माझे ऑम्लेटचे प्रयोग
भाग 4
1) सॅंडविच
सॅंडविच म्हणजे एका गोष्टीच्या दोन थरांमधे दुसरी गोष्ट असणे/ठेवणे/भरणे/दडपणे/कोंबणे. पण नुसतं ब्रेड सॅंडविच म्हटलं की ब्रेडच्या दोन थरांत काहीतरी भरलेलं सॅंडविच आणि चीझ् सॅंडविच’ किंवा ’ऑम्लेट सॅंडविच’ म्हटलं की मात्र ऑम्लेटच्या दोन थरांत भरलेलं काहीतरी (ब्रेड), म्हणजे फ्रेंच टोस्ट, असं होत नाही तर ब्रेडमधेच भरलेलं ऑम्लेट, असं होतं.
म्हणजे कशात भरलंय त्यावरून सॅंडविचचं नाव ठरतं का आत भरलेल्या गोष्टीवरून ठरतं?
इंग्रजीत 'One thing is sandwiched between other things' म्हटलं की कशात काय भरलंय ते कळतं.
इथेही आपण आत भरलेल्या गोष्टीवरून ऑम्लेटचं नाव ठेवूया.
'अर्थात' ब्रेड-ऑम्लेट सॅंडविच:
हे करायला अगदी सोपं आहे. ऑम्लेट करायचं (किंवा करायला सांगायचं), ते ब्रेडच्या दोन तुकड्यांमधे ठेवायचं आणि टॉमॅटो-सॉस बरोबर खायचं. हवं तर ब्रेडला लोणी लावायचं किंवा तो भाजायचा, किंवा ब्रेडच्या दोन तुकड्यांमधे ऑम्लेट (आणि हवा तर चीझचा स्लाईस) ठेऊन ते टोस्टरमधे भाजायचं.
याच्या उलट ऑम्लेटच्या 2 थरांमधे ब्रेड असेल तर त्याला फ्रेंच टोस्ट म्हणतात (कृती खाली पहा).
2) फ्रेंच टोस्ट:
साहित्य: "अर्थातच ऑम्लेट"प्रमाणे. अधिक ब्रेडचे 2 तुकडे.
हे रिव्हर्स सॅंडविच आहे. म्हणजे ऑम्लेटच्या दोन थरांमधे ब्रेडचा स्लाईस.
एकदा एक ब्रिटिश आणि एक फ्रेंच असे मित्र (?) नाष्ट्यासाठी (आपापले) ऑम्लेट बनवत असताना अंडी त्यांना म्हणाली, "नेहमी आम्हीच काय म्हणून ब्रेडमधे दाबून घ्यायचं? ही दडपशाही आहे. कधीतरी आमच्या मधे ब्रेडला दडपा की!"
"असं कसं? तशीच परंपरा आहे." ब्रिटिश माणूस म्हणाला आणि त्यानं ऑम्लेटला ब्रेडमधे दडपून सॅंडविचचा मोठा लचका तोडला .
पण फ्रेंच माणसाला अंड्यांचं म्हणणं पटलं. आणि त्यानं ऑम्लेटच्या दोन थरांत ब्रेडला दडपलं.
"ही पण दडपशाहीच आहे", ब्रेडनं निषेध नोंदवायचा प्रयत्न केला.
"उईऽऽ, उईऽऽ, उईऽऽ, नाईलाज आहे." खांदे उडवून फ्रेंच माणूस म्हणाला. "सॅंडविच म्हटलं की दडपशाही आलीच." आणि त्यानं रिव्हर्स सॅंडविचचा लचका तोडला. (दडपशाही वाईटच! पण शेवटी कुणीतरी या दोघांचेही लचकेच तोडणार असेल तर कोण आत, कोण बाहेर आणि कोणी कोणाला दडपलंय यालाही काय महत्त्व आहे?)
पुढच्या वेळी फ्रेंच माणसानं ब्रेडला आणि त्याच्या निषेधाच्या आवाजाला फेटलेल्या अंड्यात बुडवलं आणि गरम तव्यावर फेकलं. अशा रीतीनं फ्रेंच टोस्टचा जन्म झाला.
