OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Tuesday, April 5, 2011

कवठाची चटणी



प्रकार:
चटणी/सॉस
गार
किती जणांसाठी: १६
प्रक्रिया: कालवणे, कुस्करणे, मिसळणे मुरवणे, किसणे
पौष्टिकता:
क्षार, लोहक्षार
जीवनसत्त्वे
कर्बोदके (गूळ), प्रथिने (बियांतील)
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स, विरघळणारे व न विरघळणारे तंतुमय पदार्थ
वेळ:
पूर्वतयारीचा:
२ मि
वाढण्याचा:
१ सेकंद

पाककृतीचा:
३ मि
खाण्याचा:
१५ मि

















नाव:
कवठाची चटणी
प्रस्तावना:
तोंडाला चव नाहीये? रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? एकूणच कंटाळा आलाय? जेवण आणि जीवन अळणी झालंय? जेवण (आणि जीवन) हमखास रंगतदार, चवदार, चटकदार बनवायचंय?
इच्छा:
मग आज आपण कवठाची चटणी करूया.
पूर्वतयारी:
· पण ती अशी सहज बनत नाही. त्यासाठी कवठ मिळायला लागतं. त्यासाठी बाजारात (पायी) जायला लागतं, कवठं पिकण्याचा सीझन असायला लागतो व आपल्या नशिबानं कवठ बाजारात त्या दिवशी नेमकं असायला आणि आपल्याला दिसायला लागतं. किंवा कवठाचं झाड अंगणात किंवा जवळपास असायला लागतं. किंवा ज्यांच्याकडे झाड आहे अशांनी, तुम्ही खाता का? मग हे घ्या. रोज अंगणात पडतात पण आमच्याकडे कुण्ण्ण्णाला आवडत नाहीत, असं म्हणून ते आपल्याला द्यायला लगतं.
· ते मिळतं तेव्हा आपली पुढची पाच-सहा जेवणं आणि दिवस छान जातात.
· ते आणल्यावर घरभर वास पसरला तर त्याची चटणी लगेच करावी. नाहीतर रोज त्याचा वास घेऊन पहावा. सौम्य वास यायला लागल्यावर ते फोडलं तर ते अर्धं-कच्चं फिक्कट गुलाबी व आंबट-तुरट असतं. त्याचीही आंबट-तिखट चटणी छान होते.
· पण आणखी धीर धरून २-३ दिवस थांबलं तर त्याचा वास घरभर सुटेल (मुद्दाम घ्यायला लागणार नाही) त्या दिवशी ते फोडावं. त्यातला गर कवचापासून सुटा झालेला व छान किरमिजी-चॉकलेटी दिसेल. मग त्याची चव पाहू. आऽऽहाऽऽऽ! ट्‌क्‌!
तयारी:
आता आपण कवठाच्या गराएवढा गूळ (किसून), एक-दीड चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरे पावडर व मीठ घेऊ.
पाककृती:
· कवठाचा गर काढून चांगला कुस्करून घेऊ.
· त्यात किसलेला गूळ, जिरे पावडर व चवीनुसार मीठ व तिखट घालून पुन्हा चांगलं कुस्करून व मिसळून घेऊ. मग त्यात थोडं चक्‌, थोडं ट्‌क्‌, थोडं ट्यॅंव्‌ टाकून झाकून ठेऊ. आता अर्धा-एक तास (जेवणाची वेळ होईपर्यंत) थांबायला हवं म्हणजे गूळ विरघळून हे सगळं छान मुरेल. जेवणात वाढायच्या आधी चव संतुलन तपासण्यासाठी पुन्हा चव घेऊन बघू (चाखून बघायला एक निमित्त. धीर धरवत नाही हेच खरं).
समृद्धीकरण
· अन्न म्हणून चटण्या फार समृद्ध नसल्या तरी त्या चवींनी समृद्ध असतात. त्या भूक वाढवून (कदाचित कमी चवदार पण) पौष्टिक अन्न खाण्याला चालना देतात आणि काही पूरक अन्नघटक पुरवतात.
· कवठाच्या चटणीत (बियांसकट खाल्ल्यास) प्रथिनेही असतात.
· शिवाय त्यात न विरघळणार्‍या तंतुमय पदार्थाबरोबरच विरघळणारे तंतुमय पदार्थही असतात.
कौशल्य:
· चव संतुलन साधणं सर्वच पदार्थांत आवश्यक असलं तरी चटण्यांत ते विशेष महत्वाचं आहे. त्यातही गोड, खारट, आंबट, तुरट, तिखट इतक्या चवी व वैशिष्ट्यपूर्ण तीव्र स्वाद यांचं संतुलन साधणं कवठाच्या चटणीत खरंच फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी उपजत जाण, तज्ञ मार्गदर्शनाखाली शिक्षण व प्रदीर्घ सराव व थोडं नशीब (कवठ कसं निघतंय?) यांची जरूर असते.
· पण घाबरून जायला नको. थोडं बिघडलं तरी ते छान लागतं. (नाहीतर वाईट वाटून न घेता फेकून द्यायला लागतं)
सजावट:
याच्यामुळे जेवणाचं पान सजवता येतं. याला सजवायची जरूर नाही.
वाढप:
... ?
आस्वाद:
जेवताना मधून मधून स्स्स्स्‌ ... , चक्‌ ... , ट्‌क्‌ ... !
चिंतन:
· ही तीन-चार दिवस नुसती व फ्रीझमधे आठवडाभर टिकते (पण इतके दिवस राहात नाही).
· हा पदार्थ चटणी म्हणून, सॉस म्हणून, (जास्त गोड करून) जॅम म्हणून, (जरा पातळ व सौम्य करून) ग्रेव्ही म्हणून व पंचामृत म्हणून खाता व कुठेही वापरता येतो.
· कवठाच्या विशेष गुणधर्मांमुळे याची जेली उत्कृष्ट होते. शिवाय याचा जॅम व बर्फीही छान होते. हे पदार्थ शिकायला हवेत.
· हाताला चव असणं ही उपजत देणगीच आहे आणि चव संतुलन परिपूर्णता हा खरंच पी. एच्‌. डी.चा विषय आहे.
· जगात कवठाचा वास न आवडणारीही काही कमनशिबी माणसं असतात.
· जेवणाबरोबर खरंच जीवनाला पण चव येते.