OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Showing posts with label उसळ. Show all posts
Showing posts with label उसळ. Show all posts

Monday, May 16, 2011

हरभर्‍याची उसळ

हरभर्‍याची उसळ

प्रकार:

उसळ

गरम

किती जणांसाठी: ४

प्रक्रिया: फोडणी करणे, परतणे, उकळणे, उकडणे

पौष्टिकता:

क्षार

जीवनसत्त्वे – “ब” व “क”

भरपूर प्रथिने

कर्बोदके व स्निग्ध पदार्थ

वेळ:

पूर्वतयारीचा:

१२, १८ ते २४ तास

वाढण्याचा:

१ मिनिटे

पाककृतीचा:

२० मिनिटे

खाण्याचा:

१५ ते ३० मिनिटे













नाव:

हरभर्‍याची उसळ

प्रस्तावना:

चैत्र महिना म्हणजे टरबूज-कलिंगडं, डाळ-पन्हं आणि हरभर्‍याच्या उसळीचे दिवस. नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं ना? तेव्हा एकदा हरभर्‍याची उसळ व्हायलाच पाहिजे. शिवाय एकदा आपण हिरव्या मटारची सोपी उसळ करायलाही शिकलो आहोत.

इच्छा:

तेव्हा आज ही उसळ करून बघायला हरकत नाही. करूयाच!

पूर्वतयारी:

· आधल्या संध्याकाळी चार घरी चैत्रातल्या हळदीकुंकवाला जाऊन येणे. (किंवा स्वतःच्या घरी हळदीकुंकू करणे. शेवटी कुणालातरी हरभरे भिजत टाकायला लागतातच.)

· मोड येण्यासाठी हरभरे फडक्यात (स्वच्छ) बांधून ठेवणे. (म्हणजे आज सकाळपर्यंत १ मीमी व संध्याकाळपर्यंत ३ मीमी मोड आपोआप येतात. (त्यासाठी रात्रभर बघत बसावे लागत नाही.)

· तीन शिट्ट्या होईपर्यंत हरभरे प्रेशर कुकरमधे शिजवून घेणे.

· एक मोठा बटाटा उकडून ठेवणे. (तो हरभर्‍यांबरोबरच प्रेशर-कुकरमधे ठेवता येतो. वेगळा उकडावा लागत नाही – आठवा न्यूटन, त्याची मांजरी व तिच्या पिल्लांची गोष्ट).

· नारळ खोवून ठेवणे.

तयारी:

आपण दीड वाटी मोड आलेले हरभरे, एक उकडलेला बटाटा, एक लहान टॉमॅटो, फोडणीचे सामान (४ चमचे तेल, १ चमचा मोहरी, कढीलिंबाची पाने, १ चमचा लाल तिखट, २ चमचे गोडा मसाला, हळद व हिंग), नारळाचा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व ३*३*३ सेंमी (म्हणजे लिंबाएवढा) गुळाचा खडा घेऊ. शिवाय आपल्याला ४ वाट्या पाणी लागेल.

पाककृती:

· एका पातेल्यात आपण ४ वाट्या पाणी तापत ठेवू.

· दुसर्‍या मोठ्या पातेल्यात किंवा कढईत फोडणी करू. (फोडणीत वर दिलेल्या क्रमानेच पदार्थ टाकावे).

· त्यावर शिजवलेले हरभरे टाकून परतून घेऊ.

· मग त्यात उकळतं पाणी, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चिरलेला टॉमॅटो व नारळाचा कीस टाकू.

· पाण्याला उकळी फुटताच गॅस बारीक करून, झाकण ठेऊन ५ मिनिटं उकळत ठेऊ.

· ३ मिनिटांनंतर मीठ व गूळ टाकू व चव बघू. आवश्यकतेप्रमाणे त्यात थोडे मीठ व तिखट टाकू.

समृद्धीकरण

· आपण यात थोडं दाण्याचं कूट टाकू शकतो.

· खाताना आवडीप्रमाणे लिंबू पिळूया.

कौशल्य:

· फोडणी करण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात झालेलं आहेच.

