OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Showing posts with label उकळता. Show all posts
Showing posts with label उकळता. Show all posts

Monday, February 28, 2011

सोनेरी सकाळ (लाल भोपळा-मक्याचे सूप)

सोनेरी सकाळ (लाल भोपळा-मक्याचे सूप)


प्रकार:
पेय, सूप
गरम
किती जणांसाठी: ४
प्रक्रिया:   चिरणे, किसणे, व उकळणे
पौष्टिकता:
चोथा (फायबर) 
क्षार
जीवनसत्त्वे – बीटा कॅरॉटीन, “ब”, “क”.
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (लोणी) प्रोटीन्स
वेळ:
पूर्वतयारीचा:
५ मि
वाढण्याचा:
२ मि

पाककृतीचा:
५ मि
खाण्याचा:
१० मि













नाव:
सोनेरी सकाळ (लाल भोपळा-मक्याचे सूप)
प्रस्तावना:
हे चवदार व स्वादयुक्त; भूक वाढवणारे व भागवणारे, तरतरी आणणारे आणि जीवनसत्वे व क्षारयुक्त हिरवट पिवळे-केशरी सूप आहे. हे आपण केव्हाही घेऊ शकतो. पण दिवसाची सुरुवात उत्साही, ऊबदार व सोनेरी करण्यासाठी हे सकाळी (रविवारी सकाळी खेळून किंवा टेकडी चढून आल्यावर घ्यायला फारच छान) कुटुंबीयांबरोबर नाष्ट्याच्या वेळी (किंवा नाष्ट्याऐवजी) घ्यावं.
ते रात्री जेवणाआधी अर्धा तास किंवा जेवणाऐवजी घ्यायलाही चांगले आहे.
इच्छा:
हे आपण चार जणांसाठी, आपल्या चौकोनी कुटुंबासाठी, बनवूया. पण थोडं जास्त, रविवारी सकाळी अचानक येणार्‍या पण येताना आनंद आणणार्‍या एखाद्या मित्रासाठी.
पूर्वतयारी:
आधीच्या रात्री भाज्यांचा अर्क (व्हेजीटेबल स्टॉक) बनवून ठेवणे. त्यासाठी एक लीटर पाण्यात एक पेंडी (कोणत्याही) पालेभाजीचे देठ, एका कोथिंबीरीच्या जुडीचे देठ (अर्थात स्वच्छ धुवून व) व घरातील उरल्यासुरल्या भाज्या (कांद्याची पात, फ्लॉवरचे देठ, कोबीची पाने, गाजराचा तुकडा, इ.) यांचे बारीक तुकडे करून (पातेल्यावर झाकण ठेऊन) उकळून व गाळून घेऊ. शिजलेले तुकडे मिक्सरमधून बारीक करून त्यात थोडे गाळून घेतलेले पाणी घालून पुन्हा गाळून घेऊ (म्हणजे सर्व भाज्यांचा अर्क गाळलेल्या पाण्यात उतरेल). हे गाळून घेतलेले पाणी म्हणजेच भाज्यांचा अर्क.
तयारी:
आपल्याला साडेपाच कप पाणी (किंवा भाज्यांचा अर्क-व्हेजिटेबल स्टॉक), दोन-तीन मक्याची कणसं (1 वाटी कीस), ३*३” (किंवा अर्धा पाव) लाल भोपळा, दोन मुठी कोथिंबीर, मिळाल्यास ५-६ पुदिन्याची पानं, एक-दोन मध्यम तिखट मिरच्या, बोटभर आलं, पाच-सहा लसूण-पाकळ्या, थोडी मिरपूड, अर्धं लिंबू, सहा चमचे मक्याचं (कॉर्नचं) पीठ, मीठ आणि लोणी लागेल.   
