भाजणीचे वडे
प्रकार:
|
रोटी-भाकरी
|
गरम/गार
|
किती जणांसाठी: ४
|
प्रक्रिया: भाजणे, दळणे,
भिजवणे, कालवणे, मळणे, थापणे, तळणे.
|
पौष्टिकता:
|
कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ
|
|||
वेळ:
|
पूर्वतयारीचा:
|
5 मि
|
वाढण्याचा:
|
2 मि
|
पाककृतीचा:
|
30 - 40 मि
|
खाण्याचा:
|
10 मि
|
नाव:
|
भाजणीचे वडे
|
प्रस्तावना:
|
भाजणी या अत्यंत उपयुक्त,
बहुआयामी (Versatile) आणि पौष्टीक पिठापासून बनणारा हा
कोणत्याही वेळी खाण्यासारखा अत्यंत चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ आहे. पण हा तळलेला
असल्याने स्थूल, मधुमेही, हृद्रोगी व रक्तदाब असलेल्यांनी खाऊ नये (त्यांनी
थालीपीठ खावे). इतर प्रौढ व वृद्धांनीही हे जपून व प्रमाणात खावे.
मुलांसाठी कोणत्याही वेळी
(विशेषतः डब्यात देण्यासाठी) हा पदार्थ उत्तम.
|
इच्छा:
|
तर आपण आता चौघांसाठी
(प्रत्येकी 4 ते 5) भाजणीचे
वडे बनवूया.
|
पूर्वतयारी:
|
थालीपीठाची भाजणी बनवणे: पहा
(याच ब्लॉगवर) – भाजणी बनवण्याच्या कृती
कोथिंबीर चिरणे.
|
तयारी:
|
·
आपल्याला 4
वाट्या थालीपीठाची भाजणी (तयार विकत आणून किंवा शक्यतो घरी केलेली), बारीक
चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा हळद, 1
चमचा लाल तिखट (किंवा मिरचीचा ठेचा), 3-4 चमचे तीळ, 1
चमचा जिरे, १ चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, जरुरीप्रमाणे पाणी आणि तळण्यासाठी तेल या
गोष्टी लागतील. आवडत असल्यास तुम्ही थोडं आलं, लसूण, मिरपूड किंवा मसाला घालू
शकता.
·
पीठ मळण्यासाठी व वडे थापण्यासाठी आपल्याला
परात व ते तळण्यासाठी कढई लागेल.
|
पाककृती:
|
·
4 वाट्या भाजणी (न चाळता) व (तेल
सोडून) इतर सर्व पदार्थ चांगले (कोरडेच) मिसळून घेऊ.
·
त्यात थोडे-थोडे पाणी घालून, पीठ घट्ट
भिजवून नंतर ते खूप वेळ चांगले मळून घेऊ.
·
त्याचे छोटे गोल वळलेले गोळे करून
घेऊ.
·
कढईत तेल घेऊन तापत ठेऊ.
·
एक गोळा थापून त्याचा लहान पुरीच्या
आकाराचा पण जाडसर वडा करून घेऊ. एक-एक वडा तळताना दुसरा थापता येतो. (नाहीतर – तुम्ही
तळत असल्यास – वडे थापायला माणूस ठेवा, किंवा – तुम्ही थापणार असल्यास – तळायला माणूस
ठेवा, किंवा वडे करायलाच माणूस ठेवा. पण मग तुम्ही काय करणार? ऐतं खाणार?)
·
तेल चांगले तापल्यावर (त्यात
भिजवलेल्या पिठाची एक बारीक गोळी करून टाकावी. तिला लगेच बुडबुडे येऊन ती तेलावर
तरंगून आली की तेल तापले असे समजावे. तेलात बोट घालून पाहू नये) त्यात एक-एक वडा
खरपूस तळून घेऊ.
|
समृद्धीकरण
|
·
भाजणीत सर्व उपलब्ध धान्यांचा व
कडधान्यांचा वापर केलेला असतो. त्यामुळे ती कर्बोदके व प्रथिनांनी समृद्ध असतेच
व धान्ये-कडधान्ये भाजण्यामुळे ती पचायला सोपी व खमंग होते. शिवाय वडे तळल्याने
ते स्निग्ध पदार्थानेही समृध होतात.
·
याशिवाय त्यात गाजर, मुळा, बीट, लाल
भोपळा, दुधी-भोपळा, नवलकोल, या गोष्टीही किसून टाकता येतात. तसेच त्यात कोणतीही
पालेभाजी बारीक चितून टाकता येते. (या गोष्टी टाकताना, त्यातील पाण्याचा विचार
करता, त्या आधी मिसळून मगच जरुरीप्रमाणे पाणी घालावे.) किंवा ते सॅलेडबरोबर
खावेत.
