारशा नसल्याने इतक्या वेळा खावा लागतो की त्याचा कंटाळा येणं साहजिकच आहे. शिवाय तो इतका स्वस्त होतो की त्याची किंमतच वाटेनाशी होते.
·        पण चव व गुणधर्मांत तो घोसावळे, दुधी भोपळा व काकडीपेक्षा नक्कीच उजवा आहे. याचा कुठलाही भाग वाया जात नाही, लवकर शिजतो, अनेक प्रकारांनी (रस-भाजी, सुकी भाजी, पीठ पेरून भाजी, भजी, दह्यातील भरीत, कोशिंबीर आणि आता भरला दोडका, इ.) वापरता येतो व स्वस्त असतो.
इच्छा:
अशा या सर्वगुणसंपन्न दोडक्यापासून बनवलेला हा छान दिसणारा, चवदार आणि राजेशाही पदार्थ करून बघायलाच हवा.
पूर्वतयारी:
·        बाजारातून भाज्या व मुख्यतः दोडके आणणे.
·        इतर आवश्यक गोष्टी घर म्हणून घरात असतील हे आपण गृहीत धरले आहे. (म्हणजे आपणच या गोष्टी वेळच्या वेळी आणून जागच्या जागी ठेवणे आवश्यक असते. तरच आपल्याला हे गृहीत धरता येते.)  
तयारी:
1.      साहित्य: 4 कोवळे दोडके, 2 छोट्या सिमला मिरच्या (एक हिरवी, व एक पिवळी असल्यास चागले), एक टोमॅटो, एक लहान लाल भोपळ्याचा तुकडा, अर्धी वाटी पनीर, 3 चीज क्यूब्ज, 6 ते 7 मिरे, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, एका लिंबाचा रस, 3 चमचे तेल, 4 चमचे टोमॅटो केचप, 1 चमचा साखर आणि मीठ. (याशिवाय आवश्यकता व आवडीप्रमाणे शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड, बेदाणे, खजूर, सुकं अंजीर, इ.)
2.      प्रथम दोडके (अर्थातच) स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्या शिरा (व जरूर असेल तर त्याची अगदी वरची साल) काढू व त्याचे साधारण 4 इंचाचे तुकडे करूया. त्या तुकड्यांना उभी चीर पाडून त्यातून त्यातील बिया लहान चमच्याने कोरून काढू. त्यामुळे आत सारण भरायला पोकळी तयार होईल आणि खाताना बियांची कचकच व्यत्यय आणणार नाही.

3.      त्यांवर लिंबाचा रस, मीठ (दोडक्यांपुरते), मिरपूड, आलं, थोडे मिरच्यांचे बारीक तुकडे व थोडीशी हळद घालुन ते तसेच अर्धा तास मुरत ठेवूया.
4.      ते मुरेपर्यंत सारणाची तयारी करूया. (याला म्हणतात प्लॅनिंग व टाईम मॅनेजमेंट.) सारणासाठी सर्व भाज्यांचे बारीक (पाव इंचाचे) तुकडे करूया (नंतर कचकच नको असेल तर सिमला मिरच्यांतील बियाही काढून टाकायला हव्यात). पनीर बारीक कुस्करून घेऊ, चीझ्‌ किसून घेऊ, आले किसून घेऊ, कोथिंबीर बारीक चिरून घेऊ व मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेऊया.   
पाककृती:
1.      सपाट फ्राय-पॅनमधे थोड्या तेलावर दोडके परतून झाकण ठेवून वाफवून घेऊया.  
2.      थोड्या तेलावर (किंवा लोण्यावर) सर्व मिरच्यांचे व भाज्यांचे तुकडे घालून थोडे परतून घेऊया. त्यावर चवीपुरते मीठ, किंचित साखर, मिरपूड व टोमॅटो केचप घालून परतूया व झाकण ठेवूया. जराशी वाफ आल्यावर गॅस बंद करू. 

3.      आता त्यात लिंबाचा रस, पनीर, कोथिंबीर, हिरच्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे घालून चांगले मिसळूया.
4.      आता हे तयार सारण दोडक्याला पाडलेल्या चिरेतून आतील पोकळीत भरून ठेवूया.
5.      अगदी आयत्या वेळेला सपाट फ्राय-पॅनमधे थोडे तेल टाकून त्यावर हे तयार केलेले दोडके अलगद ठेवून या व त्या बाजूला वळवून सावकाश परतून (हलके तळून) घेऊया.