कृती अ (सोपी पद्धत):
ऑम्लेट मिश्रण बनवून घ्या. त्याचे ऑम्लेट करून घ्या. त्याचे 2 तुकडे करा आणि त्यांत ब्रेडचा स्लाईस ठेवून खा.
कृती ब: अर्थातच (Authentic) फ्रेंच टोस्ट:
ऑम्लेट मिश्रणात ब्रेडचे स्लाई्स बुडवून फ्रायपॅनवर लोण्यावर दोन्ही बाजूंनी परतून घ्या. या प्रकारे केल्यावर अंडं आतपर्यंत झिरपतं आणि आतील ब्रेड ओलसर मऊ राहातो. काहीजण अंड्याच्या मिश्रणात थोडं दूधही घालतात. ब्रेड ऑम्लेट मिश्रणात किती वेळ बुडवून ठेवला आहे त्यावरून ब्रेडमधे अंडं किती झिरपणार ते ठरतं. पण या प्रकारात ब्रेडवर ऑम्लेटचा फारच पातळ थर राहातो. शिवाय ऑम्लेट मिश्रणात बुडवलेला ब्रेड पॅनवर टाकताना हात खराब होतातच पण ब्रेडवरून ओघळणार्या अंड्यामुळे सगळा राडा होतो. तो न होण्यासाठी नुसतं कौशल्य आणि अनुभव पुरेसा नाही.
कृती क:
ब्रेडचे स्लाई्स फ्रायपॅनवर लोण्यावर ठेवा. एक बाजू जरा भाजून झाली की स्लाईस उलटा व त्यावर (गरम बाजूवर) ऑम्लेट मिश्रण पसरा. गॅस बारीक ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर ब्रेड पुन्हा उलटा व या बाजूवरही मिश्रण पसरा. ते घट्ट व्हायला लागल्यावर ब्रेड पुन्हा उलटा. दोन्ही बाजूंनी परतून घ्या.
या कृतीत ब्रेडही भाजला जातो, ऑम्लेट मिश्रण ब्रेडमधे आतपर्यंत झिरपतं, ऑम्लेटचा हवा तेवढा जास्त जाड थर ब्रेडवर राहातो आणि राडाही होत नाही. आत झिरपलेल्या आणि फार घट्ट न झालेल्या अंड्यामुळं असा केलेला फ्रेंच टोस्ट क्रीमी आणि अंडसमृद्ध लागतो.
कृती ड: थोडं ऑम्लेट मिश्रण फ्रायपॅनवर लोण्यावर पसरा. गॅस बारीक ठेवा. ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर ब्रेडचा स्लाईस (नुसता किंवा भाजलेला) ठेवा व जरा दाबा. ऑम्लेट पॅनवरून सुटं झालं की ते पॅनवरून काढून बाजूला ठेवा. थोडं ऑम्लेट मिश्रण पुन्हा फ्रायपॅनवर लोण्यावर पसरा. ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर एका बाजूला ऑम्लेट चिकटलेला मगाचचा ब्रेडचा स्लाईस उलटा ठेवा व जरा दाबा. पॅनवरून सुटा झाला की खायला तयार.
या प्रकारात ऑम्लेटचा जाड थर ब्रेडवर राहातो आणि अडं थोडं आत झिरपतं (कृती अ पेक्षा जास्त पण कृती क पेक्षा कमी).
चारही प्रकारांत दोन बाजूंना ऑम्लेट व मधे ब्रेड असे सॅंडविच असले तरी कृतीतील फरकामुळे चवीत फार फरक पडतो.
3) पोळी सॅंडविच:
ब्रेड सॅंडविच आणि फ्रेंच टोस्ट मधे अन्न म्हणून निकृष्ट (भुक्कड) ब्रेड वापरलेला असतो. ब्राऊन ब्रेड हीही काही खरी गोष्ट नव्हे. म्हणून ब्रेडऐवजी न चाळलेल्या कणकेची पोळी वापरणं चांगलं. न्याहारीच्या (मराठीत ब्रेकफास्टच्या) वेळी रात्री केलेल्या किंवा संध्याकाळच्या खाण्याच्या वेळी दुपारच्या पोळ्याही चालतील.