·
थालीपीठाप्रमाणेच या वड्यांचाही पिझ्झा-बेसप्रमाणे
उपयोग करून त्यावर अनेक प्रकारचे (सॉस/चटणी, भाज्या, मांस व चीझ् वापरून) थर
देणे (Toppings) शक्य आहे.
·
वरील दोन्ही प्रकारांनी त्याचे 2-पदार्थ-आहारामधून
1-पदार्थ-आहारात रूपांतर होते.
|
कौशल्य:
|
·
पीठ भिजवल्यावर ते खूप वेळ चांगले
मळणे आवश्यक आहे.
·
नंतर जास्त वेळ ठेवल्यास ते सैल होत
जाते.
·
सुरुवातीला वडा थापताना त्याच्या
आकाराकडे लक्ष न देता तो सारख्या जाडीचा होईल याकडे लक्ष द्या. त्यामुळे तो
एकसारखा तळला जातो.
·
तो नुसता तळला तर थोडा फुगतो. तो फुगू
द्यायचा नसल्यास त्याला भोक पाडावे.
·
थापताना पीठ हाताला चिकटत असल्यास
बोटांना थोडे पाणी किंवा तेल लावा. पीठ जास्त सैल झाल्यासही बोटांना चिकटते. अशा
वेळी त्यात थोडी कोरडी भाजणी टाकून पीठ पुन्हा मळून घ्या.
·
कोणताही पदार्थ तळणं ही कौशल्याची (काही
पदार्थांच्या बाबतीत तर फारच कौशल्याची) व धोकादायकही गोष्ट आहे. ती
मार्गदर्शनाखालीच शिकावी. नंतर सरावाने (At least 1000 frying hours) त्यात
परिपूर्णता आणत राहावी. [आम्ही तळण्याचे मार्गदर्शन करतो.]
·
पण हे वडे तळणं त्या मानानं सोपं आहे.
एखादा मऊ, एखादा खुसखुशीत, खरपूस किंवा कडकडीत झाला तरी फारसं बिघडत नाही. ते
कसेही चांगलेच लागतात. भाजणीच्या मूळच्याच काळपट रंगामुळे ते कमी-जास्त तळलेले
रंगावरून फारसे समजत नाही. शिवाय त्यांच्या वासामुळे ते कधी एकदा खातोय असं
झाल्यामुळे एवढं बारकाईनं बघण्याच्या कुणी भानगडीत पडत नाही. ते कच्चे राहिले नाहीत
किंवा करपले नाहीत एवढं पाहिलं तरी पुरे.
|
सजावट:
|
·
ताटलीत नुसते वडे (पण कलात्मक
पद्धतीनं मांडून – म्हणजे काय?), लोण्याचा गोळा व आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे (सॉसही
चालेल) ठेवले तरी पुरे. शेजारी दह्याची/ताकाची वाटी (त्यात चमचा घालून) ठेवावी.
·
जास्त सजावट हवी असल्यास (कोणाला?) वर
चिरलेला कांदा, कोबी, टॉमॅटो, किसलेले गाजर, बारीक शेव (किंवा चीझ्) व कोथिंबीर
टाकावी.
|
वाढप:
|
हे गरमच खायला हवेत असं
नसल्याने ताटल्यांत नीट वाढून, सजावट वगैरे करून मग सर्वांनी एकदम खायला बसावे.
|
आस्वाद:
|
हे वडे गरम खायचे असल्यास
तळल्या-तळल्या एकदम तुकडा तोडून चावायला सुरुवात करू नये. तोंड भाजते (तळलेला
पदार्थ आतून नेहमी जास्त गरम असतो). अर्थात एकदा तोंड भाजल्यावर जन्मभर लक्षात
राहाते (शहाण्या माणसांच्या).
खाण्याची घाई झालेली असली तरी नेहमी
अगदी छोटे-छोटे तुकडे तोडून, चावून-चावून, सावकाश, चव घेत खावे. त्यामुळे वडे जास्त
वेळ टिकतात, नंतर चव जास्त वेळ रेंगाळत राहाते व समाधान जास्त होते. जास्त मजा
गप्पा मारत खाण्यात आहे.
|
चिंतन:
|
·
भाजणी अत्यंत उपयुक्त पीठ आहे. ते
नेहमी घरात असावे.
·
तिचे अगदी थोड्या वेळात व सोप्या
पद्धतीने अनेक अत्यंत रुचकर व पौष्टीक पदार्थ (भाकरी, थालीपीठ, भाजणीचे वडे,
कडबोळी, इ.) करता येतात.
·
ते कुणालाही जमतात.
·
हे पदार्थ स्टार्टर्स, स्नॅक्स,
मधल्या वेळचे खाणे, नाष्टा, जेवणात बाजूचा पदार्थ, 2-पदार्थ-आहार
व संपूर्ण 1-पदार्थ-आहार म्हणून उपयोगी पडतात.
|
No comments:
Post a Comment