· हरभरा हवा तितका शिजलेला आहे हे तपासणं आवश्यक आहे. आपण मोड आलेला हरभरा (थोड्या प्रमाणात) कच्चा खाऊ शकत असल्याने तो शिजणं हा प्रश्न नाही. पण अती शिजून त्याचे पुरण होऊ नये हे बघणे आवश्यक आहे.

· तसेच मीठ व गूळ अगदी शेवटी टाकावे. नाहीतर हरभरे आवळतात.

· या उसळीचा रस्सा मध्यम घट्ट हवा. पण हरभर्‍यामुळे व बटाट्यामुळे तो आपोआप मिळून येतो.

· उसळीची चवही ३-४ वेळा बघावी (त्यात लाज मानू नये) व जुळवावी.

· चव घेऊन बघण्याआधी वासही घेऊन बघायची सवय लावून घ्यावी.

सजावट:

· पिवळट तपकिरी रंगाची ही उसळ छान दिसते. त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की पुरे.

· नुसती खायची असल्यास तिच्यावर बारीक शेव (पिवळी) व बारीक चिरलेला टॉमॅटॉ टाकला की उत्कृष्ट सजावट होते आणि चवही वाढते.

वाढप:

· ही नुसतीही खाता येते.

· अर्थातच पोळी, पराठा, भाकरी, ब्रेड व भाताबरोबरही ही छानच लागते.

· ही भटुर्‍याबरोबरही (छोल्यांऐवजी) खाता येते.

आस्वाद:

· गरम भाकरी, तूप, ही उसळ व कैरीची चटणी किंवा लोणचं म्हणजे उत्कृष्ट दोन-पदार्थ-आहार. (तोंडाला पाणी सुटलं ना?).

· खायला सुरुवात केल्यावर १० मिनिटं गप्पा बंद पडतात.

· ही उसळ खूप चावून खाणे आवश्यक आहे (नाहीतर अपचन होते). खूप चावून सावकाश गप्पा मारत खाल्ल्यानं तिची चव (व गप्पा) वाढतच जाते.

· पण आवडली म्हणून ती जास्त खाऊ नये व गप्पांच्या नादात नुसती गिळू नये. (दोन्ही गोष्टी खरं तर सर्वच पदार्थांच्या बाबतीत लागू आहेत.)

· काही लोक छोले-भटुरेही खातात! त्यांनी ही उसळ खाल्लेली नसते हे त्यांचं दुर्दैव!

चिंतन:

· नवीन हरभरा आल्यावर (चैत्रात) ही उसळ व्हायलाच पाहिजे. पण पौष्टीक आणि चवदार असल्याने एरवीही आपण ती जास्त वेळा करायला पाहिजे. (पावसाळ्यात ती पचत नाही असे म्हणतात.) (चांगला वाळलेला हरभरा वर्षभर टिकतो व घरात साठवून ठेवता येतो किंवा कधीही बाजारात मिळतो. शिवाय इतर कडधान्यांइतकाच गुणवान असूनही त्यांच्या निम्म्या किमतीत तो मिळतो.)

· नुसत्या भिजलेल्या हरभर्‍यांचीही उसळ करता येते. पण मोड आलेले चांगले. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात व त्यात “ब” गटातील जीवनसत्वे तयार होतात. शिवय हरभरे लवकर शिजतात.

· ही करायला सोपी असल्याने नवर्‍याला शिकवून ठेवावी. म्हणजे आपण माहेरी गेल्यावर एकटे असताना किंवा मित्रांचे टोळके जमवून पार्टी करतानाही नवर्‍याला करता येण्यासारखा हा छान पदार्थ आहे. (फक्त मोडाचे हरभरे फ्रीझ्‌मधे ठेवून द्यावे.) ही उसळ जरुरीप्रमाणे तेलाशिवाय किंवा कमी-जास्त तेलात आणि कमी-जास्त तिखट-मसालेदार करता येते.

· मोडाचे हरभरे वापरून कोरडी चटपटीत उसळ व वांगं, कांदा, भाजका कांदा, सालासकट बटाटे व गरम मसाला (किंवा मटण मसाला) घातलेली उसळही करता येते. या दोन्ही उसळींची पाककृती पुन्हा कधीतरी.

