OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Thursday, December 8, 2011

ब्रेड रोल


ब्रेड रोल




प्रकार:
संध्याकाळचे खाणे
गरम
किती जणांसाठी: 4
प्रक्रिया:  वाफवणे, उकडणे, शिजवणे, कालवणे, कुस्करणे, मिसळणे, हलके परतणे 
पौष्टिकता:

क्षार
जीवनसत्त्वे
पिष्टमय व स्निग्ध पदार्थ, प्रथिने
वेळ:
पूर्वतयारीचा:
15 मि
वाढण्याचा:
1 मि

पाककृतीचा:
5-7 मि
खाण्याचा:
5 ते 10 मि – किती भूक लागली आहे त्यानुसार


नाव:
ब्रेड रोल
प्रस्तावना:
काही वेळा असं होतं की आपण ऑफिसमधून खूप कंटाळून आलेलो असतो. खूप भूक लागलेली असते. फरसाण, चिवडा यांसारख्या तेलकट गोष्टी अजीबात नको असतात. पण काहीतरी मस्त आणि पटकन करता येईल असा गरमागरम पदार्थ हवा असतो. मग अशा वेळी ब्रेड रोल सारखा सुटसुटीत आणि चट्कदार पदार्थ खूपच उपयोगी पडतो.
इच्छा:
सहसा ब्रेडचे 5-6 स्लाईस घरात असतात किंवा नसले तरी कोपर्‍यावर कुठेही मिळू शकतात (पोरांना आणायला पिटाळा. ती अशा कामांना हौसेनं जातात). त्याच्या जोडीला घरात असेल ती कोणतीही तयार किंवा कच्ची भाजी चालू शकते.
पूर्वतयारी:
सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वीच जर संध्याकाळच्या खाण्याचा विचार व नियोजन केलं असेल (करायला हवं ना?) तर बटाटा मटार वगैरे आधीच उकडून ठेवता येतात. मग आपण खरोखर 7-8 मिनिटांत अगदी मस्त ब्रेडरोल खात असतो.
तयारी:
·         1 ब्रेड (10 ते 12 स्लाईस), ½ वाटी बारीक रवा, 2 टे. स्पून तेल.
·         सारण – त्यासाठी काही पर्याय दिले आहेत. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कल्पनेने शेकडो पर्याय शोधू शकाल. सारणात आपण चवीसाठी तिखट, मीठ, मसाला, गरम मसाला, आले लसूण, मिरपूड इत्यादीपैकी आवडेल ते घालू शकतो. 
1)      उकडलेल्या बटाट्याचा लगदा + बारीक चिरलेला कांदा + वाफवलेले मटार.
2)      गाजर + कोबी + फ्लॉवर यांचे किंचित वाफवलेले बारीक तुकडे.
3)      स्वीट-कार्नचे वाफवलेले दाणे + उकडलेल्या बटाट्याचा लगदा.
4)      चीज + स्वीट कार्नचे दाणे (वजन अगदी आटोक्यात असेल तरच).
5)      पनीर + सिमला मिरची.
6)      तांबडा भोपळा + कोणतेही वाफवलेले दाणे (पावटा/घेवडा/वाल).
7)      कोणतेही मोड आलेले कडधान्य + थोडासा उकडलेला बटाटा.
8)      बोनलेस चिकन/मटन खिमा/उकडलेले अंडे/अंडा-भुर्जी.
9)      सफरचंद/केळे/अननस असे फळांचे तुकडे + थोडासा मध (यात बाकी काहीच घालायची गरज नाही).
10)  सकाळची कोणतीही भाजी/उसळ + भरीला बटाटा/पनीर (रसाची भाजी/उसळ असल्यास रस बाजूला काढून तव्यावर रस आटवून जरा कोरडी करून घ्यावी). अगदी पालेभाजीसुद्धा चालेल.
पाककृती:
·         यांपैकी आज गाजर, कोबी, फ्लॉवर यांचे किंचित वाफवलेले बारीक तुकडे व उकडलेल्या बटाट्याचा लगदा आणि थोडं पनीर यांचं सारण करू. (फोटोत स्वीट-कॉर्नचे दाणे व कांद्याचे सारण वापरले आहे.) ते खूप शिजवण्याची गरज नाही. त्यात मिरची, लसूण, आले, कोथिंबीर टाकून चवीपुरते मीठ, साखर टाकू. वरून अर्ध्या लिंबाचा रस घालू. लिंबू पिळताना आलेला लिंबाचा वासही कंटाळा घालवायला मदत करेल व पुढची पाककृती करायला उत्साह येईल.