1 - सोपी कृती: पोळीबरोबर ऑम्लेट खा. उगीच ह्याच्यात ते ठेवा, त्याच्यात हे ठेवा आणि मग एकत्र, न सांडता, कसरत करत, तरीही सांडत खाण्याच्या परदेशी विचित्रपणाचा अट्टाहास कशासाठी? शिवाय मोठ्ठा आऽऽ करून खायला लागतं ते वेगळंच. मोठ्ठ्या बनमधे हॅंबर्गर-वडा-ऑम्लेट आणि टॉमॅटो-काकडीच्या चकत्या, चीझ-स्लाईस, लेट्यूसची पानं इत्यादी ठेवून 6 इंची सॅंडविच करून ते खायचं म्हणजे सापाचंच तोंड पाहिजे.
2 - सॅंडविच व रोल - सोपी कृती: पोळीवर ऑम्लेट ठेवा आणि दोन्हीची एकत्र निम्मी घडी घाला किंवा एकत्र रोल करा आणि खा.
3 - कृती 2:
तव्याला थोडं तूप लावून त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा.
ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर पोळी ठेवा व जरा दाबा (पोळी ऑम्लेट मिश्रणाला चिकटण्यासाठी).
ऑम्लेट पॅनवरून सुटं झालं की ते पॅनवरून काढून बाजूला ठेवा.
फ्रायपॅनवर थोडं तूप लावून त्यावर ऑम्लेट मिश्रण पुन्हा पसरा. ते जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर एका बाजूला ऑम्लेट चिकटलेली मगाचीच पोळी उलटी ठेवा व जरा दाबा. पॅनवरून सुटी झाली की खायला तयार. तिन्ही थर उलटा व थोडं तूप सोडून दोन्हीकडून खरपूस भाजा. सुरीनं हव्या त्या आकारात कापून खा किंवा खायला द्या.
4 - कृती 3: तव्याला थोडं तूप लावून तयार पोळीचा चतकोर तुकडा भाजायला ठेवा. तो थोडा गरम झाल्यावर उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा. ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर पोळीचा दुसरा चतकोर ठेवा व उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरून ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर त्यावर पोळीचा तिसरा चतकोर ठेवा व उलटा. त्यावर ... असे तुम्ही (तुमच्या तोंडाचा "आऽऽ" किती वासला जाऊ शकतो त्यानुसार) कितीही थर लावू शकता. इथं तुम्हाला दहीहंडीच्या 9 थरांचे रेकॉर्ड मोडता येईल.
5 - मराठी अंडापोळी 1: तव्याला थोडं तूप लावून तयार पोळी भाजायला ठेवा. एक बाजू खरपूस भाजून झाल्यावर ती उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा. ते थोडं घट्ट व्हायला लागल्यावर ते उलटा. त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरून ते घट्ट व्हायला लागल्यावर पुन्हा उलटा. ही "मराठी अंडापोळी" (फ्रेंच टोस्टप्रमाणं) झाली.
6 - मराठी अंडापोळी 2: गरम तव्याला थोडं तूप लावा. पोळीचे चतकोर तुकडे करून घ्या. त्यातील एक ऑम्लेट मिश्रणात बुडवून तव्यावर टाका. एक बाजू परतून झाल्यावर पोळी उलटा व परता. याप्रमाणं सर्व तुकड्यांच्या अंडापोळ्या करून घ्या. यात पोळी ब्रेड्प्रमाणं भिजत नसल्यामुळं अंड्याचा थर कमी राहातो. त्यामुळं अशा दोन चतकोरांमधे आणखी काहीतरी भरून सॅंडविच करा.
7 - पोळी टोस्ट सॅंडविच:
तयार पोळीचे अर्धे तुकडे करा व त्यांना लोणी लावा.
प्रत्येक तुकड्यावर चतकोर ऑम्लेट ठेवा.
त्यावर टॉमॅटोच्या चकत्या आणि चीझचे पातळ तुकडे ठेवून पोळीची घडी घाला.
अशा दोन घड्या एकावर एक ठेवा.
टोस्टरमधे भाजून खा.
4) उत्थप्पाम्लेट-डोसाम्लेट-थालीपीठाम्लेट:
कृती 1: आतापर्यंतचे माझे उद्योग (प्रयोग), ऑम्लेटबरोबरच्या माझ्या झटापटी आणि या पदार्थांची नावं बघूनच तुम्हाला या पदार्थांचा अंदाज आला असेलच. तो अर्थातच बरोबर आहे.