Thursday, February 24, 2011

मटारची उसळ



प्रकार:
उसळ
गरम
किती जणांसाठी: ४
प्रक्रिया: फोडणी करणे,  परतणे, उकळणे,
पौष्टिकता:
क्षार
जीवनसत्त्वे – “ब” व “क”
प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ   

वेळ:
पूर्वतयारीचा:
१५ मि
वाढण्याचा:
२ मि

पाककृतीचा:
८ मि
खाण्याचा:
१५ ते ३० मि


नाव:
मटारची उसळ
प्रस्तावना:
वर्षात २-३ वेळा मटार भरपूर येतो आणि स्वस्त होतो. यामुळे आणि हिरव्या मटारच्या अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे त्याच्या अनेक पाककृती करता येतात. त्यांपैकी मटारची उसळही अनेक प्रकारांनी करता येते.
इच्छा:
त्यातील सर्वात सोपी, उसळ-ब्रेडमधली उसळ आपण आज करूया.
पूर्वतयारी:
·         मटारच्या शेंगा शेतातून तोडून आणणे. (आम्ही आणतो बुवा! तुम्ही वाटलं तर बाजारातून आणा. किंवा वरच्या फोटोतल्या शेतातून आणा.) 
·         मटारच्या शेंगा सोलून दाणे काढून ठेवणे. हल्ली बाजारात सोललेले दाणे किंवा गोठवलेले मटारचे दाणेही मिळतात. वेळ नसल्यास किंवा आयत्या वेळी उसळ करायला ते ठीक. पण (स्वतः शेतातून शेंगा तोडून) स्वतः सोललेल्या ताज्या दाण्यांची गंमत वेगळी. शिवाय ते सोलतासोलता खाताही येतात (म्हणून मुलेसुद्धा ते आवडीने सोलतात) व खावेत. शेंगेच्या आत ते पूर्ण स्वच्छ असतात, पौष्टिक असतात, कच्चे असल्याने त्यातील सर्व अन्नघटक उपलब्ध होतात व ते खाल्ल्यने वजन वाढत नाही. (का?- विचार करा किंवा तुमच्यासाठी आम्ही केलेला विचार खाली “चिंतन” मधे वाचा.)
·         एक बटाटा उकडून ठेवणे.
·         सुकं खोबरं भाजून ठेचून किंवा किसून भाजून घेऊ.
तयारी:
आपण दोन वाट्या मटारचे दाणे, एक उकडलेला बटाटा, फोडणीचे सामान (४ चमचे तेल, १ चमचा मोहरी, १ चमचा लाल तिखट, २ चमचे गोडा मसाला, १ चमचा गरम मसाला, हळद व हिंग), आलं-लसूण पेस्ट, कढीलिंब, भाजून ठेचलेलं किंवा किसून भाजलेलं सुकं खोबरं, मीठ व ३*३*३ सेंमी (म्हणजे लिंबाएवढा) गुळाचा खडा घेऊ. शिवाय आपल्याला ५ वाट्या पाणी लागेल.
पाककृती:
·         एका पातेल्यात आपण ५ वाट्या पाणी तापत ठेऊ.
·         दुसर्‍या मोठ्या पातेल्यात किंवा कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेऊ. त्यात मोहरी टाकू. ती तडतडायला लागल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट, कढीलिंब, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, हळद व हिंग (याच क्रमाने) टाकू.
·         त्यावर मटारचे दाणे व थोडे मीठ टाकून (अगदी थोडेसेच) परतून घेऊ.
·         मग त्यात बटाट्याच्या फोडी, खोबरं, गूळ व उकळतं पाणी टाकू.
·         पाण्याला उकळी फुटली की गॅस बारीक करून, झाकण ठेऊन ५ मिनिटं उकळत ठेऊ.
·         ३ मिनिटांनंतर मटार शिजले का ते व चव बघू. आवश्यकतेप्रमाणे त्यात थोडे मीठ व तिखट टाकू. 
समृद्धीकरण