6.      आता चिरेच्या तोंडावर किसलेले चीझ्‌ ठेवून व उरलेले सारण त्यावर टाकून अगदी बारीक गॅसवर एक वाफ आणूया.
7.      अगदी शेवटी उरलेलं किसलेलं चीज व कोथिबीर त्यावर टाकून एक मिनीटात गॅस बंद केला की झालं. म्हणजे चीज फार वितळणार नाही.

समृद्धीकरण
या पाककृतीतील सारण भाजी अनेक प्रकारांनी करता येऊ शकेल. त्यामुळे समृद्धीकरणाला व आपापल्या गरजेनुसार (मुले, गर्भार स्त्रीया, वृद्ध, स्थूल व्यक्ती इत्यादींच्या) या भाजीत बदल करायला खूप वाव आहे.   
कौशल्य:
·        4 इंचाचे एकसारखे तुकडे करताना सुरुवातीलातरी फूटपट्टी घेऊनच बसायला हवे. पण ते करताना दोडका वाया घालवायचा नसेल तर बाजारातून आणतानाच 9 किंवा 13 इंचाचे (दोन बाजूची अर्धा अर्धा इंच टोकं कापायला लागतात.) दोडके आणण्याचं कौशल्य दाखवायला हवं. (बाजारात 8-11-15 इंचाचेही दोडके मिळतात. म्हणजे ते टाकाऊ असतात असं नव्हे. पण त्यांची इतर पद्धतीनं भाजी करावी.)
·        तुकड्यांना उभी चिर पाडून त्यातील बिया कोरून काढताना तुकड्याच्या दोन्ही बाजू बंद रहातील अशी काळजी घ्यायला हवी म्हणजे नंतर सारण बाहेर येणार नाही. किंवा दोडक्याच्या तुकड्यांना चीर न पाडता ते संपूर्ण पोखरून सारणाने भरल्यावर दोन्ही तोंडे चीझ्‌च्या कीसाने बंद करायला हवीत.   
·        तोंडावर टाकलेल चीझ्‌ वितळून तोंड बंद झालेलं असलं तरी आतील भाजी बाहेर न येता दोडके सर्व बाजूंनी परतणं हे धीराचं आणि कौशल्याचंच काम आहे.  
·        आतील (कोणत्याही प्रकारची) सारण भाजी छान बनवण्यासाठी कमीतकमी पाककौशल्य आवश्यक आहेच.   
सजावट:
वाढताना वरून थोडी कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेलं चीझ्‌ आणि ओल्या नारळाचा कीस टाकावा. जास्त सजावटीची जरूर नाही.
वाटलं तर वरून टोमॅटो केचपच्या रेघा ओढाव्या.
वाढप:
एक भरलेल्या दोडक्याचा तुकडा अगदी अलगद, स्टाईलने, विशेष वाकून, चेहेर्‍यावर प्रेमादरयुक्त स्मित आणून प्लेटच्या मध्यभागी वाढावा.
आस्वाद:
·        आधी प्रेमाने बघा. गरमागरम वाफांत नाक घालून सावकाश वास घ्या. कुठून कशी खायला सुरुवात करायची याचा विचार करा. जपून छोटा घास घ्या, तो आत जास्त गरम असतो.
·        हा नुसताही (जेवणाचा एक कोर्स म्हणून) खाता येतो व तसाच छान लागतो.
·        किंवा त्याचा आस्वाद आपण फुलका, पोळी, भाकरी, पुलाव, इ. कशाबरोबरही घेऊ शकतो.  
चिंतन:
·        दोडके भरून झाल्यावर ते ओव्हनमधूनही बेक करून काढता येतील.
·       आत भरण्याची सारण-भाजी अनेक प्रकारांनी करता येईल. भरण्यासाठी सुकी उसळ, सॅलेड, अंडा-भुर्जी, खीमा मसाला, सुके बोनलेस चिकन/फिश, सॉसेज, काठी-कबाब असे पदार्थही वापरता येतील.
·     गरजेनुसार थोडे बदल करून हा वजन कमी करण्यासाठी; वाढवण्यासाठी; वाढत्या वयाच्या मुलांसाठी; गर्भार व अंगावर पाजणार्‍या मातांसाठी; वृद्धांसाठी आणि हृद्रोग, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहग्रस्त व्यक्तींसाठी – खरं तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे. 
·       हा सौम्य स्वाद-चवीचा, नाजुक सौंदर्याचा, आकर्षक, रुबाबदार व मार्दवानं वाढला जाणारा कौशल्यपूर्ण पदार्थ आहे.
·        म्हणून विशेष लाडके पाहुणे उदा. – जावई, व्याही, बॉस, इ. येणार असल्यावर हा जरूर करावा.
·     थोडक्यात, हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या पौष्टीक व उपयुक्त तर आहेच पण सौंदर्यशास्त्रदृष्ट्या आकर्षक; रसशास्त्रदृष्ट्या चवदार व कमीतकमी चौ-रसपूर्ण; आरोग्यशास्त्रदृष्ट्या आरोग्यपूर्ण; खिशाच्या अर्थशास्त्रादृष्ट्या स्वस्त; समाजशास्त्रदृष्ट्या कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंध दृढ करणारा व  राजेशाही आहे.
·        हा खाल्ल्यावर पुन्हा तुम्ही दोडक्याला दोडका (लाडका आणि दोडक्यातला) म्हणणार नाही.