डोसा आणि उत्थप्पा यात फार फरक नाहीच आहे. डोस करायला कौशल्य आणि धीर लागतो. दोन्हीच्या अभावामुळे तो नीट पसरता आला नाही आणि जाड राहिला की त्याचा उत्थप्पा होतो. दोन्हीपैकी काहीही करताना पीठ तव्यावर पसरलं आणि ते जरा घट्ट व्हायला लागलं की त्यावर ऑम्लेट मिश्रण पसरा. ते जरा घट्ट झालं की आणि डोसा/उत्थप्पा तव्यावरून सुटला की तो उलटा व तव्यावरुन सुटला की प्लेटमधे काढा.
थालीपीठाम्लेट करताना थालीपीठावर ऑम्लेट मिश्रण पसरून ते घट्ट व्हायला लागल्यावर उलटा व ते तव्यावरुन सुटलं की प्लेटमधे काढा.
कृती 2: याची सोपी पद्धत म्हणजे अर्थातच डोसा-उत्थप्पा-थालीपीठावर ऑम्लेट ठेवून एकत्र खा.
कृती 3: किंवा त्याहूनही सोपं म्हणजे डोश्याच्या पिठात (एका डोश्याला अर्धं ते एक अंडं या प्रमाणात) ऑम्लेट मिश्रण किंवा मीठ घालून फेटलेली अंडी घाला आणि भाजणी ऑम्लेट मिश्रणातंच भिजवा.
यामुळं उत्थप्पा, डोसा, थालीपीठ यांसारखे मुळातच समृध्द पदार्थ आणखी प्रथिनसमृद्ध होतात.
5) व्हेज-नॉनव्हेज रीमिक्स
सध्या मिळणारी अंडी व्हेज (जीव नसलेली) असली तरी प्राणिज असतात म्हणून आपण त्याना नॉनव्हेज म्हणूया. म्हणुन अंड्याचं ऑम्लेटही नॉनव्हेज म्हणूया. मग व्हेज-नॉनव्हेज रीमिक्स करताना व्हेज ऑम्लेट म्हणजे काय?
तुम्ही काही प्युअर व्हेज रेस्तोरॉंमधे टॉमॅटो ऑम्लेट खाल्लंय? तेच व्हेज ऑम्लेट. किंवा साधं डाळीच्या पिठाचं जाडसर धिरडं.
आता रीमिक्स करणं सोपं आहे. 2 अंडी फोडून त्यात चवीपुरतं मीठ टाकून फेटून घ्या. (यामुळं अंडी अर्धपारदर्शक पातळ आणि एकजीव होतात.) आता डाळीच्या 3 धिरड्यासाठी पीठ भिजवा आणि त्यात ही फेटलेली अंडी घालून चांगलं मिसळा. त्यात कांदा-टॉमॅटो-कोबी-फ्लॉवर-मिरची-कोथिंबीर असं तुम्हाला हवं ते काहीही व्हेज आणि परतलेला खिमा, भाजलेल्या चिकनचे बारीक तुकडे, असं काहीही नॉनव्हेज घाला. चांगलं मिसळा आणि या पिठाची 4 ऑम्लेट्स बनवा.
पण रीमिक्स जपून करा. एकूणच रीमिक्स हे प्रकरण अवघडच (!?) आहे. त्याबद्दल पुढच्य भागात.
6) स्क्रॅंबल्ड एग्ज आणि अंडा भुर्जी:
ऑम्लेटच्या प्रयोगांत हे वेगळेच पदार्थ कसे?
हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे छानच लागत असले आणि त्यांना स्क्रॅंबल्ड एग्ज किंवा अंडा भुर्जी अशी काहीही आकर्षक नावं दिली तरी ऑम्लेट बिघडलं म्हणजे ( आणि ते आणखी बिघडवलं की) असं होतं असं मला नेहमी वाटतं. मला ऑम्लेट करायचं होतं असं म्हटलं की त्याचे तुकडे झाले की ते बिघडलं. पण मला तुकडेच करायचे होते म्हटलं की तो नवीनच पदार्थ झाला. मग त्याचे किती छान, बारीक आणि एकसारखे तुकडे झाले हाच यशाचा निकष आणि कौतुकाचा विषय होतो. म्हणजे जे व्हायचं ते होतंच पण मला हेच करायचं होतं म्हटलं की अपयशाचं यशात रूपांतर होतं आणि आपलं नाक कटायच्या ऐवजी आणखी वर होतं.