·         आपण यात मक्याचे दाणे (थोडी जादा कर्बोदके), ४ चमचे दाण्याचं कूट आणि/किंवा २ अंडी (जादा प्रथिने) उसळीला उकळी फुटताच टाकू शकतो.
·         खाताना आवडीप्रमाणे लिंबू पिळूया.
कौशल्य:
·         आत्तापर्यंत फोडणी करण्याचे कौशल्य आपल्याला पुरेसं आत्मसात झालेलं आहे असं गृहीत धरूया.
·         मटार हवा तितका शिजलेला आहे हे २-३ वेळा तपासणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आपण मटार कच्चा खाऊ शकत असल्याने तो शिजणं हा प्रश्न नाही आहे. तो जादा शिजून त्याचा स्वच्छ हिरवा रंग बदलू नये (रंग बदलण्याचा अर्थ त्यातील अनेक उपयुक्त अन्नघटकांचा – जीवनसत्वे – नाश झाला असा आहे) व अती शिजून त्याचे पुरण होऊ नये हे बघणे आवश्यक आहे. तसेच मटारच्या जातीप्रमाणे बरोबर शिजण्याचा वेळ कमी-जास्त असतो.
·         या उसळीचा रस्सा पातळ हवा. म्हणून अजून थोडे पाणी जरुरीप्रमाणे घालावे.
·         उसळीची चवही ३-४ वेळा बघावी (त्यात लाज मानू नये). तिखट, गोड , व विशेषतः खारट या चवींचा सुयोग्य मेळ जमवणे हे तंबोरा जुळवण्याइतकेच कौशल्याचे काम आहे. या बाबतीत आपण स्वतःला कधीही एक्स्पर्ट समजू नये. (माझी बायको मांसाहारी पदार्थ उत्कृष्ट करते. पण अजीबात चव न बघता करते कारण ती संपूर्ण शाकाहारी आहे. पण हे अपवादात्मक परीस्थितीत व फक्त काही लोकांनाच जमू शकते.)
·         चव घेऊन बघण्याआधी वासही घेऊन बघायची सवय लावून घ्यावी.
सजावट:
उसळ बरोबर झाली तर लाल-केशरी रश्शात हिरवे मटारचे दाणे आधीच खूप छान दिसतात. त्यावर थोडी कोथिंबीर व बारीक शेव (पिवळा रंग) टाकली की उत्कृष्ट सजावट होते आणि चवही वाढते.
वाढप:
·         एका प्लेटमधे लोण्यावर अर्धवट भाजलेले ब्रेडचे २ स्लाईस (ब्रेड थोडा मऊ हवा, अगदी कुरकुरीत नको) घ्यावे. शेजारी टोमॅटो-कांद्याच्या चकत्या व (शक्यतो) पांढर्‍या वाडग्यात ही उसळ ठेवावी व (ग्लासभर पाण्याबरोबर) द्यावी.
·         ही अर्थातच पोळी, पराठा, भाकरी व भाताबरोबरही छानच लागते.
आस्वाद:
·         आता दोन्ही हातांनी ब्रेडचा तुकडा तोडून तो रश्श्यात बुडवून भिजवावा व अलगद तोंडात सोडावा. तोंड भाजणे, चारदा हाऽऽ हाऽऽ करणे व ठसका लागणे अपेक्षितच आहे.
·         खरी चव ३-४ घासांनंतरच कळायला लागते. ती शेवटपर्यंत वाढतच जाते. म्हणून कधी थांबायचं हे आपणच ठरवायला हवं.
·         खायला सुरुवात केल्यावर १५ मिनिटं गप्पा बंद पडतात. हेही अपेक्षित आहे. नंतर त्या आपोआप सुरू होऊन वाढतच जातात.
·         काही लोक स्लाईस हातात घेऊन त्याचा दातांनी (कोरडा) तुकडा तोडतात व उसळ चमच्यानं तोंडात सारतात. ते मूर्ख असतात.   
चिंतन:
·         बॅचलर असताना, बायको माहेरी गेल्यावर एकटे असताना किंवा मित्रांचे टोळके जमवून पार्टी करायलाही हा छान पदार्थ आहे.
·         मटारच्या दिवसांत एकदा तरी ही उसळ व्हायलाच पाहिजे.
·         ही जरुरीप्रमाणे तेलाशिवाय किंवा कमी-जास्त तेलात आणि कमी-जास्त तिखट करता येते.