
प्रकार: | उसळ | गरम | किती जणांसाठी: ४ | प्रक्रिया: फोडणी करणे, परतणे, उकळणे, उकडणे |
पौष्टिकता: | क्षार | जीवनसत्त्वे – “ब” व “क” | भरपूर प्रथिने | कर्बोदके व स्निग्ध पदार्थ |
वेळ: | पूर्वतयारीचा: | १२, १८ ते २४ तास | वाढण्याचा: | १ मिनिटे |
| पाककृतीचा: | २० मिनिटे | खाण्याचा: | १५ ते ३० मिनिटे |
नाव: | हरभर्याची उसळ |
प्रस्तावना: | चैत्र महिना म्हणजे टरबूज-कलिंगडं, डाळ-पन्हं आणि हरभर्याच्या उसळीचे दिवस. नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं ना? तेव्हा एकदा हरभर्याची उसळ व्हायलाच पाहिजे. शिवाय एकदा आपण हिरव्या मटारची सोपी उसळ करायलाही शिकलो आहोत. |
इच्छा: | तेव्हा आज ही उसळ करून बघायला हरकत नाही. करूयाच! |
पूर्वतयारी: | · आधल्या संध्याकाळी चार घरी चैत्रातल्या हळदीकुंकवाला जाऊन येणे. (किंवा स्वतःच्या घरी हळदीकुंकू करणे. शेवटी कुणालातरी हरभरे भिजत टाकायला लागतातच.) · मोड येण्यासाठी हरभरे फडक्यात (स्वच्छ) बांधून ठेवणे. (म्हणजे आज सकाळपर्यंत १ मीमी व संध्याकाळपर्यंत ३ मीमी मोड आपोआप येतात. (त्यासाठी रात्रभर बघत बसावे लागत नाही.) · तीन शिट्ट्या होईपर्यंत हरभरे प्रेशर कुकरमधे शिजवून घेणे. · एक मोठा बटाटा उकडून ठेवणे. (तो हरभर्यांबरोबरच प्रेशर-कुकरमधे ठेवता येतो. वेगळा उकडावा लागत नाही – आठवा न्यूटन, त्याची मांजरी व तिच्या पिल्लांची गोष्ट). · नारळ खोवून ठेवणे. |
तयारी: | आपण दीड वाटी मोड आलेले हरभरे, एक उकडलेला बटाटा, एक लहान टॉमॅटो, फोडणीचे सामान (४ चमचे तेल, १ चमचा मोहरी, कढीलिंबाची पाने, १ चमचा लाल तिखट, २ चमचे गोडा मसाला, हळद व हिंग), नारळाचा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व ३*३*३ सेंमी (म्हणजे लिंबाएवढा) गुळाचा खडा घेऊ. शिवाय आपल्याला ४ वाट्या पाणी लागेल. |
पाककृती: | · एका पातेल्यात आपण ४ वाट्या पाणी तापत ठेवू. · दुसर्या मोठ्या पातेल्यात किंवा कढईत फोडणी करू. (फोडणीत वर दिलेल्या क्रमानेच पदार्थ टाकावे). · त्यावर शिजवलेले हरभरे टाकून परतून घेऊ. · मग त्यात उकळतं पाणी, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चिरलेला टॉमॅटो व नारळाचा कीस टाकू. · पाण्याला उकळी फुटताच गॅस बारीक करून, झाकण ठेऊन ५ मिनिटं उकळत ठेऊ. · ३ मिनिटांनंतर मीठ व गूळ टाकू व चव बघू. आवश्यकतेप्रमाणे त्यात थोडे मीठ व तिखट टाकू. |
समृद्धीकरण | · आपण यात थोडं दाण्याचं कूट टाकू शकतो. · खाताना आवडीप्रमाणे लिंबू पिळूया. |
कौशल्य: | · फोडणी करण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात झालेलं आहेच. · हरभरा हवा तितका शिजलेला आहे हे तपासणं आवश्यक आहे. आपण मोड आलेला हरभरा (थोड्या प्रमाणात) कच्चा खाऊ शकत असल्याने तो शिजणं हा प्रश्न नाही. पण अती शिजून त्याचे पुरण होऊ नये हे बघणे आवश्यक आहे. · तसेच मीठ व गूळ अगदी शेवटी टाकावे. नाहीतर हरभरे आवळतात. · या उसळीचा रस्सा मध्यम घट्ट हवा. पण हरभर्यामुळे व बटाट्यामुळे तो आपोआप मिळून येतो. · उसळीची चवही ३-४ वेळा बघावी (त्यात लाज मानू नये) व जुळवावी. · चव घेऊन बघण्याआधी वासही घेऊन बघायची सवय लावून घ्यावी. |