पाककृती:
·         आता मक्याची कणसं व लाल भोपळा किसून घेऊ; कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. आलं व लसणाचे बारीक काप करून घेऊ (किंवा आलं किसून व लसूण ठेचून चालेल), मिरच्यांना उभा छेद देऊन ठेवू, लिंबाचा रस काढून ठेवू आणि कॉर्नचे पीठ अर्धा कप पाण्यात भिजवून ठेवू.
·         आता पातेल्यात पाच कप भाज्यांचा अर्क (आज आपण पोकळ्याच्या लाल देठांचा व कोथिंबीरीच्या देठांचा अर्क वापरणार आहोत) उकळत ठेवू. त्यात मक्याचा कीस, आलं, लसूण व मिरपूड टाकू.
·         पाण्याला काटा आल्यावर त्यात किसलेला लाल भोपळा व चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी कोथिंबीर व पुदिन्याची पानं टाकू. मग त्यात उभ्या चिरलेल्या मिरच्या व चवीपुरते मीठ टाकून झाकण ठेवू.
·         पाण्याला उकळी फुटल्यावर वास व चव घेऊन बघू. सर्व बरोबर असेल तर त्यात भिजवलेलं मक्याचं पीठ हळूहळू टाकून झाकण ठेवून मंद गॅसवर एक मिनिट (मनात साठ आकडे मोजू) उकळत ठेवू.
·         नंतर गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस टाकू. पुन्हा वास व चव घेऊन बघू.
समृद्धीकरण
·         पाण्याऐवजी भाज्यांचा अर्क वापरून, लिंबाचा रस घालून व नंतर वाढताना लोणी टाकून आपण पुरेसे समृद्धीकरण केलेच आहे. आत्ता तेवढे पुरेसे आहे.
·         थोडे हिरवे वाटाणे/हरभरा/मोडाचे मूग अर्धवट बारीक करून (किंवा पेस्ट करून) आपण घालू शकतो. ते छान दिसतात व छान लागतात (तेवढेच थोडे प्रोटीन).
कौशल्य:
·         आलं, लसूण व हवे असल्यास दालचिनी-लवंग-मिरपूड पाण्यात लगेच टाकल्यास त्यांचे स्वाद चांगले उतरतील.
·         किसलेला भोपळा व कोथिंबीर पाण्याला काटा आल्यावर टाकल्यानं ती योग्य प्रमाणात शिजतात. त्यामुळे त्यांचा रंग (केशरी-पिवळा व स्वच्छ हिरवा) व स्वाद कायम रहातो व मुख्य म्हणजे त्यातील जीवनसत्वं नाश पावत नाहीत.
·         हिरव्या मिरच्या उशीरा टाकल्यानं त्यांचा ताजा स्वाद टिकून राहातो व तिखटपणा जास्त उतरत नाही. हे सूप आपण नाष्ट्याच्या वेळी घेत असल्याने जास्त तिखट घेऊ नये. जास्त तिखट हवे असल्यास मिरच्या आधी टाकाव्या.
