OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Showing posts with label जागतिक. Show all posts
Showing posts with label जागतिक. Show all posts

Monday, October 30, 2017

माझे ऑम्लेटचे प्रयोग - 4

माझे ऑम्लेटचे प्रयोग
भाग 4

1)  सॅंडविच 

सॅंडविच म्हणजे एका गोष्टीच्या दोन थरांमधे दुसरी गोष्ट असणे/ठेवणे/भरणे/दडपणे/कोंबणे. पण नुसतं ब्रेड सॅंडविच म्हटलं की ब्रेडच्या दोन थरांत काहीतरी भरलेलं सॅंडविच आणि चीझ्‌ सॅंडविच’ किंवा ’ऑम्लेट सॅंडविच’ म्हटलं की मात्र ऑम्लेटच्या दोन थरांत भरलेलं काहीतरी (ब्रेड), म्हणजे फ्रेंच टोस्ट, असं होत नाही तर ब्रेडमधेच भरलेलं ऑम्लेट, असं होतं.
म्हणजे कशात भरलंय त्यावरून सॅंडविचचं नाव ठरतं का आत भरलेल्या गोष्टीवरून ठरतं?
इंग्रजीत 'One thing is sandwiched between other things' म्हटलं की कशात काय भरलंय ते कळतं. 
इथेही आपण आत भरलेल्या गोष्टीवरून ऑम्लेटचं नाव ठेवूया.  
'अर्थात' ब्रेड-ऑम्लेट सॅंडविच: 
हे करायला अगदी सोपं आहे. ऑम्लेट करायचं (किंवा करायला सांगायचं), ते ब्रेडच्या दोन तुकड्यांमधे ठेवायचं आणि टॉमॅटो-सॉस बरोबर खायचं. हवं तर ब्रेडला लोणी लावायचं किंवा तो भाजायचा, किंवा ब्रेडच्या दोन तुकड्यांमधे ऑम्लेट (आणि हवा तर चीझचा स्लाईस) ठेऊन ते टोस्टरमधे भाजायचं. 
याच्या उलट ऑम्लेटच्या 2 थरांमधे ब्रेड असेल तर त्याला फ्रेंच टोस्ट म्हणतात (कृती खाली पहा). 

2)  फ्रेंच टोस्ट: 

साहित्य: "अर्थातच ऑम्लेट"प्रमाणे. अधिक ब्रेडचे 2 तुकडे. 
हे रिव्हर्स सॅंडविच आहे. म्हणजे ऑम्लेटच्या दोन थरांमधे ब्रेडचा स्लाईस.

एकदा एक ब्रिटिश आणि एक फ्रेंच असे मित्र (?) नाष्ट्यासाठी (आपापले) ऑम्लेट बनवत असताना अंडी त्यांना म्हणाली, "नेहमी आम्हीच काय म्हणून ब्रेडमधे दाबून घ्यायचं? ही दडपशाही आहे. कधीतरी आमच्या मधे ब्रेडला दडपा की!"
"असं कसं? तशीच परंपरा आहे." ब्रिटिश माणूस म्हणाला आणि त्यानं ऑम्लेटला ब्रेडमधे दडपून सॅंडविचचा मोठा लचका तोडला . 
पण फ्रेंच माणसाला अंड्यांचं म्हणणं पटलं. आणि त्यानं ऑम्लेटच्या दोन थरांत ब्रेडला दडपलं. 
"ही पण दडपशाहीच आहे", ब्रेडनं निषेध नोंदवायचा प्रयत्न केला. 
"उईऽऽ, उईऽऽ, उईऽऽ, नाईलाज आहे." खांदे उडवून फ्रेंच माणूस म्हणाला. "सॅंडविच म्हटलं की दडपशाही आलीच." आणि त्यानं रिव्हर्स सॅंडविचचा लचका तोडला. (दडपशाही वाईटच! पण शेवटी कुणीतरी या दोघांचेही लचकेच तोडणार असेल तर कोण आत, कोण बाहेर आणि कोणी कोणाला दडपलंय यालाही काय महत्त्व आहे?) 
पुढच्या वेळी फ्रेंच माणसानं ब्रेडला आणि त्याच्या निषेधाच्या आवाजाला फेटलेल्या अंड्यात बुडवलं आणि गरम तव्यावर फेकलं. अशा रीतीनं फ्रेंच टोस्टचा जन्म झाला.  