Sunday, February 21, 2016

डेलिशिअस रेसिपीज फॉर वेट मॅनेजमेंट

Delicious Recipes for Weight Management
वाढणारे वजन हा सध्या अत्यंत काळजीचा व म्हणून जिव्हाळ्याचा  प्रश्न आहे. 

या पुस्तकांतील पाककृती व त्यांमागचा हा विचार नीट समजून घेतला की मी  सुचविलेल्याही हजारो पाककृती तुम्हालाही सहज सुचायला लागतील  त्यामुळेच वजन कमी करणे ही कटकट  वाटता एक अतीशय मजेदार अनुभव वाटेल. असा आहार हा तुमच्या जीवनशैलीचा एक सुंदर  अविभाज्य भाग होईल. 

सौ. सुलभा प्रभुणे 
जास्त माहितीसाठी पहा - पान  'Activities'

Wednesday, February 10, 2016

किवीफ्रूटचा मुरांबा (जॅम)

नाव किवीफ्रूटचा मुरांबा (जॅम)


प्रकार:
मुरांबा
गार
किती जणांसाठी: ?
प्रक्रिया:  कापणे, मुरवणे, उकळणे
पौष्टिकता:
थोडे उष्मांक (कॅलरीज्‌)
तंतुमय पदार्थ
’क’ (C) ’के’ (K)  आणि ’ई’ (E) जीवनसत्त्वे
थोड्या प्रमाणात ’बीटा केरॉटीन’
(प्रो-व्हिटॅमिन ए)
वेळ:
पूर्वतयारीचा:
½ तास
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
½ तास
खाण्याचा:
१० मिनिटे ते ½ तास


खरं सुख-समाधान देणार्‍या कुठल्याच गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत!  