·         लिंबाचा रस वाढण्याच्या आधी टाकल्यानं सार कडसर होत नाही.
·         या सुपात मक्याची व भोपळ्याची गोडी असल्याने साखर घालू नये.
·         दोन वेळा वास व चव घेऊन बघणे आवश्यक आहे. एकदा स्वाद-संरचना व स्वाद-संगतीचा मेळ जुळवण्यासाठी व शेवटी सर्व बरोबर जमल्याची खात्री करण्यासाठी.
सजावट:
·         वरच्या सूचनांचं नीट पालन करून सार केलं असल्यास त्याला सुंदर हिरवट केशरी-पिवळा रंग येईल व वाढताना त्यावर जिर्‍याची फोडणी (किंवा चमचाभर लोणी) व थोडी कोथिंबीर टाकली की पुरेल.
·         रंगात जादा केशरीपणा हवा असल्यास (कारण लाल भोपळा पांढरट पिवळ्यापासून पूर्ण केशरी रंगापर्यंत मिळतो) थोडं किसलेलं गाजर घालूया.
·         मजेदारपणा वाढवण्यासाठी वरून थोडी चीजची बिस्किटे टाकूया.     
वाढप:
·         आता नीट ढवळत वाडग्यांमधे वाढून घेऊन त्यावर उरलेली चिरलेली कोथिंबीर टाकून  व 1 चमचा ताजे लोणी टाकून सादर करूया.
·         वेळेप्रमाणे, गरजेप्रमाणे व भुकेप्रमाणे हे सूप नुसते किंवा ब्रेड-टोस्ट, खाकरा-पोळी-पराठा, भाकरी-थालीपीठ व लोणचे/लसणाची चटणी किंवा जिराराईस-पुलाव-फ्राईड्राईस किंवा पिझ्झा यांबरोबर वाढता येते.
आस्वाद:
आधी डोळ्यांनी, मग डोळे मिटून नाकानं (अतीउत्साहात सूपमधे नाक बुडवू नका) आणि नंतर जिभेनं (हळूच, कारण जीभ भाजेल) आपण सूपचा आस्वाद घेऊ. (जरा निवल्यावर वाडगा तोंडाला लावून भुरकलं तरी चालेल. ... कुणाला?) हे सूप सिप्‌ करता, सुर्र्‌र्र्‌र्र्‌ करता, पिता, भुरकता किंवा खाता येतं. आपल्या स्टेटस्‌प्रमाणे (किंवा स्टेटस्‌ सांभाळून) काय हवं ते करा.
चिंतन:
·         नाष्ट्याच्या वेळी रिकाम्या पोटी चिंतन करता येत नाही. आधी आस्वाद मग जमल्यास चिंतन.
·         हळूहळू वाढणारी कौटुंबिक ऊब व गप्पा. शेवटी समाधान.
·         खरं समाधान देणार्‍या गोष्टी किती सोप्या आणि साध्या असतात!.
·         (संध्याकाळी जेवणाआधी घेत असू तर) हळूहळू उबेची जाणीव. मित्र/मैत्रिणींचा सहवास व गप्पा. शेवटी वाढत्या भुकेची जाणीव.
·         उरलेलं सूप जेवणातल्या भाजीच्या ग्रेव्हीत टाकता येईल. (हा अगदीच व्यवहारी, नीरस आणि अरसिकपणाचा विचार झाला.)