कृती अ (सोपी पद्धत): 
ऑम्लेट मिश्रण बनवून घ्या. त्याचे ऑम्लेट करून घ्या. त्याचे 2 तुकडे करा आणि त्यांत ब्रेडचा स्लाईस ठेवून खा.
कृती ब: अर्थातच (Authentic) फ्रेंच टोस्ट: 
ऑम्लेट मिश्रणात ब्रेडचे स्लाई्स बुडवून फ्रायपॅनवर लोण्यावर दोन्ही बाजूंनी परतून घ्या. या प्रकारे केल्यावर अंडं आतपर्यंत झिरपतं आणि आतील ब्रेड ओलसर मऊ राहातो. काहीजण अंड्याच्या मिश्रणात थोडं दूधही घालतात. ब्रेड ऑम्लेट मिश्रणात किती वेळ बुडवून ठेवला आहे त्यावरून ब्रेडमधे अंडं किती झिरपणार ते ठरतं. पण या प्रकारात ब्रेडवर ऑम्लेटचा फारच पातळ थर राहातो. शिवाय ऑम्लेट मिश्रणात बुडवलेला ब्रेड पॅनवर टाकताना हात खराब होतातच पण ब्रेडवरून ओघळणार्‍या अंड्यामुळे सगळा राडा होतो. तो न होण्यासाठी नुसतं कौशल्य आणि अनुभव पुरेसा नाही.   
कृती क: 
ब्रेडचे स्लाई्स फ्रायपॅनवर लोण्यावर ठेवा. एक बाजू जरा भाजून झाली की स्लाईस उलटा व त्यावर (गरम बाजूवर) ऑम्लेट मिश्रण पसरा. गॅस बारीक ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर ब्रेड पुन्हा उलटा व या बाजूवरही मिश्रण पसरा. ते घट्ट व्हायला लागल्यावर ब्रेड पुन्हा उलटा. दोन्ही बाजूंनी परतून घ्या. 
या कृतीत ब्रेडही भाजला जातो, ऑम्लेट मिश्रण ब्रेडमधे आतपर्यंत झिरपतं, ऑम्लेटचा हवा तेवढा जास्त जाड थर ब्रेडवर राहातो आणि राडाही होत नाही. आत झिरपलेल्या आणि फार घट्ट न झालेल्या अंड्यामुळं असा केलेला फ्रेंच टोस्ट क्रीमी आणि अंडसमृद्ध लागतो.  
कृती ड: थोडं ऑम्लेट मिश्रण फ्रायपॅनवर लोण्यावर पसरा. गॅस बारीक ठेवा. ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर ब्रेडचा स्लाईस (नुसता किंवा भाजलेला) ठेवा व जरा दाबा. ऑम्लेट पॅनवरून सुटं झालं की ते पॅनवरून काढून बाजूला ठेवा. थोडं ऑम्लेट मिश्रण पुन्हा फ्रायपॅनवर लोण्यावर पसरा. ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर एका बाजूला ऑम्लेट चिकटलेला मगाचचा ब्रेडचा स्लाईस उलटा ठेवा व जरा दाबा. पॅनवरून सुटा झाला की खायला तयार. 
या प्रकारात ऑम्लेटचा जाड थर ब्रेडवर राहातो आणि अडं थोडं आत झिरपतं (कृती अ पेक्षा जास्त पण कृती क पेक्षा कमी).
चारही प्रकारांत दोन बाजूंना ऑम्लेट व मधे ब्रेड असे सॅंडविच असले तरी कृतीतील फरकामुळे चवीत फार फरक पडतो.

3)  पोळी सॅंडविच:


ब्रेड सॅंडविच आणि फ्रेंच टोस्ट मधे अन्न म्हणून निकृष्ट (भुक्कड) ब्रेड वापरलेला असतो. ब्राऊन ब्रेड हीही काही खरी गोष्ट नव्हे. म्हणून ब्रेडऐवजी न चाळलेल्या कणकेची पोळी वापरणं चांगलं. न्याहारीच्या (मराठीत ब्रेकफास्टच्या) वेळी रात्री केलेल्या किंवा संध्याकाळच्या खाण्याच्या वेळी दुपारच्या पोळ्याही चालतील.  
1 - सोपी कृती: पोळीबरोबर ऑम्लेट खा. उगीच ह्याच्यात ते ठेवा, त्याच्यात हे ठेवा आणि मग एकत्र, न सांडता, कसरत करत, तरीही सांडत खाण्याच्या परदेशी विचित्रपणाचा अट्टाहास कशासाठी? शिवाय मोठ्ठा आऽऽ करून खायला लागतं ते वेगळंच. मोठ्ठ्या बनमधे हॅंबर्गर-वडा-ऑम्लेट आणि टॉमॅटो-काकडीच्या चकत्या, चीझ-स्लाईस, लेट्यूसची पानं इत्यादी ठेवून 6 इंची सॅंडविच करून ते खायचं म्हणजे सापाचंच तोंड पाहिजे.   
2 - सॅंडविच व रोल - सोपी कृती: पोळीवर ऑम्लेट ठेवा आणि दोन्हीची एकत्र निम्मी घडी घाला किंवा एकत्र रोल करा आणि खा. 
3 - कृती 2: 

तव्याला थोडं तूप लावून त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा.

ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर पोळी ठेवा व जरा दाबा (पोळी ऑम्लेट मिश्रणाला चिकटण्यासाठी). 
ऑम्लेट पॅनवरून सुटं झालं की ते पॅनवरून काढून बाजूला ठेवा. 




