
प्रकार:
|
सुका खाऊ
|
गार/कोमट/ गरम
|
किती जणांसाठी: ४
|
प्रक्रिया: फोडणी करणे, हलके तळणे, परतणे, मिसळणे.
|
पौष्टिकता:
|
क्षार
|
कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ
|
पचायला सोपा व हलका
|
कमी तेलकट, वजन घटवणारा पण पौष्टिक
|
वेळ:
|
पूर्वतयारीचा:
|
१५ मि
|
वाढण्याचा:
|
१ मि
|
पाककृतीचा:
|
५-८ मि
|
खाण्याचा:
|
५ मि
|
नाव: |
लाह्यांचा पौष्टिक चिवडा
|
प्रस्तावना:
|
चटकदार चिवडा सर्वांना आवडतो. चिवड्याचे अनेक प्रकार आहेत. पण बहुतेक सर्व प्रकार करण्यासाठी भरपूर तेल लागतं. मुलांचे ठीक आहे. पण मोठ्यांसाठी, पथ्ये असणार्यांसाठी व वयस्कांसाठी इतकं तेल घातक ठरू शकतं. हा चिवडा करण्यासाठी कमी तेल पुरतं. पण चिवड्याच्या इतर सर्व गुणांनी (चविष्टपणा, चटकदारपणा, पौष्टिकता, पचनसुलभता, टिकाऊपणा) हा परिपूर्ण आहे.
|
इच्छा:
|
हा खाण्याची इच्छा सर्वांना लगेच होते पण केल्याशिवाय खाणार कसा? कोणीतरी तो केलाच पाहिजे, तर मग आपणच तो करूया. चव घेण्याच्या निमित्तानं करताकरताच (खमंग वास सुटलेला असताना) तो गरम-गरम खाता येतो हा स्वतः करण्याचा आणखी एक फायदा.
|
पूर्वतयारी:
|
निरनिराळ्या प्रकारच्या लाह्या पाखडून, त्यातील गणंग, टरफलं काढून स्वच्छ करून घेणं; शेंगदाणे भाजून घेणं (हे आपण तळणार नाही आहोत); मिरच्या चिरून त्यांचे तुकडे करणं व कढीलिंबाची पानं धुवून घेणं.
|
तयारी:
|
साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या व मक्याच्या लाह्या पॉपकॉर्न प्रत्येकी एक वाटी; चुरमुरे दोन वाट्या (एकूण ५ वाट्या); भाजलेले शेंगदाणे पाव वाटी; डाळे पाव वाटी; मिरच्यांचे तुकडे (किंवा लाल मिरची पावडर), मीठ व पिठीसाखर चवीनुसार; कढीलिंब आणि ३-४ चमचे तेल घेऊया. शिवाय कढई/पातेलं व उलथनं.
|
पाककृती:
|
आता फोडणी करूया. त्यात मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब तेळून घेऊया व दाणे परतून घेऊया. नंतर डाळे टाकून गॅस बंद करू. नंतर सर्व प्रकारच्या लाह्या, चुरमुरे व चवीनुसार मीठ-पिठीसाखर घालून चांगलं मिसळून घेऊया. ५ मिनिटांत चिवडा तयार.
|
समृद्धीकरण
|
· शेंगदाणे व डाळ्यामुळे चिवडा प्रथिनांनी समृद्ध झालेलाच आहे. चिवडा करताना त्यांचे प्रमाण आपण आवश्यकतेनुसार कमीजास्त करू शकतो.
· खाताना चिवड्यावर लिंबाचा रस, बारीक चिरलेला कांदा, टॉमॅटॉ, गाजर, कोबी, कोथिंबीर, इ. टाकल्यास स्वाद व चव वाढण्याबरोबरच काही जीवनसत्वं व क्षारही मिळतील.
|
कौशल्य:
|
· फोडणी करणं, दाणे करपू न देणं व मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब बरोबर कुरकुरीत होईपर्यंत तळणं (कमी नाही व जास्त नाही) ही मूलभूत कौशल्यं आवश्यक आहेत.
· नंतर सर्व पदार्थ चांगले मिसळणंही आपल्याला जमत नसेल तर मग कठीण आहे.
|
सजावट:
|
· खाताना बारीक चिरलेला कांदा, टॉमॅटॉ, कोथिंबीर टाकल्यास सहजच सजावट होते.
|
वाढप:
|
· घरात कोणी नसताना चिवडा करून तो निवल्यावर डब्यात भरून ठेवणं महत्वाचं आहे. सर्व हुशार व धोरणी गृहिणी (सर्व असतातच) असंच करतात. नंतर तो आपण ठरवलेल्या प्रमाणात सर्वांना वाटीतून द्यावा. कोणी (सर्वच) जिभा बाहेर काढून “अजून, मला अजून” असं म्हणत असतील तर त्यांना चमचाभरच उपकार केल्यासारखा द्यावा.
· पुरुषांना हे आवडत नसेल तर त्यांनी स्वतः सर्व जमलेले असताना करावा. इतरांना वाटीतून देण्याची गरजच पडत नाही. आणि नंतर डब्यात भरून ठेवण्याचीही गरज नाही. सर्व चिवडा फस्त केल्यावरच सगळे उठतात.
· सर्वच प्रकारच्या चिवड्यांच्या बाबतीत हे खरं आहे.
|
आस्वाद:
|
· चिवडा चमच्यानं खायचा नसतो. शक्यतो तो एकट्यानेही खायचा नसतो.
· चिवड्याबरोबर किवा नंतर चहा असल्यास चिवड्याची मजा वाढते.
|
चिंतन:
|
· चिवडा वाढताना आणि खातानाही खाणार्यांच्या गरजेप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार त्यातील शेंगदाणे व डाळ्याचे प्रमाण आपण कमीजास्त करू शकतो.
· चिवडा खाण्याची सुरुवात करता येते. पण दुसर्याने आपल्याला उठवेपर्यंत किंवा चिवडा संपेपर्यंत खाणे थांबवता येत नाही. म्हणून हुशार व धोरणी गृहिणी करतात तेच (नेहमीप्रमाणेच) बरोबर असते.
· हा करायला फार अवघड नाही. आता इतरही चिवडे करून बघायला हरकत नाही.
· हा चिवडा (आणि असे चिवड्यांचे अनेक गुणसंपन्न प्रकार) आपल्याकडे उपलब्ध असताना लोक पॉप्कॉर्न, कुरकुरे वगैरे प्रकार कसे काय खाऊ शकतात?
· लाह्या (भाताच्या, ज्वारीच्या, मक्याच्या, इ.), चुरमुरे, पोहे, हे अनेक शक्यता असलेले गुणसंपन्न मूलभूत (बेस) पदार्थ आपल्याकडे उपल्ब्ध (भरपूर व स्वस्त) असताना आपण कॉर्नफ्लेक्स, नूडल्स हे उपरे, आयात केलेले, निर्गुण आणि महाग पदार्थ का म्हणून खायचे? आणि मुलांनाही खायला लावायचे?
· फक्त, लाह्या स्थानिक आहेत, आकर्षक पॅकमधे नाहीत, त्यांची जाहिरात होत नाही व त्या महाग नाहीत म्हणून?
· आणि हा चिवडा करणारी गृहिणी इंटरनॅशनल ब्रॅंड नाही म्हणून?
|
No comments:
Post a Comment