Friday, December 24, 2010

B) तापमान वर्गीकरण

वाढताना आणि खाताना एखादा पदार्थ कोणत्या तापमानाला असावा त्यानुसार हे वर्गीकरण केलं जातं. ते पुढीलप्रमाणे -
बर्फाप्रमाणं गार / गार / कोमट / गरम / उकळता.

Sunday, December 19, 2010

चाकवत-कोथिंबीर सार




प्रकार:
पेय
गरम
किती जणांसाठी: ४
प्रक्रिया:  उकळणे व फोडणी देणे. स्वच्छ सार हवे असल्यास पाला मिक्सरमधे वाटणे व सार तयार झाल्यावर गाळणे.
पौष्टिकता:
जीवनसत्त्वे व क्षार

चोथा (फायबर) – न गाळल्यास
स्निग्ध पदार्थ – लोणी किंवा फोडणी
प्रोटीन्स – वाटाणा/हरभरा घातल्यास
वेळ:
पूर्वतयारीचा:
५ मि
वाढण्याचा:
२ मि

पाककृतीचा:
५ मि
खाण्याचा:
१० मि










नाव:
चाकवत-कोथिंबीर सार
प्रस्तावना:
हे अप्रतीम चवदार, स्वादयुक्त, भूक वाढवणारे, तरतरी आणणारे आणि शिवाय जीवनसत्वे व क्षारयुक्त हिरवे सार आहे. हे आपण संध्याकाळी चहाच्या वेळी (चहाऐवजी) घेऊ शकतो. पण याची मजा एकत्र बसून गप्पा मारत घेण्यामधे आहे. म्हणून आपण ते रात्री जेवणाआधी अर्धा तास (ड्रिंक्स ऐवजी) मित्रांबरोबर घेऊ.
इच्छा:
हे आपण चार जणांसाठी बनवूया. त्यासाठी मित्रांना/मैत्रिणींना (तुम्ही अनुक्रमे पुरुष किंवा स्त्री असाल त्याप्रमाणे किंवा जोडीदाराच्या परवानगीने किंवा आपल्या जबाबदारीवर) आधीच बोलावून ठेवू.  
पूर्वतयारी:
मित्र/मैत्रिणी येतील ते काही फक्त सार पिऊन जाणार नाहीत. तेव्हा त्यांना जेवायलाच बोलवावे लागेल. (जेवण बनवण्याची जबाबदारी पाक-कलाकुशल जोडीदारावर किंवा इतर कुणावर सोपवूया कारण आपण अजून पाककला शिकतोय).
तयारी:
आपल्याला चार कप पाणी, दोन ओंजळी चाकवताची (पालक किंवा चुक्याचीही चालतील) पानं, दोन मुठी कोथिंबीर, मिळाल्यास ५-६ पुदिन्याची पानं, दोन मध्यम तिखट मिरच्या, बोटभर आलं, पाच-सहा लसूण-पाकळ्या, अर्धं लिंबू, चार चमचे मक्याचं (कॉर्नचं) पीठ, मीठ आणि साखर लागेल.
पातेलं, झाकणी, डाव, चार बाऊल्स, चार चमचे आणि अग्नीस्त्रोत हे अर्थातच हवे.   
पाककृती:
आता चाकवताची पानं (अर्थातच काळजीपूर्वक स्वच्छ धुतलेली) मिक्सरमधून बारीक करून (स्वच्छ सार हवे असल्यास) किंवा बारीक चिरून घेऊ. कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. आलं व लसणाचे बारीक काप करून घेऊ (किंवा आलं किसून व लसूण ठेचून चालेल), मिरच्यांना उभा छेद देऊन ठेवू, लिंबाचा रस काढून ठेवू आणि कॉर्नचे पीठ अर्धा कप पाण्यात भिजवून ठेवू.
आता पातेल्यात चार कप पाणी उकळत ठेवू. त्यात आलं, लसूण व साखर टाकू. पाण्याला काटा आल्यावर (पाण्याला उकळी फुटण्याआधी बुडबुडे फुटायला सुरुवात होण्याची स्थिती) त्यात चाकवताची वाटलेली/चिरलेली पाने व चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी कोथिंबीर व पुदिन्याची पानं टाकू. मग त्यात उभ्या चिरलेल्या मिरच्या व चवीपुरते मीठ टाकून झाकण ठेवू. पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात भिजवलेलं मक्याचं पीठ (कॉर्न फ्लोअर) हळूहळू टाकून झाकण ठेवून मंद गॅसवर एक मिनिट (मनात साठ आकडे मोजू) उकळत ठेवू. नंतर गॅस बंद करून झाकण काढून त्यात लिंबाचा रस टाकू.