फ्रायपॅनवर थोडं तूप लावून त्यावर ऑम्लेट मिश्रण पुन्हा पसरा. ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर एका बाजूला ऑम्लेट चिकटलेली मगाचीच पोळी उलटी ठेवा व जरा दाबा. पॅनवरून सुटी झाली की खायला तयार. तिन्ही थर उलटा व थोडं तूप सोडून दोन्हीकडून खरपूस भाजा. सुरीनं हव्या त्या आकारात कापून खा किंवा खायला द्या. 
4 - कृती 3: तव्याला थोडं तूप लावून तयार पोळीचा चतकोर तुकडा भाजायला ठेवा. तो थोडा गरम झाल्यावर उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा. ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर पोळीचा दुसरा चतकोर ठेवा व उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरून ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर पोळीचा तिसरा चतकोर ठेवा व उलटा. त्यावर ... असे तुम्ही (तुमच्या तोंडाचा "आऽऽ" किती वासला जाऊ शकतो त्यानुसार) कितीही थर लावू शकता. इथं तुम्हाला दहीहंडीच्या 9 थरांचे रेकॉर्ड मोडता येईल.  
5 - मराठी अंडापोळी 1: तव्याला थोडं तूप लावून तयार पोळी भाजायला ठेवा. एक बाजू खरपूस भाजून झाल्यावर ती उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा. ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर ते उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरून ते घट्ट व्हायला लागल्यावर पुन्हा उलटा. ही "मराठी अंडापोळी" (फ्रेंच टोस्टप्रमाणं) झाली. 
6 - मराठी अंडापोळी 2: गरम तव्याला थोडं तूप लावा. पोळीचे चतकोर तुकडे करून घ्या. त्यातील एक ऑम्लेट मिश्रणात बुडवून तव्यावर टाका. एक बाजू परतून झाल्यावर पोळी उलटा व परता. याप्रमाणं सर्व तुकड्यांच्या अंडापोळ्या करून घ्या. यात पोळी ब्रेड्प्रमाणं भिजत नसल्यामुळं अंड्याचा थर कमी राहातो. त्यामुळं अशा दोन चतकोरांमधे आणखी काहीतरी भरून सॅंडविच करा.  
7 - पोळी टोस्ट सॅंडविच: 
तयार पोळीचे अर्धे तुकडे करा व त्यांना लोणी लावा. 


प्रत्येक तुकड्यावर चतकोर ऑम्लेट ठेवा. 


त्यावर टॉमॅटोच्या चकत्या आणि चीझचे पातळ तुकडे ठेवून पोळीची घडी घाला. 

अशा दोन घड्या एकावर एक ठेवा. 

टोस्टरमधे भाजून खा. 



4)  उत्थप्पाम्लेट-डोसाम्लेट-थालीपीठाम्लेट: 

कृती 1: आतापर्यंतचे माझे उद्योग (प्रयोग), ऑम्लेटबरोबरच्या माझ्या झटापटी आणि या पदार्थांची नावं बघूनच तुम्हाला या पदार्थांचा अंदाज आला असेलच. तो अर्थातच बरोबर आहे. 
डोसा आणि उत्थप्पा यात फार फरक नाहीच आहे. डोस करायला कौशल्य आणि धीर लागतो. दोन्हीच्या अभावामुळे तो नीट पसरता आला नाही आणि जाड राहिला की त्याचा उत्थप्पा होतो. दोन्हीपैकी काहीही करताना पीठ तव्यावर पसरलं आणि ते जरा घट्ट व्हायला लागलं की त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा. ते जरा घट्ट झालं की आणि डोसा/उत्थप्पा तव्यावरून सुटला की तो उलटा व तव्यावरुन सुटला की प्लेटमधे काढा. 
थालीपीठाम्लेट करताना थालीपीठावर ऑम्लेट मिश्रण पसरून ते घट्ट व्हायला लागल्यावर उलटा व ते तव्यावरुन सुटलं की प्लेटमधे काढा. 
कृती 2: याची सोपी पद्धत म्हणजे अर्थातच डोसा-उत्थप्पा-थालीपीठावर ऑम्लेट ठेवून एकत्र खा. 
कृती 3: किंवा त्याहूनही सोपं म्हणजे डोश्याच्या पिठात (एका डोश्याला अर्धं ते एक अंडं या प्रमाणात) ऑम्लेट मिश्रण किंवा मीठ घालून फेटलेली अंडी घाला आणि भाजणी ऑम्लेट मिश्रणातंच भिजवा. 

यामुळं उत्थप्पा, डोसा, थालीपीठ यांसारखे मुळातच समृध्द पदार्थ आणखी प्रथिनसमृद्ध होतात.  

5)  व्हेज-नॉनव्हेज रीमिक्स

सध्या मिळणारी अंडी व्हेज (जीव नसलेली) असली तरी प्राणिज असतात म्हणून आपण त्याना नॉनव्हेज म्हणूया. म्हणुन अंड्याचं ऑम्लेटही नॉनव्हेज म्हणूया. मग व्हेज-नॉनव्हेज रीमिक्स करताना व्हेज ऑम्लेट म्हणजे काय?
तुम्ही काही प्युअर व्हेज रेस्तोरॉंमधे टॉमॅटो ऑम्लेट खाल्लंय? तेच व्हेज ऑम्लेट. किंवा साधं डाळीच्या पिठाचं जाडसर धिरडं. 
आता रीमिक्स करणं सोपं आहे. 2 अंडी फोडून त्यात चवीपुरतं मीठ टाकून फेटून घ्या. (यामुळं अंडी अर्धपारदर्शक पातळ आणि एकजीव होतात.) आता डाळीच्या 3 धिरड्यासाठी पीठ भिजवा आणि त्यात ही फेटलेली अंडी घालून चांगलं मिसळा. त्यात कांदा-टॉमॅटो-कोबी-फ्लॉवर-मिरची-कोथिंबीर असं तुम्हाला हवं ते काहीही व्हेज आणि परतलेला खिमा, भाजलेल्या चिकनचे बारीक तुकडे, असं काहीही नॉनव्हेज घाला. चांगलं मिसळा आणि या पिठाची 4 ऑम्लेट्स बनवा. 
पण रीमिक्स जपून करा. एकूणच रीमिक्स हे प्रकरण अवघडच (!?) आहे. त्याबद्दल पुढच्य भागात.

