OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Wednesday, January 29, 2014

ग्रीन ऑरेंज चीझी-क्रीमी सूप - M




प्रकार:
पेय, सूप
गरम
किती जणांसाठी: ४
प्रक्रिया:   चिरणे, किसणे, व उकळणे
पौष्टिकता:
चोथा (फायबर) - 4 ग्रॅम/100ग्रॅम 
क्षार व अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्‍स
जीवनसत्त्वे अ, बीटा कॅरॉटीन, ब, क.
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (चीझ, क्रीम) प्रोटीन्स (दही, चीझ)
वेळ:
पूर्वतयारीचा:
10 मि
वाढण्याचा:
1 मि

पाककृतीचा:
5 मि
खाण्याचा:
10 मि




नाव:

हिरवे-केशरी चीझी-क्रीमी सूप
प्रस्तावना:
दिवसभर खूप काम झालंय. पण काम चांगल झाल्याचं समाधानही आहे. आता खूप भूक लागली आहे.
किंवा इतकी दमणूक झालीयै की आपल्याला जेवायचासुद्धा कंटाळा आलाय. काहीतरी दोन घास खाऊन केव्हा एकदा अंग अंथरुणावर टाकतोय असं झालय.
किंवा मुलांनी दंगा करून उच्छाद मांडलाय. भूक लागलेली त्यांनाही कळत नाहीयै आणि आपणही भुकेनं वैतागलो आहेच की!
शरीराइतकीच मनालाही ऊब हवी आहे. पण जेवायला थोडा वेळ आहे आणि पोटाला थोडा आधार हवाय. आता थोडं रिलॅक्स होऊया.
हे चवदार व स्वादयुक्त; भूक वाढवणारे व भागवणारे; शरीराला शिथिल करणारे व मनाला समाधान देणारे आणि नावाप्रमाणेच हिरवे केशरी चीझी आणि क्रीमी सूप आहे. हे आपण केव्हाही घेऊ शकतो. पण संध्याकाळी जेवणाआधी एक तास घ्यायला उत्तम. (रात्रीचं जेवण बनवायलाही उत्साह येतो).
इच्छा:
तर मग उशीर कशाला! आपण शरीर-मनाला ऊब आणि आराम देणारं हे सूप बनवून त्याचा कौटुंबिक आस्वाद घेऊया.   
पूर्वतयारी:
चाकवत
भाज्यांचा अर्क (व्हेजीटेबल स्टॉक) बनवून ठेवणे. (कृतीसाठी पहा सूप-सोनेरी सकाळ)
चाकवत [White goosefoot / lamb's quarters (Chenopodium album). Bathua or Bathuwa (Hindi)] (किंवा पालक Spinach किंवा आंबट चुका) नीट करून ठेवणे. 
पहा - "चाकवत कोथिंबीर सार"
तयारी:

आपल्याला साडेतीन कप भाज्यांचा अर्क (किंवा पाणीही चालेल), (आयत्या वेळी) स्वच्छ धुवून बारीक चिरलेला 1 वाटी चाकवत, अर्धी वाटी किसलेला लाल भोपळा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी ताजं सायीचं दही (किंवा साधं दही आणि 4 चमचे फ्रेश क्रीम), 2 क्यूब्‌ज चीझ, 1 हिरवी मिरची (किती तिखट हवं त्याप्रमाणे व उभी चीर पाडून), बारीक चिरलेली कोथिंबीर, मिळाल्यास 5-6 पुदिन्याची किंवा तुळशीची पानं, एक लहान तुकडा आलं, 5-6 लसूण-पाकळ्या, मिरपूड, मीठ व 2 चमचे कॉर्न फ्लोअर लागेल.
पाककृती:
·         आता पातेल्यात तीन कप भाज्यांचा अर्क उकळत ठेवू.
·         कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. आलं व लसणाचे बारीक काप करून घेऊ (किंवा आलं किसून व लसूण ठेचून चालेल), मिरच्यांना उभा छेद देऊन ठेवू, २ चीझ-क्यूब्ज किसून ठेवू आणि कॉर्नचे पीठ अर्धा कप पाण्यात भिजवून ठेवू.
·         पाण्याला काटा आल्यावर त्यात चिरलेला चाकवत, लाल भोपळ्याचा कीस, गाजराचा कीस, १ हिरवी मिरची, आलं, लसूण व मिरपूड टाकून झाकण ठेवू. 
·         पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात चवीपुरते मीठ, चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी कोथिंबीर व पुदिन्याची/तुळशीची पानं टाकू.
·         वास व चव घेऊन बघू. सर्व बरोबर असेल तर त्यात  अर्धी वाटी पाण्यात भिजवलेलं  मक्याचं पीठ  (कॉर्न फ्लोअर) व सायीचं दही हळूहळू ढवळत टाकू. झाकण ठेवून मंद गॅसवर एक मिनिट (मनात साठ आकडे मोजू) उकळत ठेवू.
·         नंतर गॅस बंद करून त्यात चीझचा कीस टाकू. पुन्हा वास व चव घेऊन बघू.
समृद्धीकरण
·         पाण्याऐवजी भाज्यांचा अर्क वापरून, सायीचं दही व चीझ टाकून आपण पुरेसे समृद्धीकरण केलेच आहे. आत्ता तेवढे पुरेसे आहे. (उलट आपल्यासाठी चीझ थोडं कमी असलं व दही साधं असलं तरी चालेल.)
·         थोडे हिरवे वाटाणे/हरभरा/मोडाचे मूग अर्धवट बारीक करून (किंवा पेस्ट करून) किंवा स्पेशल कुणी (जावई वगैरे) येणार असेल तर काजू/बदामाची पेस्ट वगैरे आपण घालू शकतो (जादा प्रोटीन व चव).
कौशल्य:
·         आलं, लसूण व मिरपूड पाण्यात लगेच टाकल्यास त्यांचे स्वाद चांगले उतरतील.
·         चाकवत-भोपळा-गाजर इ. व कोथिंबीर पाण्याला काटा आल्यावर टाकल्यानं ती योग्य प्रमाणात शिजतात; त्यांचा रंग (केशरी-पिवळा व स्वच्छ हिरवा) व स्वाद कायम रहातो व त्यातील जीवनसत्वं नाश पावत नाहीत.
·         मिरची उशीरा टाकल्यानं तिचा ताजा स्वाद टिकून राहातो व तिखटपणा जास्त उतरत नाही. हे सूप आपण जिभेला चटका व मनाला झटक्यासाठी बनवत नाही आहोत. म्हणून ते जास्त तिखट घेऊ नये.
·         सायीचं दही आपण केव्हाही घालू शकतो. पण क्रीम व चीझ अगदी शेवटी घालावं.
·         या सुपात गाजर-भोपळ्याची गोडी असल्याने साखर घालू नये.
·         दोन वेळा तरी वास व चव घेऊन बघणे आवश्यक आहे. एकदा स्वाद-संरचना (Flavor-Structure)  स्वाद-संगती (Flavor- Harmony)  स्वाद-मेळ जुळवण्यासाठी व शेवटी सर्व बरोबर जमल्याची खात्री करण्यासाठी.
सजावट:
·         वरच्या सूचनांचं नीट पालन करून सूप केलं असल्यास त्याला सुंदर पिवळट-हिरवट क्रीमी रंग येईल व त्यात हिरवे-केशरी-पिवले कण तरंगताना दिसतील.  
वाढप:
·         आता नीट ढवळत वाडग्यांमधे वाढून घेऊया.
·         मजेदारपणा वाढवण्यासाठी वरून थोडं किसलेलं चीझ टाकूया.
·         वाढताना त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर टाकली व पुदिना/तुळशीचं पान टाकलं की पुरेल.
आस्वाद:
आधी डोळ्यांनी, मग डोळे मिटून नाकानं (अतीउत्साहात सूपमधे नाक बुडवू नका) आणि नंतर जिभेनं (हळूच, कारण जीभ भाजेल) आपण सूपचा आस्वाद घेऊ. पहिला चमचा जिभेवर पसरताच थोडा चटका बसेल. पण मूड तात्काळ सुधारेल. दुसर्‍या चमच्यानंतर शरीराला आणि पाचव्या चमच्यानंतर मनाला ऊब येईल. नंतर हळूहळू रंग, वास आणि चवींच्या जादूने शरीर आणि मन शिथिल होत जाईल.
निम्मा बाऊल संपल्यानंतर काही बोलावं असं वाटू लागेल. पण बोललंच पाहिजे का?
हे सूप जिभेवर पसरवत सावकाश सिप्‌ करायचं आहे. त्याच्या सौम्य चवी, नाजुक स्वाद व मऊ स्पर्श मनावर सावकाश पसरून मन शिथिल व समाधानी व्हायला पाहिजे. (हे सुर्र्‌र्र्‌र्र्‌ करून पिता, ओरपता, भुरकता किंवा खाता येत नाही).
चिंतन:
·         दमल्यावर आणि रिकाम्या पोटी चिंतन करू नये. आधी आस्वाद घ्यावा.
·         रंग, वास, स्पर्श आणि चवींच्या जादूनं हळूहळू वाढणारी शारीरिक-मानसिक शिथिलता व आराम. कौटुंबिक ऊब व स्वास्थ्य. शेवटी समाधान.
·         निम्मा बाऊल संपल्यावर काही बोलावंसं वाटेल. पण बोललंच पाहिजे का? नुसता सहवासही पुरेसा असतो. आणि कधीतरी मुलांचं ऐकूया की!   
·         खरं समाधान देणार्‍या गोष्टी किती सोप्या आणि साध्या असतात! दिवसभर भरपूर काम मनासारखं झालेलं असणं, असं सूप, प्रिय व्यक्तींचा सहवास, आराम, नैसर्गिक भूक व ती छान भागण्याची हमी देणारे स्वयंपाकघरातून येणारे वास! वाऽऽऽ!
·         उरलेलं सूप जेवणातल्या भाजीच्या ग्रेव्हीत टाकता येईलच. पण ते उरत नाही. उलट कमी पडलं असंच वाटतं.
·         हा हलका पण जवळजवळ संपूर्ण आहार असल्याने हे रात्रीच्या जेवणाऐवजी (दोन बाऊल भरून व क्रीम-चीझचं प्रमाण कमी करून) घ्यायलाही चांगले आहे.
·         सकाळी नाष्ट्याच्या वेळीही (किंवा नाष्ट्याऐवजी) हे घेता येईल.
·         आवश्यक पालेभाज्या, लाल भोपळा, इ. मुलांना देण्याचा हा उत्तम उपाय आहे. या किंवा अशा काही गोष्टी घातलेल्या त्यांना कळू द्यायच्या नसतील तर त्या मिक्सरमधून पेस्ट करून घालाव्या.