(जाता जात जीवनातलं हे एक महान तत्त्व मी तुम्हाला फुकटात सांगितलं हे लक्षात घ्या.)
म्हणून हे वेगळे पदार्थ नसून बिघडलेल्या ऑम्लेटचेच प्रकार असल्यानं त्यांचा समावेश इथं केला आहे.
तर स्क्रॅंबल्ड एग्ज आणि अंडा भुर्जी हा एकच पदार्थ आहे असं अज्ञ लोकांना वाटत असलं तरी ते दोन वेगळेच पदार्थ पदार्थ आहेत. विदेशी-देशी, पाश्चिमात्य-पौर्वात्य, अळणी-झणझणीत, अलिप्त-गुंतलेला, एकटा-गर्दीतला असा तो मूळ विचारपद्धतीतीलच फरक आहे.
स्क्रॅंबल्ड एग्ज:
प्रकार 1: एक अंडं फोडून घ्या. त्यात 2 चमचे दूध घालाआणि चांगलं फेटून घ्या. पॅनमधे (नॉनस्टिक) पाव चमचा लोणी घेऊन पॅन अगदी मंद गॅसवर ठेवा. लोणी वितळलं की त्यावर फेटलेलं अंडं टाकून अलगद पसरून घ्या. ते किंचित जमायला लागतंय असं वाटताच लाकडी उलथनं (मराठीत स्पॅट्च्यूला/स्पॅच्यूला/स्पॅट्यूला) त्यातून वरून खाली हलकेच फिरवा. मग ते डावीकडुन उजवीकडे, डाव्या वरच्या कोपर्यातून उजव्या खालच्या कोपर्याकडे आणि उजव्या वरच्या कोपर्यातून डाव्या खालच्या कोपर्याकडे (किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, वायव्येकडुन आग्नेयेकडे आणि ईशान्येकडुन नैऋत्येकडे) आणि याच दिशांनी उलटे हलकेच फिरवा आणि फिरवत रहा (धीर आणि ध्यानमग्न अवस्था आवश्यक आहे). हळूहळू जमता जमता ते मलई बर्फीसारखं किंवा बारीक रव्याच्या मऊ शिर्यासारखं होते. तुम्हाला हवं तितकं घट्ट झालं की प्लेट/बाऊलमधे काढून घ्या आणि खा.
शुद्ध अंड्याचा पवित्र आणि सूक्ष्म आस्वाद घेण्याची इच्छा आणि पात्रता असणार्यांना हे ठीक आहे. पण आपल्यासारख्या पामरांना त्याची चव काय कळणार? (म्हणतात नाऽऽ गा ...) आपण म्हणणार हे का? याला तर काहीच चव नाही. मग आपण त्यावर थोडं मीठ आणि मिरपूड भुरभुरून किंवा अगदी पिठी साखर आणि वेलदोड्याची पूड भुरभुरून खाऊया. आता हे छान क्रीमी, सौम्य पण बरं चवदार लागतं.
प्रकार 2: एक अंडं फोडून घ्या. त्यात 2 चमचे दूध, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ आणि मिरपूड घालाआणि चांगलं फेटून घ्या. पॅनमधे पाव चमचा लोणी घेऊन पॅन अगदी मंद गॅसवर ठेवा. लोणी वितळलं की त्यावर हे मिश्रण (किंवा ऑम्लेट मिश्रण) टाका. ते किंचित जमायला लागतंय असं वाटताच लाकडी उलथन्यानं परतत रहा. पुरेसं घट्ट झालं की प्लेटमधे काढून नुसतं किंवा ब्रेड/पोळी बरोबर खा.
यात प्रत्येक कांद्याच्या तुकड्याभोवती अंड्याचा थर जमा होऊन ते कांद्याच्या पीठ पेरलेल्या सुक्या भाजीसारखं होतं. पहिल्या प्रकारापेक्षा हे जरा जास्त चवदार लागतं.
यात कांद्याऐवजी आपण कोणतीही बारीक चिरलेली फळभाजी घालू शकतो.