6)  स्क्रॅंबल्ड एग्ज आणि अंडा भुर्जी:


ऑम्लेटच्या प्रयोगांत हे वेगळेच पदार्थ कसे? 
हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे छानच लागत असले आणि त्यांना स्क्रॅंबल्ड एग्ज किंवा अंडा भुर्जी अशी काहीही आकर्षक नावं दिली तरी  ऑम्लेट बिघडलं म्हणजे ( आणि ते आणखी बिघडवलं की) असं होतं असं मला नेहमी वाटतं. मला ऑम्लेट करायचं होतं असं म्हटलं की त्याचे तुकडे झाले की ते बिघडलं. पण मला तुकडेच करायचे होते म्हटलं की तो नवीनच पदार्थ झाला. मग त्याचे किती छान, बारीक आणि एकसारखे तुकडे झाले हाच यशाचा निकष आणि कौतुकाचा विषय होतो. म्हणजे जे व्हायचं ते होतंच पण मला हेच करायचं होतं म्हटलं की अपयशाचं यशात रूपांतर होतं आणि आपलं नाक कटायच्या ऐवजी आणखी वर होतं. 
(जाता जात जीवनातलं हे एक महान तत्त्व मी तुम्हाला फुकटात सांगितलं हे लक्षात घ्या.) 
म्हणून हे वेगळे पदार्थ नसून बिघडलेल्या ऑम्लेटचेच प्रकार असल्यानं त्यांचा समावेश इथं केला आहे. 

तर स्क्रॅंबल्ड एग्ज आणि अंडा भुर्जी हा एकच पदार्थ आहे असं अज्ञ लोकांना वाटत असलं तरी ते दोन वेगळेच पदार्थ पदार्थ आहेत. विदेशी-देशी, पाश्चिमात्य-पौर्वात्य, अळणी-झणझणीत, अलिप्त-गुंतलेला, एकटा-गर्दीतला असा तो मूळ विचारपद्धतीतीलच फरक आहे. 


स्क्रॅंबल्ड एग्ज:

प्रकार 1: एक अंडं फोडून घ्या. त्यात 2 चमचे दूध घालाआणि चांगलं फेटून घ्या. पॅनमधे (नॉनस्टिक) पाव चमचा लोणी घेऊन पॅन अगदी मंद गॅसवर ठेवा. लोणी वितळलं की त्यावर फेटलेलं अंडं टाकून अलगद पसरून घ्या. ते किंचित जमायला लागतंय असं वाटताच लाकडी उलथनं (मराठीत स्पॅट्च्यूला/स्पॅच्यूला/स्पॅट्यूला) त्यातून वरून खाली हलकेच फिरवा. मग ते डावीकडुन उजवीकडे, डाव्या वरच्या कोपर्‍यातून उजव्या खालच्या कोपर्‍याकडे आणि उजव्या वरच्या कोपर्‍यातून डाव्या खालच्या कोपर्‍याकडे (किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, वायव्येकडुन आग्नेयेकडे आणि ईशान्येकडुन नैऋत्येकडे) आणि याच दिशांनी उलटे हलकेच फिरवा आणि फिरवत रहा (धीर आणि ध्यानमग्न अवस्था आवश्यक आहे). हळूहळू जमता जमता ते मलई बर्फीसारखं किंवा बारीक रव्याच्या मऊ शिर्‍यासारखं होते. तुम्हाला हवं तितकं घट्ट झालं की प्लेट/बाऊलमधे काढून घ्या आणि खा. 
शुद्ध अंड्याचा पवित्र आणि सूक्ष्म आस्वाद घेण्याची इच्छा आणि पात्रता असणार्‍यांना हे ठीक आहे. पण आपल्यासारख्या पामरांना त्याची चव काय कळणार? (म्हणतात नाऽऽ गा ...) आपण म्हणणार हे का? याला तर काहीच चव नाही. मग आपण त्यावर थोडं मीठ आणि मिरपूड भुरभुरून किंवा अगदी पिठी साखर आणि वेलदोड्याची पूड भुरभुरून खाऊया. आता हे छान क्रीमी, सौम्य पण बरं चवदार लागतं. 
  
प्रकार 2: एक अंडं फोडून घ्या. त्यात 2 चमचे दूध, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ आणि मिरपूड घालाआणि चांगलं फेटून घ्या. पॅनमधे पाव चमचा लोणी घेऊन पॅन अगदी मंद गॅसवर ठेवा. लोणी वितळलं की त्यावर हे मिश्रण (किंवा ऑम्लेट मिश्रण) टाका. ते किंचित जमायला लागतंय असं वाटताच लाकडी उलथन्यानं परतत रहा. पुरेसं घट्ट झालं की प्लेटमधे काढून नुसतं किंवा ब्रेड/पोळी बरोबर खा.  
यात प्रत्येक कांद्याच्या तुकड्याभोवती अंड्याचा थर जमा होऊन ते कांद्याच्या पीठ पेरलेल्या सुक्या भाजीसारखं होतं. पहिल्या प्रकारापेक्षा हे जरा जास्त चवदार लागतं. 
यात कांद्याऐवजी आपण कोणतीही बारीक चिरलेली फळभाजी घालू शकतो. 

