OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Tuesday, October 24, 2017

चिरोटे - Chirote

नाव – चिरोटे - Cirote 





प्रकार:
फराळाचा पदार्थ
गार
किती जणांसाठी: 8
प्रक्रिया: भिजवणे, फेटणे, लाटणे, तळणे
पौष्टिकता:
पिष्टमय पदार्थ
स्निग्ध पदार्थ


वेळ:
पूर्वतयारीचा:
50 मि
वाढण्याचा:
1 मि

पाककृतीचा:
30 
खाण्याचा:
5 मि



नाव:
चिरोटे

प्रस्तावना:
हा संपूर्ण मराठी पदार्थ सध्या मागे पडलेला दिसतो. कारण तो करायला लागणारा वेळ आणि कौशल्य. एवढं करूनही तो भरपूर खाता येत नाही आणि कसा खायचा हे न कळणार्‍यांना खाण्याचं समाधानही मिळत नाही.  करणार्‍यालाही मग वाटतं की आपले कष्ट, वेळ आणि कौशल्य वाया गेलं. (असंही आयतं खाणार्‍यांना करणार्‍या, विशेषतः बायकोचं, कौतुक नसतंच.) असो. 
चिरोटे हल्ली विकतही मिळतात (दोन प्रकारांत - रिफाईंड तेलात किंवा शुद्ध देसी घीमें बनाये हुवा). पण ते काही खरं नव्हे. विकतचं शुद्ध देसी घी आणि घरचं साजुक तूप या तर संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. 
तर हा एक अत्यंत नाजुक-साजुक, कौतुकानं, कौतुक करत, नजाकतीनं, सावकाश आस्वाद घेत खायचा पदार्थ आहे. 
       
इच्छा:
तर आता आपण (धाडस करून) चिरोटे बनवूया. 

पूर्वतयारी:
त्यासाठी आपल्याला पाव किलो मैदा, साजुक तूप, 2 मोठे चमचे कॉर्न फ्लोअर, तेल, चवीपुरेसे मीठ आणि 8-10 चमचे पिठीसाखर लागेल. 
तयारी:
मैद्यात 4 चमचे तेल आणि चवीपुरते मीठ घालून तो घट्ट भिजवून घेऊया आणि तो गोळा 15 मिनिटं झाकून ठेवूया. तेवढ्या वेळात 8-10 चमचे साजुक तुपात कॉर्न फ्लोअर घालून, मिसळून, खूप फेटून घेऊया.   

पाककृती:
मैद्याच्या पिठाची एक पोळी लाटून घेऊया. तिच्यावर तूप-कॉर्न फ्लोअर मिश्रण लावून आणि त्यावर सुका मैदा भुरभुरून ती बाजूला ठेवूया. दुसरी पोळी लाटून ती पहिलीवर ठेवून तिच्यावर तूप-कॉर्न फ्लोअर मिश्रण लावूया आणि मैदा भुरभुरूया. तिच्यावर तिसरी पोळी ठेवून, तूप-कॉर्न फ्लोअर मिश्रण लावून मैदा भुरभुरूया. 


एकावर एक ठेवलेल्या या 3 पोळ्यांचा रोल बनवूया.
सर्व पिठाचे असे रोल बनवल्यावर त्यांचे सुरीनं काळजीपूर्वक कापून अर्धा इंच जाडीचे काप करूया. 
एक काप उभा दाबून, सुक्या मैद्याचा वापर करून त्याची जाडसर पुरी लाटून घेऊया. अशा सर्व कापांच्या पुर्‍या लाटून घेऊया. 

काही काप उभे दाबण्याऐवजी आडवे पाडून त्यांच्याही पुर्‍या करून घेऊया. 




कढईत भरपूर तेल घेऊन त्यात या पुर्‍या मंद आंचेवर सावकाश आणि काळजीपूर्वक तळून घेऊया. 
तेल निथळून अलगद काढून बटरपेपर किंवा टिश्यू पेपरवर काढून घेऊया. निवल्यावर प्लेटमधे काढून त्यांवर पिठीसाखर भुरभुरूया. 