समृद्धीकरण
लिंबाचा रस व नंतर लोणी टाकून आपण थोडे समृद्धीकरण केलेच आहे. थोडा हिरवा वाटाणा/हरभरा अर्धवट बारीक करून (किंवा पेस्ट करून) घातलेला छान लागतो (तेवढेच थोडे प्रोटीन). पण आत्ता आपण साधेच सार करायला शिकत असल्याने समृद्धीकरणाचा फार विचार करणार नाही आहोत.
कौशल्य:
·         आलं, लसूण व हवे असल्यास दालचिनी-लवंग-मिरपूड पाण्यात लगेच टाकल्यास त्यांचे स्वाद चांगले उतरतील.
·         चिरलेला चाकवत व कोथिंबीर पाण्याला काटा आल्यावर टाकल्यानं ती योग्य प्रमाणात शिजतात (अती जादा शिजत नाहीत) त्यामुळे त्यांचा रंग (स्वच्छ हिरवा) व स्वाद कायम रहातो व मुख्य म्हणजे त्यातील जीवनसत्वं नाश पावत नाहीत.
·         हिरव्या मिरच्या उशीरा टाकल्यानं त्यांचा ताजा स्वाद टिकून राहातो व तिखटपणा जास्त उतरत नाही. सार जास्त तिखट हवे असल्यास त्या आधी टाकाव्या.
·         लिंबाचा रस वाढण्याच्या आधी टाकल्यानं सार कडसर होत नाही.
·         चाकवताच्या सारात साखर घातली नाही तरी चालेल. चाकवताऐवजी पालक वापरल्यास पालकाचा उग्र स्वाद घालवण्यासाठी थोडी साखर टाकावी. चुका वापरल्यास तो मुळात आंबट असल्यानं लिंबाच्या रसाची जरूर नाही व साखर थोडी जास्त (आवडीनुसार) टाकली तरी चालेल.
सजावट:
वरच्या सूचनांचं नीट पालन करून सार केलं असल्यास त्याला सुंदर हिरवा रंग येईल व वाढताना त्यावर जिर्‍याची फोडणी (किंवा चमचाभर लोणी) व थोडी कोथिंबीर टाकली की पुरेल. थोडी विरोधी रंगसंगती हवी असल्यास थोडं किसलेलं गाजर घालूया.    
वाढप:
·         आता नीट ढवळत वाडग्यांमधे वाढून घेऊन त्यावर उरलेली चिरलेली कोथिंबीर टाकून मित्रांपुढं सादर करू.
·         या वेळेपर्यंत वाफांनी स्वादवार्ता पोचवलेली असल्याने सर्वजण आस्वाद घेण्याच्या तयारीत आधीच सज्ज होऊन बसलेले असतील. त्यांच्यापुढे साराचे वाडगे ठेवू, स्वतःचा वाडगा घेऊन बसू आणि म्हणू, “चला, आता साराचा स्वादानंद घेऊया”. (त्यांनी आधीच ते भुरकायला सुरुवात केली नसेल तर!)  
आस्वाद:
मग आधी डोळ्यांनी, मग नाकानं आणि नंतर जिभेनं (हळूच, कारण जीभ भाजेल) आपण साराचा आस्वाद घेऊ. (जरा निवल्यावर वाडगा तोंडाला लावून भुरकलं तरी चालेल. ... कुणाला?)  
चिंतन:
·         फक्त आस्वाद-समाधी. हळूहळू उबेची जाणीव. मित्र/मैत्रिणींचा सहवास व गप्पा. शेवटी वाढत्या भुकेची जाणीव.
·         मधेच कधी वाटलं तर या सारानं येणारी ऊब व इतर पेयांनी येणारी ऊब यांचा तौलनिक विचार.




