प्रकार 3: काहीही कारणानं ऑम्लेट करताना सलग निघालं नाही आणि त्याचे तुकडे पडायला लागले तर उलथन्यानं जास्त तुकडे करून, कुस्करून त्याचं स्क्रॅंबल्ड करावं आणि स्क्रॅंबल्ड एगच करायचं होतं असं म्हणावं. 


अंडा भुर्जी:

प्रकार 1: एक अंडं फोडून घ्या. त्यात 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, भरपूर लाल तिखट किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची (किंवा दोन्ही), अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालाआणि चांगलं फेटून घ्या. तव्यावर 2-3 चमचे तेल घ्या. ते गरम झालं की त्यावर हे मिश्रण टाका. गॅस मध्यम ठेवा आणि उलथन्यानं परतत रहा. मोठे तुकडे उलथन्यानं दाबून-कुस्करून बारीक करत राहा. वरून थोडी कोथिंबीर टाका. वाफा येऊन कोरडे होईपर्यंत खमंग परता. प्लेटमधे काढून ब्रेड/पोळी बरोबर खा. हे झणझणीत असल्यानं नुसतं खाता येत नाही. 

प्रकार 2: एक तव्यावर 4 चमचे तेल टाका (8 चमचे टाकलंत तरी चालेल). त्यावर 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा टाकून परता. त्यावर बारीक चिरलेल्या  हिरव्या मिरच्या (शिवाय वाटल्यास लाल तिखट), थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमचा गरम मसाला किवा कांदा मसाला टाकून परतत रहा. कांदा गुलाबी झाला की त्यावर दोन अंडी फोडून टाका आणि परतत रहा. अंड्याचं पिवळं तव्यावरच फोडा आणि मिसळा आणि परतत रहा. वाटल्यास त्यात क्रीम, लोणी किंवा चीझ किसून घाला. खमंग परतल्यावर डिशमधे काढून घ्या. त्याच तव्यावर थोड्या लोण्यावर ब्रेड फ्राय करून घ्या आणि अंडा-भुर्जीबरोबर खा. 


स्क्रॅंबल्ड एग्ज - प्रकार 1 आणि अंडा भुर्जी - प्रकार 2: या दोन टोकाच्या प्रकारांमधे तुम्ही हवे तितके प्रकार करू शकता.


अंडा भुर्जीचाच एक प्रकार किंवा एक स्वतंत्र प्रकार म्हणजे अंड्याचा म्हाद्या.  


7) अंड्याचा म्हाद्या: 


हा प्रकार बघण्याआधी "म्हाद्या" हा काय पदार्थ आहे हे पाहिलं पाहिजे.
हा सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. हा करायला सोपा, झटपट होणारा, आयत्या वेळी घरात सहज उपलब्ध पदार्थांपासून करता येणारा आणि हमखास चवदार पदार्थ आहे. म्हाद्या म्हणजे थोडक्यात शेंगदाण्याच्या कुटाचं मसालेदार पिठलं (पिठाचं ते पिठलं  या न्यायानं याला कुटलं  म्हटलं पाहिजे). 
आता याच पदार्थात अंडं घातल की झाला ’अंड्याचा म्हाद्या’. 
कढईत भरपूर तेल घालून मोहरी, जिरं. हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट/ठेचा/तुकडे, लाल तिखट/कांदा मसाला आणि मीठ घालून चांगलं परता. त्यात दाण्याचं कूट घालून परता आणि मग पाणी घालून शिजवा. बरंच पाणी आटून तेल सुटायला लागलं की गॅस बारीक करून त्यात दोन अंडी फोडून टाका आणि ढवळा/परता हवं तेवढं घट्ट झालं की वाढून घ्या आणि गरम भाकरीबरोबर खा. 
हा पदार्थ ब्रेडबरोबरही चांगलाच लागत असला तरी ब्रेडबरोबर खाण्याचा मूर्खपणा आणि म्हाद्या आणि भाकरी दोन्हीचाही अपमान करू नका.   

या प्रयोगांविषयी चिंतन आणि मी पदार्थ का करतो? पदार्थाची किंमत आणि मूल्य काय? मी प्रयोग का करतो? ... अशासारख्या (विनाकारण पडणार्‍या) प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पुढच्या (आणि "माझे ऑम्लेटचे प्रयोग"च्या शेवटच्या) भागात.

Saturday, July 22, 2017

माझे ऑम्लेटचे प्रयोग - 1

माझे ऑम्लेटचे प्रयोग - 1




नुसते प्रयोग करायला थोरपण अंगी असावं लागत नाही. थोरपण "सत्याचे" प्रयोग करायला लागतं. ते गाधीजींनी केले. मी गाधीजींसारखा थोर तत्त्वज्ञ नाही. थोरपण "वैज्ञानिक" प्रयोग करायला लागतं. ते शास्त्रज्ञांनी केले. मी शास्त्रज्ञांसारखा थोर विद्वानही नाही.  आपण सामान्य माणसं. आपण आपले साधेच प्रयोग करणार.