नाव:
किवीफ्रूटचा मुरांबा (जॅम)
प्रस्तावना:
·        सध्या बाजारात नवीन-नवीनच फळे दिसायला लागली आहेत. आत्ता इथल्या बाजारातही ती दिसताय्‌त म्हणजे पुण्यामुंबईसारख्या शहरांत तर ती दिसतच असणार. शीतगृहे व थंड पेट्यांतून झटपट वाहतूक यांची ही कृपा म्हटली पाहिजे. त्यामुळे अगदी परदेशी फळेसुद्धा आता कुठेही मिळतात.
·        त्यांतील पीच या फळाची 2 प्रकारची सॅलेड्स आणि जॅम करायला आपण शिकलोच आहेत.  
·        तसेच एक विचित्र आणि वरून अगदी अनाकर्षक; खडबडीत आणि केसाळ; थोड्या मोठ्या चिक्कूसारखे दिसणारे फळ सध्या बाजारात दिसतंय. हे काय म्हणून विचारलं तर त्याला किवी म्हणतात असं कळलं. पण हे तर काही पदार्थांत विशेष सजावटीसाठी वापरतात. हे बाहेरून असं दिसतं? पण चोखोबांनी म्हणूनच ठेवलंय, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा? आणि हे तर फणस, अननस, लिची, चिक्कू यांच्याही बाबतीत खरं आहेच.
·        पण याला किवी नाही तर किवीफ्रूट म्हणतात (किवी नावाच्या न्यूझीलंडमधील पक्ष्यापासून वेगळं ओळखण्यासाठी) किंवा चायनीज गूजबेरी. (नाहीतरी ओळखता न आलेल्या कशालाही चायनीज म्हणायची आपल्याकडे पद्धत आहेच. उदा. चायनीज गुलाब, चायनीज आंबा, चायनीज मसले-भात, चायनीज आम्रखंड, चायनीज शेवयांची खीर वगैरे)
·        पण हे कापलं की “वा!!!” असाच उद्गार बाहेर पडतो. सुंदर अर्धपारदर्शक चमकदार हिरव्या रंगाचा गर आणि त्यात बारीक काळ्या बियांची महिरप! (काही जातीच्या फळांचा गर सोनेरीही असतो म्हणे). म्हणून तर याला सजावटीसाठी वापरतात.
·        हे खायलाही अगदी सोपं. नुसतं अर्धं कापायचं आणि अगदी पातळ साल सोडून इतर सर्व (बियांसकट) वाटीतून जेली खावी तसं खायचं. (साल सुद्धा खाता येते पण जरा चोथट व केसाळ लागते).
·        याची चव गोडसर आंबट (आंबट संत्र्यासारखी) पण स्वाद अगदीच वेगळा अवर्णनीय असतो.
·        पण जास्त खाल्लं की तोंडात चुई-मुई असं ते खाजायला लागतं. म्हणूनही याला अगदी थोड्या प्रमाणात फक्त स्वादासाठी किंवा सजावटीसाठी वापरत असणार.
इच्छा:
·        नवीन दिसली म्हणून हौसेनं किवीफ्रूट्स आणली, पण सगळी संपत नाहीत. मग काय करायचं? तर जॅम करायचा! तो टिकाऊ असतो (पण किती टिकतो ते कळण्याच्या आतच तो संपतो).
·        हा जॅमही करायला अगदीच सोपा आहे. (जास्त खुलासेवार वर्णनासाठी ”जांभळाचा मुरांबा” बघा)
पूर्वतयारी:
·        मुरांबा ठेवण्याची बरणी गरम पाण्याने धुवून कोरडी करून ठेवा.
तयारी:
·        4 किवीफ्रूट स्वछ धुवून (स्वच्छतेला पर्याय नाही) त्याच्या 4.5 मिलीमीटर जाडीच्या चकत्या कापा. (हा अनुभव बरं! तुमच्या 5 -5.5 मिमि पर्यंत चालतील).
·        प्रत्येक चकतीचे 4 तुकडे करा (5 केले तरी चालतील. पण एकसारखे 5 तुकडे कसे करणार? एखादी गोष्ट उगीच अवघड का करायची?)
·        प्रत्येक तुकडा चमच्याने कोरून (Scooping) साल काढा. (साल काढण्याची वेगळी पद्धत तुम्हाला माहिती असल्यास ती वापरली तरी चालेल). (पण साली टाकून द्यायच्या आहेत. आपल्याला तुकड्यांचा जॅम करायचा आहे, सालींचा नाही, हे लक्षात असू द्या.)  
·        तुकडे बुडतील इतपत साखर घाला. 1 तास मुरत ठेवा.
पाककृती:

·       आतापर्यंत साखर विरघळून हिरव्या रंगाचा रस सुटलेला असेल. साखरेत मुरलेले तुकडे गॅसवर ठेवून पक्का पाक होईपर्यंत शिजवा. 
·        पूर्ण गार झाल्यावर संपूर्ण स्वच्छतेची काळजी घेऊन, स्पर्ष न करता (Non-Touch Technique) बरणीत भरून झाकण घट्ट बंद करा.
·        आता हे पुढे वर्षभर खायचं नाही (हे शक्य आहे का? उगीच काहीतरी ...)
·        पातेल्याला चिकटलेला मुरांबा चाटून चव बघा. (शक्यतो पातेल्यात तोंड घालून जिभेनं चाटा. पण पातेल्यात डोकं अडकणार नाही याची काळजी घ्या. हे करताना केसांना, गालांना, कानांना पाक चिकटेल. मांजर डोळे मिटून, पंज्यानं डोकं पुसून पंजा चाटतं त्याप्रमाणे हा पाक चाटा. त्यासाठी मांजरचं बारकाईनं निरीक्षण करावं लागेल. ... किंवा ... ) ... (हे वाक्य जांभळाच्या जॅममधलं जसंच्या तसं कॉपी केलं आहे.)   
समृद्धीकरण
खाताना मजेसाठी त्यात थोडं लोणी किंवा (साजुक) तूप घ्यावं. आणखी मजेसाठी (आणि आहाराच्या दृष्टीनं समृद्धीकरणासाठी) त्यात सुका-मेवा टाकावा.   
कौशल्य:
·        हा जॅम थोडाच बनवावा व दोन-चार दिवसांत संपवावा. पण टिकाऊपणासाठी अती-स्वच्छतेला पर्याय नाही.
·        यात आपण कोणत्याही इतर गोष्टी (टिकवण्याची रसायने, कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद व कृत्रिम चव –आंबटपणासाठी सायट्रीक असीड – इ.) घातलेल्या नाहीत. त्यामुळे हा खाण्यात कोणताही धोका नाही (मधुमेहाचे रुग्ण व ज्यांना किवीफ्रूटची अलर्जी आहे असे लोक सोडून).
·        ही पाककृती करताना चव बघण्याची जरूर नाही (ती अप्रतीमच असणार). किवीफ्रूट बर्‍यापैकी आंबट असल्याने तुम्हाला हव्या तितक्या आंबट-गोड चवीसाठी कदाचित थोडी साखर घालावी लागेल.     
सजावट:
काही जरूर नाही
वाढप:
मुरांबे – जॅम कसे खायचे हे सांगायला नकोच.
आस्वाद:
·        दृष्टीसुख, स्वादसुख, चाखण्यातली मजा! हंऽऽ टक्‌ !!!
चिंतन:
·        किवीफ्रूट खाण्याचे बरेच फायदे आहेत. (उदा. – त्यातील “क”, ई आणि “के” जीवनसत्त्वे) पण फळ कच्चं व भरपूर खाल्लं तरच ते मिळतात.
·        किवीफ्रूटच्या बियांमधे अल्फा लिनोलेनिक असिड (alpha-linolenic acid) हे ओमेगा-3 मेदाम्लही (omega-3 fatty acid) असते. पण त्या बारीक बारीक बिया चावणार कधी आणि कशा? सहसा त्या गिळल्याच जातात आणि त्यांतील हा उपयुक्त पदार्थ वाया जातो.
·        आणि (हे परदेशातून – इटली, न्यू-झीलंड, चिली, ग्रीस फ्रान्स, इ. – येत असल्याने) याची किंमत व अन्न म्हणून त्याचे फायदे यांचा मेळ बसत नाही. 
·        याचा जॅम अप्रतीम लागतो, जेवणाला हमखास चव आणतो, सुंदर दिसतो आणि सजावटीसाठीही वापरता येतो.
·        अर्थातच जॅम करण्याच्या प्रक्रियेत त्यांतील जीवनसत्त्वे बर्‍याच प्रमाणात नष्ट होतात. 
·        याचा इतर कशाबरोबर मुरांबा करता येतो का नाही याचे प्रयोग लेखकांनी केलेले नाहीत. उत्साही असलेल्यांनी ते जरूर करून बघावेत (व यशस्वी झाले तरच लेखकांना कळवावेत).
·        काहींना किवीफ्रूटची अलर्जी असते. म्हणून पहिल्यांदाच खाताना ते जपून खावं.
·        किवीफ्रूटमधील अक्टीनिडीन (Actinidin) या द्रव्यामुळे तोंडात थोडं खाजतं. हाही अलर्जीचा प्रकार असावा. पण या द्रव्याचा उपयोग मांस नरम करण्यासाठी (कच्च्या पोपईप्रमाणे) होतो. त्यामुळे मांसाच्या मुरवणात (marinade) ते वापरता येतं
·        पण म्हणूनच हे दुधाबरोबर (मिल्क-शेक, आईस्क्रीम, इत्यादींसाठी) वापरता येत नाही.    
·        हे आपल्याकडचं फळ नसल्यानं व विशिष्ट मोसमातलं असल्यानं जेव्हा मिळेल तेव्हा नक्की खाऊन बघा. पण आवडलं व अलर्जी नसली तरी हे जास्त खाववत नाही. अशा वेळी मग मुरांब्यासारखे साठवणीचे पदार्थ करा.
·        डायबेटीस झालेल्यांनी हे फळ कच्चं खावं. जॅमचं 5 मिनिटं दृष्टीसुख व स्वादसुख घ्यावं आणि एकदाच थोडंसं (एक थेंब) यम्‌ करावं.