Monday, December 6, 2010

लिंबू-चहा

लिंबू-चहा


प्रकार:
पेय
गरम
किती जणांसाठी: १
शिजवण्याची पद्धत: उकळणे, गाळणे
पौष्टिकता:
क्षार
जीवनसत्त्वे – ब, क
कॅफीन, फ्लॅव्होनॉईड्स  
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स (कटेचिन्स)
वेळ:
पूर्वतयारीचा:
२ मि
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
३ मि
खाण्याचा:
१० मि


आता आपण लिंबू-चहा करायला शिकूया.
हा कोर्‍या चहाचा प्रकार हवामानाप्रमाणे गरम किंवा थंड पिता येतो. एकट्याने निवांत आस्वाद घेत किंवा मित्रांसोबत (असा चहा आवडणार्‍या) समारंभपूर्वक घेण्याचे हे पेय आहे.
पूर्वतयारी:
पण आपल्याला कोरा चहा आवडतो का? घेऊन तर बघू. हाही करायला (म्हटलं तर) अगदी सोपा आहे.
नुसत्या चहाबाजांपेक्षाही चहाच्या चाहत्यांना हा नक्की आवडतो.
तयारी:
आपल्याला थोडं पाणी; ते ठेवायला छोटं पातेलं, झाकायला ताटली आणि तापवायला विस्तव (शेकोटी, चूल, स्टोव्ह, गॅस, इ.); थोडी चहा-पत्ती (शक्यतो हिरवा चहा. तो न मिळाल्यास – आपल्याकडे सहसा मिळत नाहीच - काळ्या चहांपैकी ओपी – Orange pecco / pekoe, बीओपी – broken orange pecco किंवा सीटीसी सुद्धा चालेल. डस्ट नको), लिंबू आणि साखर; गाळणं आणि चहा भरून घ्यायला/द्यायला कप-बशी (किंवा मग) लागेल.
या सर्व गोष्टी योग्य वेळी हाताशी येतील अशी मांडणी करून पाककृतीला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला फक्त एक कपच चहा करणार आहोत. कारण त्याचा प्रयोग आपल्याला स्वतःवरच करायचा आहे. आपल्याला आवडल्याशिवाय व त्याचं महत्त्व पटल्याशिवाय आपण इतरांना कसा देणार?
पाककृती:
आपण प्रथम गॅस पेटवून त्यावर पातेले ठेवू. त्यात एक कप पाणी आणि एक चमचा साखर घालून पाण्याल उकळी फुटायची वाट बघत (हातांची घडी घालून) स्वस्थ उभे राहू. पाण्याला उकळी फुटताच त्यात एक सपाट चमचाभर ओपी चहा-पत्ती टाकून लगेच एका हाताने गॅस बंद करून दुसर्‍या हाताने ताटली पातेल्यावर झाकण ठेवू (दुसरा पर्याय म्हणजे किट्लीमधे चहा-पत्ती टाकून त्यावर उकळते पाणी ओतणे व किटलीचे झाकण लावणे).
आता कपात चतकोर लिंबू पिळून (लिंबू कापून पिळणे – अर्धं मिनिट) दोन मिनिटे थांबू (त्यासाठी अर्थातच खोलीत दहा वेळा येरझारा). आता चहा कपात गाळून घेऊ.
कौशल्य:
·         चहा-पत्ती घातल्यानंतर चहा उकळायचा नाही.
·         अडीच मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुरू द्यायचा नाही. म्हणजे तो कडू व तुरट होणार नाही आणि निवणारही नाही.
·         जास्त कडक चहा हवा असल्यास चहा-पत्तीचे प्रमाण थोडे वाढवावे पण अडीच मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुरू देऊ नये.
आस्वाद:
आता स्वस्थ बसून, डोळे मिटून प्रथम सावकाश वास घेऊ. मग थोडा फुंकून चहाचा पहिला घोट हळूच ओढून तो जिभेवर पसरवत त्याचा आस्वाद घेऊ. वाऽऽ! वाऽऽऽ!!
चिंतन:
लिंबू-चहा 
·         स्वादामधे हा चहा लाजवाब. रंग, चव आणि स्वादाच्या दृष्टीने चहाची खरी लज्जत या प्रकारे केलेल्या कोर्‍या चहातच आहे.
·         यात आपल्याला आलं, गवती चहा, पुदिना किंवा तुळशीची दोन पानं टाकता येतील.
·         साखर न घालताही हा छान लागतो.
·         यात आपण चवीपुरतं मीठही घालू शकतो.
·         आंबटपणासाठी लिंबाऐवजी संत्र्याचा, आवळ्याचा किंवा पेरूचा रस (धाडस करून बघा, अप्रतीम लागतो) घातल्यास त्याचा स्वाद वेगळाच येतो.
·         उन्हाळ्यात थंड चहा हवा असल्यास सकाळी करून (आपोआप) निवू द्यावा, दुपारी फ्रीजमधे ठेवावा व संध्याकाळी प्यावा (लिंबू आयत्या वेळी पिळावे).
·         संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर (आस्वाद) घेताना अधिक तरतरी व उत्साहासाठी थंड चहात आणखीही काही घालता येते. पुढच्या वेळी तसे करून बघू.