म्हणून मी आपले ऑम्लेटचे प्रयोग केले, करतोय्‍. (चुकून हॅम्लेटचे प्रयोगही समजू नका. शेक्स्पीअरची नाटकं करण्याइतका मी थोर नट-दिग्दर्शकही नाही.)
प्रयोगशिलता हा मराठी संस्कृतीचा, खाद्यसंस्कृतीचा किंवा फक्त संस्कृतीचाही भाग आहे की नाही हे मला माहीत नाही. पण मी मराठी आहे; चांगलं (खूप नव्हे) आणि एकत्र खाणं मला आवडतं; मी सुसंस्कृत आहे असं मी समजतो आणि मी प्रयोगशिल आहे. (हे  सगळं एकत्र माझ्यात असण्याला माझा नाईलाज आहे.)
ऑम्लेटचे प्रयोग खरं तर आदिम काळापासून, आदिमानवापासून आणि संस्कृतीच्याही आधीपासून सुरू आहेत.
एकदा रानकोंबडीचं अंड चोरून पळताना गडबडीत आदिमानवाच्या हातून ते दगडावर पडून फुटलं. तो हळहळत त्याच्याकडे बघत असताना ते हळूहळू घट्ट होत गेलं. या जादूनं आणि कोणत्या पापाची ही शिक्षा आहे या विचारानं आधी तो घाबरूनच गेला. पण कुतूहलानं पापभावनेवर मात केली (पापभावनेवर नेहमीच अनेक गोष्टी मात करत असतात त्यांपैकी ही आणखी एक) आणि त्यानं ते खाऊन बघितलं. वा! हे तर कच्च्या अंड्याहून खूपच छान लागतंय! खालच्या तापलेल्या दगडानं ही जादू केली वाटतं! ... (बघा, लगेच कार्यकारण भाव शोधायला त्याच्यातला वैज्ञानिक जागा झाला) .
या पापाचं हे चांगलंच फळ मिळालं. आता अजून पाप करायला हरकत नाही या विचारानं आणखी एक अंड चोरून तो बायकोकडे गेला आणि तिला हाताला धरून ओढत दगडापाशी घेऊन आला. त्यानं खूप हातवारे करून तिला काहीतरी सांगितलं आणि ते अंडं दगडावर टाकलं. (बघा. प्रयोग करून बघूया, तेही अनेकांसमक्ष, ही वैज्ञानिक प्रयोगशीलता.)  फुटून आतला द्रव दगडावर पसरतानाही तो तिला काहीतरी सांगतच होता. त्याकडं (नेहमीप्रमाणंच) पूर्ण दुर्लक्ष करून आणि नवर्‍याला (नेहमीप्रमाणंच) वेड लागलंय असं समजून ती समजावणीच्या स्वरात म्हणाली,
"Let it go."
"काय?" नवर्‍याला (नेहमीप्रमाणंच) काहीच कळेना.
"Let it go."
"No! Eat it."
Let it ..." ती पुढे बोलायच्या आत घट्ट झालेल्या अंड्याचा घास त्यानं तिच्या तोंडात कोंबला आणि तिनं तो "ऑम्‌" करून गिळला.
ती पुन्हा म्हणाली "Let ..." आणि त्यानं  पुन्हा अंड्याचा घास त्यानं तिच्या तोंडात कोंबला आणि तिनं तो "ऑम्‌" करून गिळला. पुन्हा ती म्हणाली  "Let ...ऑम्‌ Let ...ऑम्‌ Let ...ऑम्‌ Let ...ऑम्‌ Let ...ऑम्‌ "
आणि त्याला एकदम कळलं की हे तर 'ऑम्‌Let' आणि तो बायकोला म्हणाला "तेच तर तुला मगाचपासून सांगतोय"
असो. Let it be. तर असा ऑम्लेटचा जन्म चुकून झालेल्या प्रयोगातून झाला.

पण माझे प्रयोग मुद्दाम केलेले आहेत. (म्हणजे पुन्हा वैज्ञानिक-वैज्ञानिक.) म्हणजे माझे सगळे प्रयोगच असतात. मी साधं सरळ काही करूच शकत नाही. या (आणि इतर अनेक) दुर्गुणांसकट, "हेन्रट आमच्या नशीबाला", असं म्हणत बायको मला सहन करते हा खरंच तिचा थोरपणाच आहे. इथे तुम्हाला "हेन्रट म्हणजेच वैज्ञानिक" असं समजायला हरकत नाही.