·         नंतर ब्रेडचा स्लाईस किंचित ओला करून त्याच्या कर्णावर सारणाचा रोल ठेवू. स्लाईस दोन्ही हातांवर घेऊन प्रथम एका कोपर्‍यातून व नंतर त्यावर दुसर्‍या कोपर्‍यातून दुमडून दोन्ही बाजूनी घट्ट दाबून मस्त लांबट रोल तयार करू. हवा तर हात जरा ओला करून कडा चिकटवून घेऊ. नंतर रोल रव्यात नीट घोळवून घेऊ.
·         तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर रोल ठेवून सर्व बाजूंनी छान कुरकुरीत, खरपूस होईपर्यंत हलका परतून घेऊ (एकावेळी 3-4 रोल्स परतता येतात). 5 मिनिटात गरमागरम रोल खायला तयार.
·         ते खोबर्‍याची चटणी/पुदिन्याची चटणी/सॉस/चिंचेची चटणी यापैकी कशाहीबरोबर खाता येतात.
समृद्धीकरण
उपलब्ध पदार्थांपैकी एकमेकांना साजेसे अनेक पदार्थ वापरल्याने समृद्धी सहजच वाढते.  त्यातही प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी सारणातील भाजीत कोणतेही मोड आलेले कडधान्य/भिजवलेल्या डाळी/घट्ट वरण/बोनलेस चिकन/मटन खिमा/उकडलेले अंडे इ. वापरता येते.
कौशल्य:
·         हा करायला अत्यंत सोपा, विना कष्टाचा, विना कौशल्याचा, कुणालाही करता येण्यासारखा पदार्थ आहे. हमखास जमण्यासाठी सुरुवातीला साधी तयार (दुसर्‍या कुणी केलेली) बटाट्याची भाजी सारण म्हणून वापरावी.
·         पण कौशल्य म्हटले तर सारणात कोणतेही पदार्थ ढकलण्यात व चव जुळवून घेण्यात आहे. ते तंबोरा जुळवण्याइतकंच अवघड असू शकतं.
सजावट:
डिशमधे मधे दोन रोल मधे व एका बाजूला पुदिन्याची चटणी (हिरवी) व दुसर्‍या बाजूला सॉस (लाल) घातला की सादर करायला डिश तयार. शेजारी (उरलेल्या) कांदा, टॉमॅटॉ, गाजर इ.च्या चकत्या ठेवा. वर कोथिंबीर टाका. (किंवा सर्वांसाठी मधे एकच डिश ठेवायची असल्यास फोटोत दाखवल्याप्रमाणेही सजावट करता येईल.)
वाढप:
घरातल्या सर्वांसाठी मधे एकाच डिशमधे सर्व रोल्स ठेवले तरी चालेल. पाहुण्यांसाठी दोन-दोन रोल्स एका डिशमधे चटणीसह द्यावेत.
आस्वाद:
आता हंऽऽ! भुकेच्या पोटी (आत कोणती भाजी सारण म्हणून घातली आहे याचा विचार न करता) पाच मिनिटांत फडशा पडतो.
चिंतन:
·         ब्रेड रोल तळण्याचा विचार मनात सुध्दा आणू नका कारण एक एक रोल 100 ग्रम पेक्षा जास्त तेल शोषून घेतो. मग आपल्या डायटचे 12 वाजलेले असतात. तेव्हा हा रोल अगदी कमीत कमी तेलात जरा सावकाश मस्त कुरकुरीत हलका परतायचा.  
·         मुलांना (चांगल्यासाठी) फसवून कोणतीही भाजी खायला घालायला हा पदार्थ फार उपयुक्त आहे. चाणाक्ष मुलांना हे कळत नाही असं नाही पण त्यांची काही तक्रार नसते.
·         अर्थात (मैद्याच्या) ब्रेडऐवजी (कणकेच्या) पोळीचा रोल (त्याला फ्रॅंकी म्हटलं की झालं) जास्त चांगला.
·         याचा एक भाऊबंद म्हणजे हा नुसता रव्यात घोळवण्याऐवजी फेटलेल्या अंड्यात बुडवून मग रव्यात किंवा वाळलेल्या ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून मग परतावा.
·         हा पदार्थ फक्त उपयुक्त आहे असं नाही तर चविष्ट व सर्वांच्या आवडीचा आहे.













No comments:

Post a Comment