आता खायला तयार. पाव किलो मैद्याचे साधारण 25 चिरोटे होतात, म्हणजे 8 जणांना प्रत्येकी 3. 
कौशल्य:
  • पाककृतीतला आधीचा सगळा भाग चेंगट व वेळखाऊ असला तरी त्यात कौशल्य फारसे नाही. चिकाटी मात्र फार लागते. 
  • दोन पोळ्यांच्या मधे तूप लावताना हात आखडता घेऊन चालत नाही. 
  • तळण्याचा भाग खरा कौशल्याचा आहे. आंच फार असेल तर पापुद्रे सुटे होऊन तरंगायला लागतात व लगेच करपतात. फार कमी असेल तर पापुद्रे सुटे होत नाहीत व चिरोटा कडक पुरीसारखा होतो. मध्यम व "योग्य" (?) आंचेवर तळताना चिरोटा आख्खा राहातो पण प्रत्येक पापुद्रा सुटा व्हायला लागतो. या वेळी तो अलगद एका झार्‍यावर घेऊन, शक्य तितका तिरका-उभा करून मोठ्या चमच्याने  त्याच्या पापुद्र्यांच्या कडांवर गरम तेल हलके हलके सोडावे लागते. म्हणजे सर्व पापुद्रे छान सुटे होऊन त्यांमधून गरम तेल वाहून तेही छान आतून तळले जातात. नाहीतर बाहेरचे पापुद्रे करपलेले आणि आतले मऊ-कच्चे राहातात. शिवाय या वेळी चिरोटा लेवाडा असतो त्यामुळे हे सर्व करताना नाजूकपणे आणि खालच्या तेलात पडणार नाही याची काळजी घेत हाताळावा लागतो. 
सजावट:
चांगले झालेले चिरोटे इतके छान दिसतात की सजावटीची गरजच नसते आणि चांगले न झालेले चिरोटे कितीही सजवले तरी काऽऽऽही उपयोग नसतो. 

वाढप:
चिरोटा ही हातानं घेऊन खायची गोष्ट नाही. तो कुणीतरी प्रेमानं द्यायला, वाढायला, भरवायलासुद्धा लागतो. पण आपल्याला कुणीतरी दिला तसा आपणही कुणाला तरी प्रेमानं द्यायला लागतो. 
आस्वाद:
  • प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणं हा एक अत्यंत नाजुक-साजुक, कौतुकानं, कौतुक करत, नजाकतीनं, सावकाश आस्वाद घेत खायचा पदार्थ आहे. आधी त्याच्याकडं प्रेमानं बघावं आणि त्याचा आकार, मोतिया रंग, असंख्य पातळ पापुद्रे यांची वाखाणणी करावी. मग ही सगळी रचना आपण बिघडवणार याचा मनात खेद करत, तो जेमतेम तोंडात शिरेल इतपतच तोंड उघडून तो थोडासा तोंडात सरकवावा आणि हलकेच दातांनी स्पर्ष करावा आणि हलकेच त्याचा चावा घ्यावा. या चाव्याची तुलना आणखी फक्त एकाच चाव्याशी करता येते. (रसिकांनी समजून घ्यावे). मग चावा घेतानाची कुरकूर समाधानानं ऐकत त्याचा लहान तुकडा तोंडात हळूहळू चावत, जिभेनं कुस्करत, तोंडात विरघळू द्यावा. वाऽऽऽ! 
  • मग त्याची अगदी हलकी गोडसर चव जिभेवर पसरते, तिचा डोळे मिटून समाधानानं आस्वाद घ्यावा. संपूर्ण समाधान व्ह्यायला एवढा एक घास पुरेसा आहे. पण आपल्याला थोडं अजून हवं असं वाटतं त्यासाठी अजून एक-दोन घास. मग पुरे, 
  • पाककृतीच्या शेवटी प्रत्येकी 3 चिरोटे असं म्हटलं ते आजच खाऊन संपवण्यासाठी नाहीत. मिळालेल्या सुख-समाधानाच्या आठवणी मनात घोळवण्यासाठी मधे वेळ तर पाहिजे! 
  • तेव्हा एक चिरोटा आज, एक उद्या आणि एक परवा. 
चिंतन:
  • याच चिरोटयांवर पिठीसाखर भुरभुरण्याऐवजी साखरेसा पक्का पाक टाकला की झाले पाकातले चिरोटे. ते पुरेसे (भरपूर गोड) लागतात आणि गोड खाणार्‍यांना आवडतात. ते इतके नाजुक नाहीत आणि नजाकतीनं खाल्ले नाहीत तरी चालतात. गोड आवडणारे ते गपागप 4-5-6 तरी खाणारच. 
  • यात मैद्याच्या पोळ्या करताना त्यात खाण्याचे रंग / केशर वगैरे टाकल्यास रंगीत चिरोटे होतात. तीन पोळ्या तीन रंगाच्या केल्यास आणि कप उभे दाबण्याऐवजी आडवे पाडून पुर्‍या लाटून तळल्यास आणखी छान दिसतात. केशरी-पांढरा-हिरवा रंगाचे केल्यास देशप्रेमही दाखवता येतं. किंवा विशिष्ट रंग वापरल्यास धार्मिक अस्मिताही जपता येते. थोडक्यात, रंग वापरतानाही ते किती प्रमाणात, कसे आणि कशासाठी वापरायचे ते कळलं पाहिजे. 
  • चिरोटे करताना आणि खाताना ते करण्याचे उद्देश, उद्देशांची सफलता, त्यांची पौष्टीकता, अन्न म्हणून किंमत, इत्यादी गोष्टींचा विचार मात्र करायचा नसतो.  खाण्याचा आनंद, वाढण्यातलं आणि खाऊ घालण्यातलं प्रेम आणि कौतुक अमूल्य असतं.  



No comments:

Post a Comment