हे प्रयोग मी करू शकलो त्याचं सर्व श्रेय अर्थातच माझ्या बायकोला जातं. ती अंडं (आणि नॉनव्हेज) खात नाही. त्यामुळे माझे प्रयोग तिच्यावर केले जात नाहीत. मी काहीही खाल्लं तरी तिची हरकतही नसते. आणि जोपर्यंत मी तिच्या मधेमधे करत नाही, तिच्या पाककृतींत नाक खुपसत नाही, मी पदार्थ करताना ओट्यावर राडा करत नाही आणि नंतर सगळं स्वच्छ आवरून ठेवतो (थोडक्यात तिच्या स्पेसमधे ढवळाढवळ करत नाही) तोपर्यंत तिची माझ्या कोणत्याही प्रयोगांना हरकत नसते. (बघा, बायकांच्या सगळ्या अटी सांभाळल्या तर त्या नवर्‍यांना किती स्वातंत्र्य देतात.)
शिवाय आता शनिवार हा माझा ऑम्लेट डे असतो, त्या दिवशी ती सकाळी घरातच नसते. मला संपूर्ण रान (म्हणजे स्वयंपाकघर) मोकळं मिळतं.  
माझ्या प्रयोगांचं श्रेय माझ्या मुलांनाही जातं. ममा घरात नसली आणि मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला की ती उलट खूष असत. आजच्या नवीन शोधामुळे बसणार्‍या आश्चर्याच्या धक्क्याच्या कल्पनेनं ती माझ्याइतकीच उत्तेजित झालेली असत. त्या अवस्थेत ती मला काहीही मदत करायलाही तयार असत. आणि नंतर तो प्रायोगिक पदार्थ ती बिनतक्रार, काही वेळा तर आवडूनही, खातही असत. त्यामुळे मला किती प्रोत्साहन मिळत असे याची त्यांना कल्पना नाही.
जे अनेक दुर्गुण मुलांनी माझ्याकडून घेतले आणि ज्या अनेक गोष्टींत मी मुलांना बिघडवलं (असं बायकोचं ठाम मत आहे) त्यात प्रयोगशीलता हीही एक गोष्ट आहे. असो.

अंडे: 

गुणधर्म: अंडं हा एक अन्नपदार्थाला फुलवणारा, फुगवणारा, बांधणारा (अंड्यातील पांढर्‍या बलकाचा गुणधर्म), दाटपणा आणणारा आणि घट्टपणा आणणारा (पिवळ्या बलकाचा गुणधर्म) उत्कृष्ट पदार्थ आहे. केकसारखा पदार्थ अंड्याशिवाय तितका चांगला फुगूच शकत नाही.  

उष्णतेच्या संपर्कात त्यातील निरनिराळी प्रथिने निरनिराळ्या तापमानांना, निरनिराळ्या वेळात, निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या प्रकारे थिजतात. 

पांढरा बलक थिजून घट्ट व अपारदर्शक बनतो. जास्त तापमानाला जास्त वेळ ठेवल्यास तो जास्त जास्त घट्ट (आणि पचायला जड होत जातो. या त्याच्या गुणधर्मामुळे तो पदार्थाला घट्टपणा आणतो आणि बांधून ठेवतो. पिवळा बलक थिजताना उकडलेल्या बटाट्यासारखा पिठूळ होतो. त्यामुळे पातळ पदार्थांना तो दाटपणा आणतो. तो खरं तर कमी तापमानाला आणि लवकर थिजतो. पण संपूर्ण अंडं उकडत ठेवलं तर पांढरा बलक आधी आणि जास्त थिजताना दिसतो कारण तो बाहेर असतो आणि जास्त तापमानाच्या संपर्कात जास्त वेळ राहातो. 

अंडं हा उत्कृष्ट इमल्सिफाईंग (इमल्शन बनवणारा) पदार्थही आहे. त्याच्यामुळे पाणी आणि हवा यांचे उत्कृष्ट ’एकजीव मिश्रण - ’इमल्शन’ - बनते. त्यासाठी अंड्यातील पांढरा बलक वेगळा करून तो खूप फेटायला लागतो. फेटताना पातळ अंड्यात हळूहळू हवेचे बुडबुडे शिरून थोड्याच वेळात एक स्वच्छ पांढरा, फेसाळ, फुगीर आणि घट्ट (चमच्यातून सांडू न शकणारा लोण्यासारखा घट्ट पदार्थ - लोणी हेही एक पाणी व तेलाचे इमल्शनच आहे) पदार्थ बनतो. याचा उपयोग केक, त्याचे आईसिंग आणि इतर अनेक पदार्थांत करतात. 


या आणि इतर गुणधर्मांचा वापर करून आत्तापर्यत जगात अनेकांनी अनेक नवनवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि आश्चर्यकारक पदार्थ बनवले आहेत. (पारंपारिक आणि नवीन; तज्ज्ञ आणि नवशिक्यांनी केलेल्या; आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी असलेल्या शेफ्‌नी आणि रस्त्यावरच्या गाड्यांवरील आचार्‍यांनी केलेल्या अंड्याच्या अनेक पदार्थांचे व्हीडिओज्‌ आता ’यू ट्यूब’वर उपलब्ध आहेत.). नवशिके चुकून आणि कुशल-अनुभवी कुक मुद्दाम, अजूनही नवीन पदार्थ शोधून काढतच आहेत.    

शिवाय अंडं पौष्टीकही आहे. मैदा हाही असाच पाककृती आणि पाककलेच्या दृष्टीनं अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेला पदार्थ आहे. पण तो अन्न म्हणून पौष्टीकतेच्या दृष्टीनं अत्यंत निकृष्ट आहे. अंड्याचं तसं नाही.  