प्रकार 3: काहीही कारणानं ऑम्लेट करताना सलग निघालं नाही आणि त्याचे तुकडे पडायला लागले तर उलथन्यानं जास्त तुकडे करून, कुस्करून त्याचं स्क्रॅंबल्ड करावं आणि स्क्रॅंबल्ड एगच करायचं होतं असं म्हणावं.
अंडा भुर्जी:
प्रकार 1: एक अंडं फोडून घ्या. त्यात 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, भरपूर लाल तिखट किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची (किंवा दोन्ही), अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालाआणि चांगलं फेटून घ्या. तव्यावर 2-3 चमचे तेल घ्या. ते गरम झालं की त्यावर हे मिश्रण टाका. गॅस मध्यम ठेवा आणि उलथन्यानं परतत रहा. मोठे तुकडे उलथन्यानं दाबून-कुस्करून बारीक करत राहा. वरून थोडी कोथिंबीर टाका. वाफा येऊन कोरडे होईपर्यंत खमंग परता. प्लेटमधे काढून ब्रेड/पोळी बरोबर खा. हे झणझणीत असल्यानं नुसतं खाता येत नाही.
प्रकार 2: एक तव्यावर 4 चमचे तेल टाका (8 चमचे टाकलंत तरी चालेल). त्यावर 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा टाकून परता. त्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (शिवाय वाटल्यास लाल तिखट), थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमचा गरम मसाला किवा कांदा मसाला टाकून परतत रहा. कांदा गुलाबी झाला की त्यावर दोन अंडी फोडून टाका आणि परतत रहा. अंड्याचं पिवळं तव्यावरच फोडा आणि मिसळा आणि परतत रहा. वाटल्यास त्यात क्रीम, लोणी किंवा चीझ किसून घाला. खमंग परतल्यावर डिशमधे काढून घ्या. त्याच तव्यावर थोड्या लोण्यावर ब्रेड फ्राय करून घ्या आणि अंडा-भुर्जीबरोबर खा.
स्क्रॅंबल्ड एग्ज - प्रकार 1 आणि अंडा भुर्जी - प्रकार 2: या दोन टोकाच्या प्रकारांमधे तुम्ही हवे तितके प्रकार करू शकता.
अंडा भुर्जीचाच एक प्रकार किंवा एक स्वतंत्र प्रकार म्हणजे अंड्याचा म्हाद्या.
7) अंड्याचा म्हाद्या:
हा प्रकार बघण्याआधी "म्हाद्या" हा काय पदार्थ आहे हे पाहिलं पाहिजे.
हा सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. हा करायला सोपा, झटपट होणारा, आयत्या वेळी घरात सहज उपलब्ध पदार्थांपासून करता येणारा आणि हमखास चवदार पदार्थ आहे. म्हाद्या म्हणजे थोडक्यात शेंगदाण्याच्या कुटाचं मसालेदार पिठलं (पिठाचं ते पिठलं या न्यायानं याला कुटलं म्हटलं पाहिजे).
आता याच पदार्थात अंडं घातल की झाला ’अंड्याचा म्हाद्या’.
कढईत भरपूर तेल घालून मोहरी, जिरं. हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट/ठेचा/तुकडे, लाल तिखट/कांदा मसाला आणि मीठ घालून चांगलं परता. त्यात दाण्याचं कूट घालून परता आणि मग पाणी घालून शिजवा. बरंच पाणी आटून तेल सुटायला लागलं की गॅस बारीक करून त्यात दोन अंडी फोडून टाका आणि ढवळा/परता हवं तेवढं घट्ट झालं की वाढून घ्या आणि गरम भाकरीबरोबर खा.
हा पदार्थ ब्रेडबरोबरही चांगलाच लागत असला तरी ब्रेडबरोबर खाण्याचा मूर्खपणा आणि म्हाद्या आणि भाकरी दोन्हीचाही अपमान करू नका.
या प्रयोगांविषयी चिंतन आणि मी पदार्थ का करतो? पदार्थाची किंमत आणि मूल्य काय? मी प्रयोग का करतो? ... अशासारख्या (विनाकारण पडणार्या) प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पुढच्या (आणि "माझे ऑम्लेटचे प्रयोग"च्या शेवटच्या) भागात.