सजावट: | · पिवळट तपकिरी रंगाची ही उसळ छान दिसते. त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की पुरे. · नुसती खायची असल्यास तिच्यावर बारीक शेव (पिवळी) व बारीक चिरलेला टॉमॅटॉ टाकला की उत्कृष्ट सजावट होते आणि चवही वाढते. |
वाढप: | · ही नुसतीही खाता येते. · अर्थातच पोळी, पराठा, भाकरी, ब्रेड व भाताबरोबरही ही छानच लागते. · ही भटुर्याबरोबरही (छोल्यांऐवजी) खाता येते. |
आस्वाद: | · गरम भाकरी, तूप, ही उसळ व कैरीची चटणी किंवा लोणचं म्हणजे उत्कृष्ट दोन-पदार्थ-आहार. (तोंडाला पाणी सुटलं ना?). · खायला सुरुवात केल्यावर १० मिनिटं गप्पा बंद पडतात. · ही उसळ खूप चावून खाणे आवश्यक आहे (नाहीतर अपचन होते). खूप चावून सावकाश गप्पा मारत खाल्ल्यानं तिची चव (व गप्पा) वाढतच जाते. · पण आवडली म्हणून ती जास्त खाऊ नये व गप्पांच्या नादात नुसती गिळू नये. (दोन्ही गोष्टी खरं तर सर्वच पदार्थांच्या बाबतीत लागू आहेत.) · काही लोक छोले-भटुरेही खातात! त्यांनी ही उसळ खाल्लेली नसते हे त्यांचं दुर्दैव! |
चिंतन: | · नवीन हरभरा आल्यावर (चैत्रात) ही उसळ व्हायलाच पाहिजे. पण पौष्टीक आणि चवदार असल्याने एरवीही आपण ती जास्त वेळा करायला पाहिजे. (पावसाळ्यात ती पचत नाही असे म्हणतात.) (चांगला वाळलेला हरभरा वर्षभर टिकतो व घरात साठवून ठेवता येतो किंवा कधीही बाजारात मिळतो. शिवाय इतर कडधान्यांइतकाच गुणवान असूनही त्यांच्या निम्म्या किमतीत तो मिळतो.) · नुसत्या भिजलेल्या हरभर्यांचीही उसळ करता येते. पण मोड आलेले चांगले. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात व त्यात “ब” गटातील जीवनसत्वे तयार होतात. शिवय हरभरे लवकर शिजतात. · ही करायला सोपी असल्याने नवर्याला शिकवून ठेवावी. म्हणजे आपण माहेरी गेल्यावर एकटे असताना किंवा मित्रांचे टोळके जमवून पार्टी करतानाही नवर्याला करता येण्यासारखा हा छान पदार्थ आहे. (फक्त मोडाचे हरभरे फ्रीझ्मधे ठेवून द्यावे.) ही उसळ जरुरीप्रमाणे तेलाशिवाय किंवा कमी-जास्त तेलात आणि कमी-जास्त तिखट-मसालेदार करता येते. · मोडाचे हरभरे वापरून कोरडी चटपटीत उसळ व वांगं, कांदा, भाजका कांदा, सालासकट बटाटे व गरम मसाला (किंवा मटण मसाला) घातलेली उसळही करता येते. या दोन्ही उसळींची पाककृती पुन्हा कधीतरी.
|
|
|
Phaar mahatwache motthe aani dolas kam karto aahes. Nutrition chi jaan sagalyach doctors na astech ase nahi. Pan tula tee jaan aani kalatmak drishti pan milali aahe.
ReplyDeleteBundhe Ozardekar blog kade pan thodefar lakshya asudet.