अन्न म्हणून गुणधर्म: अंडं म्हणजे उत्कृष्ट प्रतीच्या (सर्व अत्यावश्यक अमीनो आम्लांनी युक्त) अनेक प्रथिनांनी युक्त, जवळजवळ सर्व अन्नधटकांनी समृद्ध आणि संरक्षक आवरणात बांधलेलं असं पौष्टिक अन्नाचं पुडकंच आहे. सर्वसाधारण एका अंड्यातून 50 ग्रॅम अन्न मिळतं आणि अशी 2 अंडी (100 ग्रॅम) प्रथिनांच्या रोजच्या गरजेच्या 20% आणि सूक्ष्म अन्नधटकांच्या (मायक्रो-न्यूट्रियंट्स - व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स) 10 ते 40% गरज भागवतात.  

शिवाय इतर अन्नपदार्थांपेक्षा ती तुलनेनं स्वस्त आहेत. मिळणारे पौष्टीक अन्नघटक (मूल्य) आणि किंमत असा तौलनिक अभ्यास केला तर ती फारच स्वस्तही आहेत. 
अन्नपदार्थ बनवताना वापरायला ती अतीशय सोपी आणि अनेक प्रकारे वापरता येण्यासारखी असतात. अशी ती अष्टपैलू आहेत.  

अंड्याचे अवगुणच काढायचे तर ते प्राणीज आहे (म्हणुन शाकाहारी लोकांना ते चालत नाही), काही जणांना त्याची अ‍ॅलर्जी असते आणि स्वच्छतेची किमान काळजी घेतली नाही तर जंतुजन्य (Salmonella infection) जुलाब होण्याची शक्यता असते. (1). 


अंड्यातील स्निग्ध पदार्थ आणि मुख्यतः कोलेस्टेरॉलबद्दलही नेहमी आक्षेप घेतला जातो (2). त्याबद्दल खाली वाचा.   
एकूणच कोणतीही गोष्ट (कितीही आवडत असली तरी) आचरटपणे खाऊ (आणि करू) नये. त्याचे दुष्परिणाम होणारच. 

(1) जंतुसंसर्ग: साल्मोनेला हे जंतू 71 ° सेल्सिअस तापमानाला मरतात. अंडं धुवून, लगेच कोरडं करून फ्रीझमधे अंड्याच्या कप्प्यात ठेवलं तर ते टिकतंही आणि जंतुसंसर्गाची शक्यताही कमी होते. पण अंडं धुवून तसंच ठेवलं तर सच्छिद्र कवचातून आत मुरणार्‍या पाण्याबरोबर जंतू आत शिरून वाढतात आणि असं अंडं कच्चं खाणं धोकादायक ठरतं. तसंच अंडं धुतल्यानं त्यावरील एक संरक्षक थर नष्ट होऊन ते खराब होण्याची शक्यता वाढते. (विक्रीपूर्वी ठेवण्या व टिकवण्यासंबंधी निरनिराळ्या देशांत निरनिराळे नियम आहेत. आपल्या इथं ती न धुता, सामान्य तापमानाला, निमुळतं टोक खाली करून, क्रेटमधे, हवेशीर ठिकाणी ठेवतात.) त्यापेक्षा अंडं वापरताना धुवून लगेच वापरावं. (रोज ताजी अंडी मिळत असताना ठेवायची कशाला?) किंवा अंडं न धुता फ्रीझमधे ठेवावं आणि वापराआधी धु्वावं. फ्रीझमधे ठेवलेलं अंडं (आणि इतरही अन्नपदार्थ) फ्रीझमधून काढून सामान्य तापमानाला आणल्यावर लगेच वापरावं. ते पुन्हा फ्रीझमधे ठेवू नये.  
(2) अंड्यातील कोलेस्टेरॉल: अंड्यातील स्निग्ध पदार्थ पिवळ्या बलकात असतो. 50 ग्रॅमच्या सर्वसधारण अंड्यात 5 ग्रॅम स्निग्ध पदार्थ (त्यातील 27% संपृक्त स्निग्ध पदार्थ - saturated fat) आणि 185 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असतं. पण रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी मुख्यतः यकृताच्या कार्यावर आणि स्निग्ध पदार्थाच्या चयापचयावर अवलंबून असून आहारातील कोलेस्टेरॉलवर अवलंबून नसते. त्यामुळं सर्वसाधारण व्यक्तीनं रोज 1 अंडं (संपूर्ण) खाणं अपायकारक नाही (वाढत्या वयाच्या मुलांना तर नाहीच नाही) असं सर्वसाधारणपणे समजलं जातं. शिवाय पिवळ्या बलकात इतर प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थात विद्राव्य ’अ’ आणि ’ड’ जीवनसत्त्वेही भरपूर असतात.  

साधारणपणे वरील प्रमाणात अंडं खाल्ल्यानं हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढत नाही, उलट त्याचे फायदे अनेक आहेत. पण हृदयरोग आणि मधुमेह असलेल्यांनी मात्र यापेक्षा कमी (आठवड्याला 3-4) अंडीच खावीत (किंवा फक्त पांढरा बलकच खावा). 

तर आता आपण ऑम्लेटच्या प्रयोगांना सुरुवात करूया. त्यासाठी वाचा या लेखाचे पुढचे भाग.